सोमवार, ३० मार्च, २०१५

शेवट...

प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच आणि तो कधी ना कधी येणारच हे निश्चीत... शेवटाशिवाय मजाही नाही कुठल्या गोष्टीला... अमर असणं किंवा होणं हे जरी खूप छान वा हँपनिंग वाटत असलं तरी त्यात काही रस नाही जगण्याचा...

कधीतरी आपलाही शेवट होणारच ह्या भितीपोटी म्हणा किंवा सत्याला स्विकारून म्हणा प्रत्येकजण येणाऱ्या क्षणाला जगण्यासाठी धडपडतो. त्यातच तर खरी मजा आहे... कुठल्या क्षणी शेवट आपल्या डोळ्यांसमोर येऊन उभा राहील सांगता येत नाही म्हणून क्षणांच सोनं करण्याचा हा प्रवास...

तसंच या क्षणभंगूर गोष्टी आणि घटनांचही...
शेवटाला धरुनच नविन सुरुवात होते पुढल्या पायरीची..
ती पायरी चढणं सुरवातीला अवघड वाटतं, पाउल उचलायला त्रास होतो पण नव्याचा प्रभाव आणि जुन्याच्या आठवणी ताण हलका करतात..
खरंतर कित्येक शेवटाला सामोरे जात इथवर आलोय आपण... असंख्य घटनांचे, मैत्रींचे, नात्यांचे, माणसांचे, जागांचे शेवट आपण जगलोय आणि जगून उरलोय पण तरीही नव्या शेवटाला मन घाबरतं, खजील होतं, आतून पार तोडून टाकतं, आणि आठवणींसोबत जगायला शिकवतं...

सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

आपली माणसं...

काही आपली माणसं (नात्यांच बंधन नाही) नेहेमीसाठी आपल्याजवळच असतात, कितीही भौगोलीक अंतर असलं तरीही… त्या व्यक्ती आपल्याला आणि आपण त्यांना नेहमी हवेहवेसे वाटतो… आयुष्याचा प्रवास अखंड सुरूच असतो आणि आपण पुढे पुढे जात असतो… त्यात प्रत्येक रस्त्यावर नवीन ओळखी होत जातात, तसच प्रत्येक वळणावर काही सोडूनही जातात (काही इच्छेने तर काही नाईलाजाने). आपण आपला रस्ता धरून निघतो पुढे पुढे आणि आणखी पुढे. जिंकण्याच्या किंवा जगण्याच्या शर्यतीत मागे राहून गेलेल्या आपल्या माणसांकडे वळून बघण्याची तसदी क्वचितच घेतो… पण काही माणसं विसरता विसरत नाहीत, तिथेच असतात मनाच्या एका कप्प्यात दडून… वाट वेगळ्या झालेल्या असल्या तरी मने नेहमीसाठी जुळून असतात… ते नातं तसंच ताजं आणि टवटवीत असतं. कधीही गरज पडल्यास हक्काने मदत मागता येणारी, आपल्या कितीही मोठ्या संकटाच ओझ झटक्यात कमी करू शकणारी, आपल्या चेहेऱ्यावर कधीही हास्याची लहर आणू शकणारी ही माणसं… काहीजण तर अनेक वर्षांनी भेटल्यानंतरही जिथून सोडून गेलो होतो त्याच काळात असल्यासारखे वागतात, अगदी वयाची, वेळेची सगळी बंधनं विसरून… अश्या वेळी एक सुंदर नातं धूळ झटकून नव्याने परत चमकायला लागतं… त्याच तेजाने, त्याच आनंदाने, आणि त्याच उत्साहाने… 

म्हणूनच, काही लोक आपल्यापासून दूर कधीच जात नाहीत…
ती तिथेच राहतात मनाच्या कप्प्यात घर करून…
आपण त्यांना बाहेर काढतही नाही आणि ते आपणहून जातही नाहीत…
एक कॉल, एक संदेश, किंवा एका हाकेने आपल्या आपलं आयुष्य पूर्णतः बदलू शकणारी ही माणसं…

प्रत्येकाचं आयुष्य अश्या व्यक्तींनी समृद्ध, श्रीमंत असतं… फक्त त्यांना सांभाळून ठेवणं गरजेचं असतं… आणि तो प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करतच असतो, हा आनंदाचा ठेवा जपून ठेवण्याचा...

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

मोठे होत जाताना...

मोठे मोठे  होत जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत असते, 
की आपली "मोठे झाल्यावर मी हे मी हे करणार" ही लिस्टच  हरवून जाते… 
मग ती जाणीव होते की खूप काही त्या गेलेल्या वयात करायचे राहूनच गेले… 

अगदी छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा कित्ती मोठ्या होत्या… 
सगळ्यात पहिले मी हा विचार केलेला की मोठे होऊन मला गेट वर न चढता ते उघडता येईल.. म्हणजे कित्ती मज्जा…  
पण जेव्हा मोठी झाले तेव्हा त्याची मजा नाही अनुभवली. एव्हाना ते विसरूनही जायला झालेलं की आपलं हे टार्गेट होत लहानपणी… 
आणि आता ते गेट वर चढून गेट उघडणं, त्या गेट वर झुलत मागे येणारी आणि मग तेच २-३ वेळा रिपीट करत झुलणारी मी प्रकर्षाने आठवते मलाच…  
उंच जागेवरून सामान उतरवताना ही तेच…  
आता सहज हात पुरतो त्या जागेवर पण खुर्ची वर चढून कसरत करून काढणारे ते ताणलेले चिमुकले हात पाय आत्ताही तसेच आठवतात… 

आपल्या पेक्षा मोठ्यांना मोठ्ठ होताना पाहिलेलं असत आपण,
त्यांना बघूनही आपली डोक्यातली सिक्रेट लिस्ट update होत असते, पण जेव्हा आपली पाळी आली ते एन्जॉय करण्याची तेव्हा आपण साफ विसरलेलो की असाही काही आपण विचार केला होता...  

लहानपणी अंधाराची भीती फक्त यासाठी वाटायची कारण कुणीतरी राक्षस येउन आपल्याला मारून टाकेल किंवा आत लपलेली मांजर, पाल, झुरळ आपल्या अंगावर पडेल वगैरे.. आणि तेव्हा चक्क थोडीशी प्रकाशाची तिरीप आली तरी तेवढ्यावर आपलं छान भागायचं आणि त्या प्रकाशावर हातांचे हातवारे करत खेळायचो ही स्वतःशीच…  
आता सर्वत्र भीतीच आहे, लक्ख प्रकाश आहे बाहेर आणि आतही पण तरीही मनातली भीती काही केल्या जात नाही … 

पण एक गोष्ट तेव्हाही आणि आजही कायम आहे… 
लहानपणी बाबा हेच जगातले सगळ्यात strong hero होते (कारण काहीही झालं तरी ते सांभाळून घेणारच) 
आणि आई ही नेहमी हवी हवीशी वाटणारी आणि थोडीही दूर झाली की तिचा पदर धरून मागे मागे जाणारे आपण… 
खूप दिवसांनी घरी गेल्यावर आईशी आताही काहीशे असेच वागतो... 
आणि बाबा आपल्या आयुष्यात आहेत ही भावनाच एक बळ देते जगाशी लढण्याचं… 

लहानपणी आपल्यापेक्षा मोठे बाहेर शिकायला गेलेले दादा ताई घरी आल्यावर भरभरून प्रेम करणारी त्यांची आई आपण पाहिलेली असते आणि तेव्हा आपणही घरी आलो की असंच होईल असं मनाशी पक्क वाटलेलं असतं. ते तसंच होतं आता आणि ते पूर्णपणे एन्जॉयही करतो आपण… 

ह्या गोष्टी नेहमी अश्याच आपल्या सगळ्यांच्या जगात राहाव्यात कारण जगणं सुंदर करायला ह्या गोष्टीच पुरेश्या आहेत....

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

...


जेव्हा जेव्हा मी स्वतः बद्दल विचार करते  तेव्हा वाटते की मी खूप भाग्यवान आहे…
मला सगळं जेव्हाच्या तेव्हा मिळालंय,,, किंवा अस म्हणू शकते की जेव्हा गरज आणि योग्य वेळ होती तेव्हा सगळं काही मिळत गेलं…
कधी कशाची उणीव नाही भासली (जे आहे त्यात समाधानी राहण्याची शिकवणही मिळत गेली)… कधी कुठल्या एका गोष्टीसाठी रडत नाही बसावं लागलं…
समजूतदार पालक मिळाले… मी कधीही आई आणि बाबांना सारखं भांडताना नाही पाहिलं… ते नेहमी एकमेकांना समजून पुढे जात राहिले आणि त्यांच्या वागणुकीतून आम्हाला शिकवण देत राहिले…
शाळेतही कधी भीती नाही वाटली, दांड्या मारण्याची इच्छा नाही झाली कधी, शिक्षकाची, अभ्यासाची किंवा कशाचीच भीती नव्हती…
माझं जग खूप सुरक्षित होत, खूप श्रीमंत होतं (वागणूक, शिकवण, लोक ह्यांच्या मुळे)... माझ्या आजूबाजूची लोक, शेजारी, मित्र- मैत्रिणी, अगदी शेजाऱ्यांचे नातेवाईक, त्यांचे शेजारी सगळ्यांची खूप खूप सोबत आणि खूप प्रेम मिळालं…
कधी आईचा मार खाल्ला किंवा बाबा रागावले की शेजारच्या काकूंकडे हक्काने रडत जाता यायचं आणि मग त्यांनी प्रेमानी समजूत काढायची आणि घरी गेल्यावर आईच्या डोळ्यातले प्रेमळ भाव बघायला मिळायचे…
मला मिळालेल्या प्रत्येक बक्षीसाच पूर्ण कॉलोनी मध्ये झालेलं कौतुक…
शेजारच्या ताई, दादाच्या लग्नाचे पाहुणे आमच्याकडे आरामात राहिलेले आणि आम्हीही यजमानाचे कर्तव्य आनंदाने निभावलेले… घर फार छोट होत पण मनं फार मोठी होती. कधीही कितीही जास्त पाहुण्यांसाठी जागा कमी पडली नाही.…
शिकता शिकता सभोवतालचे प्रश्नही डोळ्यास पडत गेले आणि माझ्या अनुभवात भर घालत गेले…

सामाजिक बांधीलकी म्हणजे काय आणि मदत करण्याचा धर्म किती मोठा हे सुद्धा अनुभवाने आणि सभोवताली पाहिलेल्या दायाभावाने कळत गेलं… खूप खूप पुस्तकं वाचायला मिळाली…
वाचनालयात दर आठवड्याला एक तास फेरी, बागेत जायचं…
कितीतरी कॅम्पस, सहली, अभ्यासा व्यतिरिक्त खूप काही शाळेने दिलेले अनुभव…

सगळचं सभोवतालच जग सुरक्षित असलेलं, आणि कितीतरी लोक मला खूप काही शिकवून गेलेले…
माझं जग नेहमीच समृद्ध होत या सगळ्यांमुळे आणि आताही आहे …

प्रश्न हाच पडतो की हे असच समृद्ध आणि सुरक्षित जग मी माझ्या मुलांना देऊ शकणार का??

आताच्या बदलत्या जगात जिथे आपलेच शेजारी कोण हे माहित नसतं तिथे त्यांच्या जगातल्या लोकांशीही काही संबंध नाही येणार…
कसं सांगणार माझ्या मुलांना की एक घास सगळ्यांमध्ये वाटून कसा खातात??? कसं खरं वाटणार त्यांना की शेजारची काकू स्पेशल भाजीची एक वाटी आपल्यासाठी उरवून ठेवते आणि आवर्जून आणून देते… आपल्या इच्छांची, आवडीची काळजीही कुणी घेऊ शकतो, आणि या सगळ्यांचा परीकथेसारखा परिचय द्यावा लागेल बहुदा...
वाईट वाटतंय या गोष्टीचं की पुढे धावण्याच्या शर्यतीत किती मौल्यवान गोष्टींचा आपण ऱ्हास केला आणि कितीतरी गोष्टी ज्यांना अपरिचित ठेवलय आपण पुढच्या पिढीपासून…

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

सहजंच सुचलेलं आणि काही ऐकलेलं…


काहीतरी शोधत असतात माणसं, सारखं अवती भवती...
त्यांना काहीतरी हवंच असतं, खूप वेगळ आणि खूप नवं…

पण काय हवयं नेमकं तेच कळत नाही…

काहीतरी असावं ना जवळ जे फक्त आपलच असावं…
फक्त आपलं ज्यात कुणाचाच वाटा नसावा…

मग धावतात ती पुढ पुढ… अंधारात
(किंवा उजेड जाणणारे असेल तर तेही)
काहीतरी लागतही त्यांच्या हातात पण कधीच तृप्त नाही करत त्यांच्या अपेक्षा…
 
काय हवंय मला???
पैसा, घर, प्रेम, प्रसिद्धी, हक्क, न्याय, वर्चस्व, कि समाजात मानाच स्थान???
याचाच विचार करता करता हरायलाही लागतात…

याउलट काही माणसं असतात,
जे हवंय तेच मिळवण्याची जिद्द असते त्यांच्यात…
हर एक दिशा साद देत असते त्यांना पण…
ते जातात तिथेच जिथे त्यांचा हट्ट असतो…
भांडतात, पडतात, चढतात, हरतात, पुन्हा चढतात…
अशी जगण्याची लढाई सुरु असतानाच ते मिळवतात त्यांच्या हक्काची गोष्ट
आणि समाज मग त्यांना नाव देतो आणि मानाचं स्थानही …

आजही ऐकलय असंच काहीतरी…
आणि कळल कि आपली विचारांची क्षमता जिथे संपते तिथूनच त्यांच्या जगण्याची सुरवात होते… 

शनिवार, १८ जानेवारी, २०१४

उन्हाळा...


हिवाळा संपत आल्याचं जाणवतंय आताशा...

दुपारचं ऊन थोडं जास्तच तीव्र होतंय…

अश्याच वेळी कुठल्याश्या सावलीत उभं राहून किंवा चालताना, काहीतरी आठवतंय, काहीतरी आपल्यापासून खूप दूर दूर जात असल्याची जाणीव होतेय…

कदाचित खूप दूर गेलेले पण खूप काळ आठवणीत असलेले क्षण एकाच वेळी मेंदूच्या कुठल्याश्या कप्प्यात जागे होतायेत….
कदाचित काही भावना नव्याने उमलाताहेत, काय नव काय जुनं काहीच कळत नाहीये…

उन्हाळ्यातली दुपारची वेळ कधीकधी खूप झोपण्यात, कधी खूप अभ्यास करण्यात, कधी कुणासोबत खूप गप्पांमध्ये तर कधी एकाकी घालवलेली…
ती वेळ कधी जाता जात नाही तर कधी गेलेली कळतही नाही…
जाणवतंय काहीतरी हलतंय मनात, जाणवतंय काही क्षण कधीच परत येणारे नाहीत, कदाचित जागा, वेळ, काळ सगळंच बदललंय आणि मागे गेलेले, सोडलेले, सुटलेले क्षण आज काहीतरी करताहेत  मनात… कदाचित हे वेळेचं गणित असणार काहीसं कठीण…

आज काहीही करताना, बसताना, उठताना, झोपताना, काहीतरी गुन्हा केल्यासारखं वाटतंय,
वेळ जायलाही वेळ लागतोय आणि वेळ पकडायला सवडही नाही… खूप साऱ्या घटना, प्रसंग, जे उन्हाळ्याशी निगडीत आहेत ते एकदम आठवायला लागलेत…

विपासना, ध्यान, एकाकीपण, अश्रू, शिबीर, आचार्या, स्वतःबद्दल खूप काहीतरी केलेला विचार, शांतता, वेळेचं कळलेलं महत्व, प्रवचन…

घरी आई सोबत घालवलेला वेळ, तिने दुपारच्या विश्रांती नंतर बनवलेला एक एक पदार्थ, चहा, तिच्यासोबत, बहिणीसोबत हसत आणि मजेत असलेले काही क्षण, कधीकधी कुणाची भेट, कधी मारलेला फेरफटका सगळंच आठवतय… कधी घरात बसून किंवा तेच तेच पनाचा कंटाळा येउन आईवर चिडणार आणि तीही हतबल होऊन काही न करू शकल्याच्या अपराधीपनात उभी असणार आणि मग अचानक मन भरून येणार असे कितीसे क्षण…

कधी घरी येणारे आणि काही दिवस राहून जाणारे नातेवाईक निरोप घेऊन जाताना भरून आलेले डोळे, अचानक सुनं सुनं वाटू लागलेलं घर, घरातल्या भिंती दारं सगळं काही एक जाणीव करून देत अश्या वेळी… किती आठवणी, किती व्यक्ती आणि खूप काही आठवतंय घरासोबतच… ते सगळं नव्याने पुन्हा नाही जगता येणार कदाचित ही पण भावना नसेल स्वस्थ बसू देत…


आपण एकाच आयुष्यात किती आयुष्य जगत असतो ना? असं पण असू शकतं की एकच आयुष्य टप्प्या टप्प्याने जगत असतो… एक टप्पा पूर्ण झाला की त्यात पुन्हा मागे वळून परत जाण्याची मुभा नाहीच, तुम्ही फक्त त्या जगलेल्या टप्प्याचे वलय सोबत घेऊन जात असता…


काहीशे उन्हाळे मनावर घाव करूनही गेले आणि सुंदर क्षणही देऊन गेले… आपले वाटणारे लोक अगदी परके भासायला लागलेले, काही व्यक्ती ज्यांचा प्रभाव संपूर्ण आयुष्यावर पडावा असे अगदीच विरुद्ध दिशेला गेलेले आणि स्वतःच्या विचारांवर माझ्या प्रश्नचिन्ह कोरून गेलेले…

खूप काही आठवणी पुन्हा जाग्या करून गेलेली ही उन्हाची वेळ… 

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

आत्ता या क्षणात जगायचं...


आत्ता या क्षणी जे चांगलं वाटतंय ना ते करायचं
पण काय चांगलं वाटावं यालाही मर्यादा असायला हव्या, (कदाचित नसायलाच हव्या कारण चांगलं काहीही वाटू शकतं)

जेव्हा एखादी गोष्ट बघितल्यावर बघत रहावसं वाटतं, तो एक क्षण खूप आवडून जातो
चांगलं वाटलं, वाटलं!
ते "का वाटलं?" किंवा "का नाही?" हे वाद करायचे नाहीत…
तेव्हा तो क्षण जगायचा फक्त!!

एखादी गोष्ट पहिली आणि नाही आवडली तर??
तर सोडून द्यायचं ते, उगाच का नाही आवडली त्याचं स्पष्टीकरण नको, कारण स्पष्टीकरणात आपण आपला पुढचा क्षण वाया घालवतो, किंवा स्वताला दुखी करतो.
जेव्हा एखादा क्षण आपल्याला खूप आवडतो तेव्हा जे काही आपण अनुभवतो ना तेच आपण खरे असतो आतून...

अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून स्वताला शोधून काढता येत?
स्वतःपासून पळून तसंही जाणार कुठे?
जसं एखाद्या वस्तूला, व्यक्तीला बघून आनंद होतो, बघावासं वाटतं तर करायचं ते…
ते आवडून गेल्यानंतर, तो क्षण गेल्यानंतर काही वेळाने चांगल्या वाईटाचा हिशेब मांडायचा (जर गरज वाटलीच तर)
नाहीतर तेही सोडून द्यायचं आणि दुसऱ्या आनंदाच्या प्रतीक्षेत जगायचं…
मनसोक्त…   

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...