शाळा - एक अप्रतिम सिनेमा… कितींदा बघितला तरी प्रत्येक वेळा नवीन काही कारणासाठी लक्षात राहणारा…
हर एक पात्र विशिष्ट तर्हेने रंगवलंय आणि तसंच व्यक्त झालंय, मुकुंदा आणि त्याचे सुजाण वडील, सतत काळजी करणारी आई आणि ताई, चार मित्रांचा ग्रुप, त्याची "लाईन", नरु मामा, शिक्षक, वर्ग आणि विध्यार्थी, आणीबाणी आणि त्यातल्या हालचाली… तो काळ खूप सुंदर रित्या पडद्यावर मांडलाय…
काळ कुठलाही असो पण शाळेतले ते अनुभव आपण सगळ्यांनी थोडे अधिक जगलेच आहेत…
शाळा, त्यातली रोज होणारी प्रार्थना, त्यात मागे उभं राहून केलेली मस्ती, टवाळक्या, विनोद, आवडत्या शिक्षकांची घेतली जाणारी बाजू, काहींची टिंगल, प्रत्येक शिक्षकाला ठेवलेलं टोपण नाव आणि त्या नावाने आवाज देऊन पोटधरून हसणे, सिनेमाच्या गाण्यांच्या भेंड्या, सामूहीक खेळ, आपल्या ग्रुप वर असलेलं निस्सीम प्रेम…कुणाचही नाव न घेता सगळ्यांना आढनावाने हाक मारणे… हे सगळं आताही जसच्या तसं आठवतं…
मुकुंदा हा खरं तर सगळ्या विध्यार्थी वर्गाचं एक प्रातिनिधिक रुप असंच म्हणता येईल. शाळेतली सगळ्यात मस्तीखोर मुलं ही त्याची जिवाभावाची मित्र मंडळी, ते चौघेही वेगवेगळ्या स्तरातले, कुणी हुशार कुणी ढ, पण त्याचा त्यांच्या मैत्रीत कधीही ह्याचा प्रभाव नाही पडला, मन आणि वागणूक एकदम स्वछ आणि समान सगळ्यांसाठी…
आणखीही एक गोड विषय "प्रेम"
त्या लहान आणि अजाणत्या वयात असणारं ते प्रेम की आकर्षण हा मुद्दा वेगळा, ते ज्याचं त्याला ठाऊक पण त्या वयातला असणारा खूप रहस्यमय आणि गूढ तेवढाच गोड आणि प्रिय विषय… सगळ्यांना माहिती असायचं की कुणाची "लाईन" कोण, कोण कुणाला चोरून बघतं, पण त्या मुलाला किंवा मुलीला वाटायचं की आपलं हे गुपित फक्त आपल्यालाच माहितीये…
मुकुंदाला ती आवडायची खूप… पण त्याने तिला चार चौघांत कधीही हाक मारली नाही कींवा चिडवण्याचा प्रयत्न नाही केला, तो फक्त त्याच्या "लाईन" कडे चोरून बघणारा, बाईंनी तिला रागावलं तर त्याचा बदला म्हणून "अनुशासन पर्व" फळ्यावर लिहून मार खाऊन घेणारा, सिनेमाच्या भेंड्यात हार पत्करून घेणारा, गरज नसतांना आणि मित्र सोबत नसतानाही फक्त तिच्यासाठी म्हणून शिकवणी लावणारा, थंडीतही तिच्याशी बोलायला ताटकळत उभा असणारा, तिच्याशी बोलण्यासाठी काहीही करायला तयार असणारा, तिच्या घराचा पत्ता शोधायला मदत केल्यावर मित्राला इंग्रजी ची शिकवणी देणारा असा हा मुकुंदा…
असेच त्या लहान वयातही प्रेम करणारे आपल्याही आजूबाजूला होतेच ना… त्या वेळी वाटायचं की हा काय वेडेपणा, कधी ते करताहेत ते चांगल वाटलाही तरी आपण त्याला वाईट भावनेत बदलायचो. का?? कारण आपल्या मनावर हेच बिंबवलं असतं अगदी सुरवातीपासून (निदान तेव्हातरी पालक असेच सांगायचे… ) तेव्हा अश्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच पण चिडवायला लागायचो. पण "नरू मामा" मुकुंदा ला समजावताना म्हणतो ना की "घरून, बाहेरून, शाळेतून इतका विरोध असतांनाही ती किती धाडसाने प्रेम करते, आपण तर मानलं बुवा तिला, देश पुढे जातो तो अश्या धाडसी मुलामुलिंमुळेच"… तेव्हा वाईट वाटतं की आपणही त्या चिडवणाऱ्या मधलेच एक होतो, आपल्याला तेव्हा असं समजावणारा नरु मामा नाही ना भेटला…
आता काळ बराच बदललाय, मुला-मुलीने आपसात बोलणे कुठेही वाईट मानले जात नाही पण कुणाला चोरून बघणे, त्यांच्या एका ओळखीच्या हास्यासाठी जीवापाड कष्ट घेणे, ती पहिल्या प्रेमाची किमया आणि जे काही न बोलता व्यक्त करण्याची धडपड चालते ती आताही तशीच आहे. त्यात क्वचितच बदल झालाय…
"शाळा" चा शेवट तसा दुखःदच. मुकुंदाचे मित्र त्याच्यासोबत दहावीच्या वर्गात नसणार हे दुखः पचवण्याचा प्रयत्न करणारा तो, त्याची "लाईन" त्याला न सांगताच दुसर्या गावी निघून गेल्यावर बाहेरच्या दाराला धरून केविलवाण्या चेहेऱ्याने बंद कुलुपाकडे बघत, मागून जाणाऱ्या आणिबाणीच्या मोर्चा चूकवून निघून जाणारा मुकुंदा खरंच मन हेलावून जातो… आणीबाणी आणि त्याची परीस्थीती यात उगाच काहीतरी साम्य वाटून जातं...
दहावीच्या एका भयाण वर्षाला सामोरं जायचं तेही एकट्याने असं म्हणून जोरजोरात एकटाच रडणारा मुकुंदा आपल्याही डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही…
तो म्हणतो ना सिनेमात की :
त्या दिवशी मला कळले की, शाळेची मजा कशात आहे ते
इथं वर्ग आहे, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्र सुद्धा…
पण आपण त्यात कशातच नाही…
आपण त्या गायीच्या पाठीवर बसणाऱ्या पांढर्या पक्ष्यासारखे अगदी मुक्त आहोत…
ह्यांच्या शाळेत बसलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते, खास एकट्याचीच…
त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत, पण त्यातलं शिकण फार सुंदर आहे…
वाचनाचा अर्थ लावायचा तर ओळींच्या मधील रिकाम्या जागा वाचाव्यात असं म्हणतात... अक्षरं आणि रेषांच्या मदतीने मनातलं काही लेखणीत उतरवण्याचा हा फक्त एक छोटासा प्रयत्न...
सोमवार, ६ एप्रिल, २०१५
शाळा
मंगळवार, ३१ मार्च, २०१५
निरोप...
सिंधी मुलगी मारवाडी मुलगा,
मराठी मुलगा सिंधी मुलगी,
मुस्लिम मुलगा पंजाबी मुलगी,
पंजाबी (मुळचा मराठी ) मुलगा पंजाबी मुलगी,
बंगाली मुलगा पंजाबी मुलगी,
etc etc…
एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या ह्या कॉलेज मधल्या काही जोड्या…
त्यांना एकत्र बघूनच समोरच्याच मन खुश व्ह्यायचं इतक्या मस्त आणि खुशाल जोड्या…
खूप सारे क्षण, दिवस, महिने, दोन वर्ष एकत्र जगलेत त्यांनी…
बऱ्या वाईट दिवसांना एकमेकांची सोबत केली, आनंदाचे सोहळे एकत्र पार पाडले.
खूप जगले भरभरून…
पण टांगती तलवार डोक्यावर घेऊनच.
ती तलवार होती भीतीची, घरचे आपल्या नात्याला मान्य करणार की नाही? आपलं भविष्य सोबत असणार की नाही?
हे सारे प्रश्न च प्रश्न पण तरीही त्यांनी आपला वर्तमान काळ पुरेपूर जगून घेतला
कारण खूप आवडणारी कुणी व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी यालाही भाग्य लागतं आणि प्रेम हे परत परत होत नसतं हे त्यांच मत
ज्या व्यक्तीने आयुष्यभर आपली साथ द्यावी आणि आपल्या सोबत सात जन्म असावं असं वाटतं त्यांना निरोप देणे हे किती कठीण होत असेल?
पण त्यांनी निरोप दिला एकमेकांना…
कारण? घरच्यांचा विरोध, भांडणं, समाज मध्ये येत गेलं…
त्यांच्या लेखी ह्या सगळ्यांची गिणती नव्हतीच कधी, पण घरच्या लोकांच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याची इच्छाही नव्हती कदाचित…
आपल्या मुळे पालकांना कुणी बोट दाखवू नये, त्यांना अपमान सहन करावा लागू नये आणि त्यांच्या दुखःला कारण मिळू नये म्हणूनही कदाचित…
काय होत नेमकं त्यांच्या मनात हे त्यांनाच ठाऊक, ते वेगळे झाले.
त्यांचे सोनेरी स्वप्न एव्हाना धुसर झालेत…
आताही आठवतात त्यांचे वेगळे होतानाचे उदास चेहेरे, कॉलेज संपल्यावर आता पुन्हा कधीच अशी सोबत नसणार हे कळून चुकलेले चेहेरे,
एकमेकांसोबत फोटो काढत, वेगवेगळे हावभाव करत फोटो चा आनंद घेत, त्या आनंदात दुःखाची झालर स्पष्ट दिसून येत होती,
कसा असेल भविष्यकाळ कुणा दुसर्यासोबत? ते कल्पनाही नाही करू शकणार…
काही महिने उलटून गेलेत ह्या गोष्टीला…
आता बातम्या मिळत असतात कुणाच लग्न झालं, कुणी engage झालं, तर कुणाच्या लग्नाची गोष्ट सुरुये त्यांच्या घरात
आणि त्या तुटलेल्या जोड्यांपैकी सगळेच आता नवीन वाटेवर चालायला सज्ज झालेत
डोळ्यांत अश्रू घेऊनच पण धडपडताहेत त्या आठवणींसोबत जगण्यास किंवा त्यापासून दूर जाण्यासाठी…
ते कधीही विसरू शकणार नाहीत त्या सोबत जगलेल्या क्षणांना…
त्यातल्याच एकीसोबत बोलले काही दिवसांपूर्वी, ती म्हणाली मी उध्वस्त झालीये ह्या सगळ्याने, कशातच लक्ष लागत नाही, सारखा त्याचा चेहेरा डोळ्यांसमोर येतो, तिच्या घरी हा विषयही निघाला तरी तिचे पालक कुठल्या टोकाला जातील ह्याची भीती तिला काही करूच देत नाही, त्याच्या ही घरी अशीच काहीशी स्थिती… हे झालं एक उदाहरण, कमी अधिक फरकाने अशीच स्थिती बाकीच्यांचीही…
हेच मनाला समजावून ते सावरताहेत स्वःताला…
त्यांना नेहमी आठवेल ती जिवलग व्यक्ती एक आठवण म्हणून, अनमोल ठेवा म्हणून आणि आयुष्यातला एक धडा म्हणूनही आठवेल…
सोमवार, ३० मार्च, २०१५
शेवट...
प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच आणि तो कधी ना कधी येणारच हे निश्चीत... शेवटाशिवाय मजाही नाही कुठल्या गोष्टीला... अमर असणं किंवा होणं हे जरी खूप छान वा हँपनिंग वाटत असलं तरी त्यात काही रस नाही जगण्याचा...
कधीतरी आपलाही शेवट होणारच ह्या भितीपोटी म्हणा किंवा सत्याला स्विकारून म्हणा प्रत्येकजण येणाऱ्या क्षणाला जगण्यासाठी धडपडतो. त्यातच तर खरी मजा आहे... कुठल्या क्षणी शेवट आपल्या डोळ्यांसमोर येऊन उभा राहील सांगता येत नाही म्हणून क्षणांच सोनं करण्याचा हा प्रवास...
तसंच या क्षणभंगूर गोष्टी आणि घटनांचही...
शेवटाला धरुनच नविन सुरुवात होते पुढल्या पायरीची..
ती पायरी चढणं सुरवातीला अवघड वाटतं, पाउल उचलायला त्रास होतो पण नव्याचा प्रभाव आणि जुन्याच्या आठवणी ताण हलका करतात..
खरंतर कित्येक शेवटाला सामोरे जात इथवर आलोय आपण... असंख्य घटनांचे, मैत्रींचे, नात्यांचे, माणसांचे, जागांचे शेवट आपण जगलोय आणि जगून उरलोय पण तरीही नव्या शेवटाला मन घाबरतं, खजील होतं, आतून पार तोडून टाकतं, आणि आठवणींसोबत जगायला शिकवतं...
सोमवार, २९ डिसेंबर, २०१४
आपली माणसं...
काही आपली माणसं (नात्यांच बंधन नाही) नेहेमीसाठी आपल्याजवळच असतात, कितीही भौगोलीक अंतर असलं तरीही… त्या व्यक्ती आपल्याला आणि आपण त्यांना नेहमी हवेहवेसे वाटतो… आयुष्याचा प्रवास अखंड सुरूच असतो आणि आपण पुढे पुढे जात असतो… त्यात प्रत्येक रस्त्यावर नवीन ओळखी होत जातात, तसच प्रत्येक वळणावर काही सोडूनही जातात (काही इच्छेने तर काही नाईलाजाने). आपण आपला रस्ता धरून निघतो पुढे पुढे आणि आणखी पुढे. जिंकण्याच्या किंवा जगण्याच्या शर्यतीत मागे राहून गेलेल्या आपल्या माणसांकडे वळून बघण्याची तसदी क्वचितच घेतो… पण काही माणसं विसरता विसरत नाहीत, तिथेच असतात मनाच्या एका कप्प्यात दडून… वाट वेगळ्या झालेल्या असल्या तरी मने नेहमीसाठी जुळून असतात… ते नातं तसंच ताजं आणि टवटवीत असतं. कधीही गरज पडल्यास हक्काने मदत मागता येणारी, आपल्या कितीही मोठ्या संकटाच ओझ झटक्यात कमी करू शकणारी, आपल्या चेहेऱ्यावर कधीही हास्याची लहर आणू शकणारी ही माणसं… काहीजण तर अनेक वर्षांनी भेटल्यानंतरही जिथून सोडून गेलो होतो त्याच काळात असल्यासारखे वागतात, अगदी वयाची, वेळेची सगळी बंधनं विसरून… अश्या वेळी एक सुंदर नातं धूळ झटकून नव्याने परत चमकायला लागतं… त्याच तेजाने, त्याच आनंदाने, आणि त्याच उत्साहाने…
म्हणूनच, काही लोक आपल्यापासून दूर कधीच जात नाहीत…
ती तिथेच राहतात मनाच्या कप्प्यात घर करून…
आपण त्यांना बाहेर काढतही नाही आणि ते आपणहून जातही नाहीत…
एक कॉल, एक संदेश, किंवा एका हाकेने आपल्या आपलं आयुष्य पूर्णतः बदलू शकणारी ही माणसं…
प्रत्येकाचं आयुष्य अश्या व्यक्तींनी समृद्ध, श्रीमंत असतं… फक्त त्यांना सांभाळून ठेवणं गरजेचं असतं… आणि तो प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करतच असतो, हा आनंदाचा ठेवा जपून ठेवण्याचा...
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४
मोठे होत जाताना...
मोठे मोठे होत जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत असते,
की आपली "मोठे झाल्यावर मी हे मी हे करणार" ही लिस्टच हरवून जाते…
मग ती जाणीव होते की खूप काही त्या गेलेल्या वयात करायचे राहूनच गेले…
अगदी छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा कित्ती मोठ्या होत्या…
सगळ्यात पहिले मी हा विचार केलेला की मोठे होऊन मला गेट वर न चढता ते उघडता येईल.. म्हणजे कित्ती मज्जा…
पण जेव्हा मोठी झाले तेव्हा त्याची मजा नाही अनुभवली. एव्हाना ते विसरूनही जायला झालेलं की आपलं हे टार्गेट होत लहानपणी…
आणि आता ते गेट वर चढून गेट उघडणं, त्या गेट वर झुलत मागे येणारी आणि मग तेच २-३ वेळा रिपीट करत झुलणारी मी प्रकर्षाने आठवते मलाच…
उंच जागेवरून सामान उतरवताना ही तेच…
आता सहज हात पुरतो त्या जागेवर पण खुर्ची वर चढून कसरत करून काढणारे ते ताणलेले चिमुकले हात पाय आत्ताही तसेच आठवतात…
आपल्या पेक्षा मोठ्यांना मोठ्ठ होताना पाहिलेलं असत आपण,
त्यांना बघूनही आपली डोक्यातली सिक्रेट लिस्ट update होत असते, पण जेव्हा आपली पाळी आली ते एन्जॉय करण्याची तेव्हा आपण साफ विसरलेलो की असाही काही आपण विचार केला होता...
लहानपणी अंधाराची भीती फक्त यासाठी वाटायची कारण कुणीतरी राक्षस येउन आपल्याला मारून टाकेल किंवा आत लपलेली मांजर, पाल, झुरळ आपल्या अंगावर पडेल वगैरे.. आणि तेव्हा चक्क थोडीशी प्रकाशाची तिरीप आली तरी तेवढ्यावर आपलं छान भागायचं आणि त्या प्रकाशावर हातांचे हातवारे करत खेळायचो ही स्वतःशीच…
आता सर्वत्र भीतीच आहे, लक्ख प्रकाश आहे बाहेर आणि आतही पण तरीही मनातली भीती काही केल्या जात नाही …
पण एक गोष्ट तेव्हाही आणि आजही कायम आहे…
लहानपणी बाबा हेच जगातले सगळ्यात strong hero होते (कारण काहीही झालं तरी ते सांभाळून घेणारच)
आणि आई ही नेहमी हवी हवीशी वाटणारी आणि थोडीही दूर झाली की तिचा पदर धरून मागे मागे जाणारे आपण…
खूप दिवसांनी घरी गेल्यावर आईशी आताही काहीशे असेच वागतो...
आणि बाबा आपल्या आयुष्यात आहेत ही भावनाच एक बळ देते जगाशी लढण्याचं…
लहानपणी आपल्यापेक्षा मोठे बाहेर शिकायला गेलेले दादा ताई घरी आल्यावर भरभरून प्रेम करणारी त्यांची आई आपण पाहिलेली असते आणि तेव्हा आपणही घरी आलो की असंच होईल असं मनाशी पक्क वाटलेलं असतं. ते तसंच होतं आता आणि ते पूर्णपणे एन्जॉयही करतो आपण…
ह्या गोष्टी नेहमी अश्याच आपल्या सगळ्यांच्या जगात राहाव्यात कारण जगणं सुंदर करायला ह्या गोष्टीच पुरेश्या आहेत....
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४
...
जेव्हा जेव्हा मी स्वतः बद्दल विचार करते तेव्हा वाटते की मी खूप भाग्यवान आहे…
मला सगळं जेव्हाच्या तेव्हा मिळालंय,,, किंवा अस म्हणू शकते की जेव्हा गरज आणि योग्य वेळ होती तेव्हा सगळं काही मिळत गेलं…
कधी कशाची उणीव नाही भासली (जे आहे त्यात समाधानी राहण्याची शिकवणही मिळत गेली)… कधी कुठल्या एका गोष्टीसाठी रडत नाही बसावं लागलं…
समजूतदार पालक मिळाले… मी कधीही आई आणि बाबांना सारखं भांडताना नाही पाहिलं… ते नेहमी एकमेकांना समजून पुढे जात राहिले आणि त्यांच्या वागणुकीतून आम्हाला शिकवण देत राहिले…
शाळेतही कधी भीती नाही वाटली, दांड्या मारण्याची इच्छा नाही झाली कधी, शिक्षकाची, अभ्यासाची किंवा कशाचीच भीती नव्हती…
माझं जग खूप सुरक्षित होत, खूप श्रीमंत होतं (वागणूक, शिकवण, लोक ह्यांच्या मुळे)... माझ्या आजूबाजूची लोक, शेजारी, मित्र- मैत्रिणी, अगदी शेजाऱ्यांचे नातेवाईक, त्यांचे शेजारी सगळ्यांची खूप खूप सोबत आणि खूप प्रेम मिळालं…
कधी आईचा मार खाल्ला किंवा बाबा रागावले की शेजारच्या काकूंकडे हक्काने रडत जाता यायचं आणि मग त्यांनी प्रेमानी समजूत काढायची आणि घरी गेल्यावर आईच्या डोळ्यातले प्रेमळ भाव बघायला मिळायचे…
मला मिळालेल्या प्रत्येक बक्षीसाच पूर्ण कॉलोनी मध्ये झालेलं कौतुक…
शेजारच्या ताई, दादाच्या लग्नाचे पाहुणे आमच्याकडे आरामात राहिलेले आणि आम्हीही यजमानाचे कर्तव्य आनंदाने निभावलेले… घर फार छोट होत पण मनं फार मोठी होती. कधीही कितीही जास्त पाहुण्यांसाठी जागा कमी पडली नाही.…
शिकता शिकता सभोवतालचे प्रश्नही डोळ्यास पडत गेले आणि माझ्या अनुभवात भर घालत गेले…
सामाजिक बांधीलकी म्हणजे काय आणि मदत करण्याचा धर्म किती मोठा हे सुद्धा अनुभवाने आणि सभोवताली पाहिलेल्या दायाभावाने कळत गेलं… खूप खूप पुस्तकं वाचायला मिळाली…
वाचनालयात दर आठवड्याला एक तास फेरी, बागेत जायचं…
कितीतरी कॅम्पस, सहली, अभ्यासा व्यतिरिक्त खूप काही शाळेने दिलेले अनुभव…
सगळचं सभोवतालच जग सुरक्षित असलेलं, आणि कितीतरी लोक मला खूप काही शिकवून गेलेले…
माझं जग नेहमीच समृद्ध होत या सगळ्यांमुळे आणि आताही आहे …
प्रश्न हाच पडतो की हे असच समृद्ध आणि सुरक्षित जग मी माझ्या मुलांना देऊ शकणार का??
आताच्या बदलत्या जगात जिथे आपलेच शेजारी कोण हे माहित नसतं तिथे त्यांच्या जगातल्या लोकांशीही काही संबंध नाही येणार…
कसं सांगणार माझ्या मुलांना की एक घास सगळ्यांमध्ये वाटून कसा खातात??? कसं खरं वाटणार त्यांना की शेजारची काकू स्पेशल भाजीची एक वाटी आपल्यासाठी उरवून ठेवते आणि आवर्जून आणून देते… आपल्या इच्छांची, आवडीची काळजीही कुणी घेऊ शकतो, आणि या सगळ्यांचा परीकथेसारखा परिचय द्यावा लागेल बहुदा...
वाईट वाटतंय या गोष्टीचं की पुढे धावण्याच्या शर्यतीत किती मौल्यवान गोष्टींचा आपण ऱ्हास केला आणि कितीतरी गोष्टी ज्यांना अपरिचित ठेवलय आपण पुढच्या पिढीपासून…
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४
सहजंच सुचलेलं आणि काही ऐकलेलं…
काहीतरी शोधत असतात माणसं, सारखं अवती भवती...
त्यांना काहीतरी हवंच असतं, खूप वेगळ आणि खूप नवं…
पण काय हवयं नेमकं तेच कळत नाही…
काहीतरी असावं ना जवळ जे फक्त आपलच असावं…
फक्त आपलं ज्यात कुणाचाच वाटा नसावा…
मग धावतात ती पुढ पुढ… अंधारात
(किंवा उजेड जाणणारे असेल तर तेही)
काहीतरी लागतही त्यांच्या हातात पण कधीच तृप्त नाही करत त्यांच्या अपेक्षा…
काय हवंय मला???
पैसा, घर, प्रेम, प्रसिद्धी, हक्क, न्याय, वर्चस्व, कि समाजात मानाच स्थान???
याचाच विचार करता करता हरायलाही लागतात…
याउलट काही माणसं असतात,
जे हवंय तेच मिळवण्याची जिद्द असते त्यांच्यात…
हर एक दिशा साद देत असते त्यांना पण…
ते जातात तिथेच जिथे त्यांचा हट्ट असतो…
भांडतात, पडतात, चढतात, हरतात, पुन्हा चढतात…
अशी जगण्याची लढाई सुरु असतानाच ते मिळवतात त्यांच्या हक्काची गोष्ट
आणि समाज मग त्यांना नाव देतो आणि मानाचं स्थानही …
आजही ऐकलय असंच काहीतरी…
आणि कळल कि आपली विचारांची क्षमता जिथे संपते तिथूनच त्यांच्या जगण्याची सुरवात होते…
सरस्वती पूजन
आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...
-
आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...
-
समोर असलेलं पंचपक्वानांचं ताट, त्यातले पदार्थ काही गोड, काही तिखट, काही आंबट, तुरट इत्यादी चवीने पूर्ण.. सुरुवात कुठून करावी हा ही प्रश्न प...
-
चालता चालता कुणाचा तरी थकलेला आवाज कानी आला... "फारच दमायला झालंय का ग तुला? थोडा श्वास तर घे, एवढ्या घाईत चालायला काय झा...