गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

बदल

कालची हुरहूर आज नाही..  आजची चिंता उद्या नाही.. उद्याची छोटी छोटी स्वप्न वर्तमानात येऊन गेली तरी त्याची जाणीव नाही.. प्रत्येक दिवशी नवा बदल, नवी व्यक्ती आणि नव्याने होत चाललेली नव्या बदलाकडे होणारी वाटचाल...  

बदल प्रत्येक गोष्टीत - दिसण्यात, बोलण्यात, वागण्यात, विचारांत, आवडी-निवडीत, सगळ्यांत... कल्पनाही न होता गोष्टी पुढे पुढे जात आपलं स्वरूप बदलत असतात, त्यात रोजची भर पडते. आज जसे आहोत तसे उद्या नाही आणि उद्या जे असणार ते परवा नाही. नवंपण प्रत्येक हयात वस्तू आणि व्यक्तीला. हा बदल अबोलपणे किंवा नकळत अंगीकारत असतो आपण... वर्ष उलटत जातात आणि कळतं आपण बदलाचं किती अंतर गाठलंय ते...

पण आत असलेलं छोटंसं मन असतं ना ते नाही बदलत जास्त. ते तसंच लहान मुलांसारख.. थोडसं हळवं, थोडसं  खोडकर आणि काहीसं हट्टी पण पूर्ण प्रामाणिक.. क्वचित प्रसंगांचा आणि अनुभवांचा अपवाद सोडला तर ते फार कमी बदल करत असतं स्वतःत. त्याला बदलायला कारणं फार मोठ्ठी असावी लागतात. मनाने बदलायलाही नकोच कारण मनं निर्मळ असली की बदलाची चव काही निराळीच येते...

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

गणपती

तो येतो ढोल ताशांच्या गजरात...
उत्साहाच्या वर्षावात चिंब भिजलेली वर्दळ आणि राजाच्या थाटात येणारा तो...
त्याची नशाच वेगळी, वेड लावणारी...
त्याचं अनोखं रूप... सुपासारखे कान, लांब सोंड, भलंमोठं पोट आणि सोबतीला उंदीर... त्याच्या छटा वेगवेगळ्या, कलाकार अनोख्या पद्धतीने त्याचे रूप बदलतो पण सगळ्यांत तो मस्तच दिसतो...
नास्तिकालाही आनंदात सहभागी व्हायला भाग पाडणारी त्याची किमया...  सर्वांना एकत्रित करून दहा दिवस भक्तीच्या उत्सवात त्याच्यासोबत सगळे रमतात... तो सर्वांचा लाडका, जात-पात धर्म-पंथ राष्ट्रांच्या त्या सगळ्या सीमा त्याच्या साठी नसतातच... 
तो येण्या अगोदरच तो आलेला असतो खरंतर... त्याच्या येण्याची तयारी बऱ्याच आधी झालेली असते, त्याच्या कलाकृती आकार घेत असतात आणि त्यांची रंगरंगोटी सुरु झालेली असते, त्याचं स्वागत करायला वाद्यांचे पथक रात्रंदिवस मेहनत करत असतात, त्याच्या साठी सजवलेली जागा, प्रकाशयोजना सगळं झालेलं असतं आणि ती जागाही जणू वाट बघते त्याच्या येण्याची... आणि तो येतो...
तो घरा-घरात येतो, गल्ली-बोळ, चौरस्ता, मैदानात येतो, गरीब-श्रीमंत सगळ्यांच्या घरात येतो, त्यांनी आपापल्या परीने केलेल्या सेवेचं स्वागत करतो, भक्तांचे सुख-दुःख, त्यांचे  नवस, मागण्या ऐकून घेतो, त्याच्या समोर सादर केलेल्या कलाकृतींचा आस्वाद घेतो, एकंदरीत तो आपलाच होऊन राहतो.... घराघरांत मोदक आणि प्रसादाचे सुगंध दरवळतात, आरतीेचे आवाज आणि घंटानाद होतो, पाहूण्यांची वरदळ, हार-फुलांच्या सजावटी, दिव्यांची आरास आणखी बरंच काही... त्याच्या सोबत खूप रमत गमत १० दिवस भरकन निघूनही जातात.. निरोपाच्या मिरवणुकीत धुंद होऊन नाचणं, गर्दीसोबत अखंड दूरवर चालत जाणं आणि ते जड मनाने निरोप देणं... जाताना सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी देऊन आणि सोबतीला एक रितेपण देऊन तो निघून जातो...
तो कित्येक वर्षांपासून येतोय... लोक बदलली, काळ बदलला, आनंद व्यक्त करण्याच्या तऱ्हा बदलल्या, प्रत्येक गोष्टीत नवनवीन बदल झाले, पण तो आनंद, ती हुरहूर, त्याच्या साठी वाट बघणं, तो उत्साह अजूनही तसाच आहे आणि पुढेही असाच राहणार कारण तो ही कुठे बदललाय???

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

देऊळ

देऊळ

कधीही देवाची आणि देवळाची आठवण आली की नजरेसमोर येणारं त्याचं ठिकाण डोक्यात पक्क बसलंय... त्यातला देव निवांत आणि डौलात उभा असलेला, चंदेरी रंगाने रंगवलेले त्याचे डोळे आणि नजरेला भिडणारी ती नजर ज्यातून तो नेहमी आपलाच आहे असा होणारा भास... त्याचं ते घर, खूप काही मोठ्ठ नाही, त्याला सोन्या-चांदीची किनार नाही, त्याच्या समोर भक्तांची भली मोठी रांग नाही, एकंदरीत तो खूप श्रीमंत घरात राहत नाही... त्याचं छोटंसं घर, ते आहे एका शांत जागी, बांधणाऱ्याने ते सवडीत तर बांधलं आहे पण त्याच्या आणि आसपासच्या लोकांच्या भक्तिभावाने जेवढं भांडवल जमलं तेवढ्यावरच... ते खूप जुनं असल्याचं त्याच्या बांधकामावरून दिसतंच आणि त्यावरूनही ते शेंदूर किंवा तेलाची बोटं पुसून काळपट झालेल्या भिंतींवरूनही दिसतं... देऊळवर छोटा का होईना पण कळस थाटात असलेला, त्याच्या आत झाडून पुसून स्वच्छ केलेली जागा, आतली थोडी थोडकी सामग्री, पोथी आणि कीर्तनाचं सामान एका पेटीत आपापल्या जागी नीट ठेवलेलं, भिंतींवर लावलेले आणखी देवांचे फोटो... त्याच्याभोवतीची झाडं वर्षानुवर्षे उभी असल्याने आपला जम बसवून मनसोक्त वाढलेली आणि त्यांच्या मुळांचा व्यापही खूप दूरवर पसरलेला, त्यामुळं भेगा गेलेला झाडांच्या सभोवतालचा चौथरा... त्याच्या मागे लागून असलेली शेतं आणि पुढे छोटी-मोठी घरं, ह्या देऊळात पुजारी असेलच असं काही गरजेचं नाही कारण त्याच्या सेवेचा वाटा सगळेच उचलतात... सणासुदीला होणारी थोडीअधिक गर्दी वगळली तर निर्मनुष्य आणि शांततेत डुंबलेलं ते देऊळ... 

अश्या देवळात असलेला देव नेहमीच प्रसन्न, आनंदी राहतो... अपेक्षा आणि प्रथार्थनेनं लादलेला तो नसतोच... त्याच्या मागे सततच्या मागण्या नाही किंवा पूर्ण करायला दिलेल्या नवसाच्या deadlines नाहीत... पेंडिंग कामं फारच कमी... मस्त मजेत उभं राहायचं, आसपासच्या भक्तांचं प्रेम घ्यायचं, त्यांच्या थोड्या थोडक्या मागण्या असतात त्यांना पूर्ण करायचं, त्यांचं मनोबल आणि विश्वास टिकवून ठेवायचा, त्यांचे लहानसहान गाऱ्हाणे ऐकायचे, आणि आपल्या मुलांप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं... कधी कधी होणाऱ्या कीर्तनांनी मंत्रमुग्ध व्हायचं, दिवस त्यांच्या दैनंदिन कामांच्या हालचाली न्याहाळण्यात घालवायचा, सुगीच्या दिवसांत शेतकऱ्यांच्या आनंदाने प्रसन्न व्हायचं आणि कापणीचा पहिला हिस्सा ते जेव्हा त्याच्या समोर आणून ठेवतात तेव्हा तोंडभरून त्यांना आशीर्वाद द्यायचा...  

ह्या देवळाचा चौथरा म्हणजे गप्पांचा फड जमण्याचं हमखास ठिकाण... राजकारण, इतिहास, भूगोल, खेळ, सिनेमा सगळ्यांवर आपलं मत मांडण्याचं व्यासपीठ... सायंकाळ ह्या चर्चेत गेल्यावर दिवा लावून आणि आरती करून प्रसन्न मानाने सगळे देवाला निरोप देतात... त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेऊन झोपी गेलेल्या भक्तांची काळजी घेण्यास तो मोकळा होतो... पुन्हा एक रम्य सकाळ जगायला आणि जगवायला... हेच ते आठवणीतलं देऊळ...

मंगळवार, २४ मे, २०१६

गोष्ट

गोष्ट... अगदी लहानपणीच ओळख झाली तिच्याशी… ती सुरु झाली आटपाट नगरापासून… त्या आटपाट नगरात असलेला मोठ्ठा महाल, राजा, राणी, राजकुमारी, राजकुमार, राक्षस, तांत्रिक, दरोडेखोर, चोर, प्राणी-पक्षी (गोष्टीत ते ही बोलायचे ), नदी, समुद्र, इत्यादी… त्यानंतर आलेले लाकूडतोड्या, आजीबाई आणि भोपळा, चिंटू, चंपक, शेरखान, मोगली, कितीतरी… यादी बरीच लांब आहे…या साऱ्या काल्पनिक पात्रांच्या सहवासात  कधी मोठे होत गेलो कळलंच नाही… ह्या साऱ्यांना ऐकतांना किंवा वाचतांना जगाचं भान नसायचं… 

गोष्ट… तिने आपल्याला कितीतरी स्वप्न दाखवली, स्वप्ने बघायला शिकवली, रात्रीची गोड झोप तिच्यामुळे खूप गोड झाली, तिने चांगल्या आणि वाईटाचा फरक नकळत शिकवला, खूप काही लोकांची खूप रंजक चित्रे तयार केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिने जगायला शिकवलं… ती नसती तर??? विचार करता येईल? बहुदा नाहीच… ती बदलणाऱ्या वयानुसार आणि काळानुसार बदलत गेली, आपल्यासोबत मोठी सुद्धा होत गेली… 

तर अश्या ह्या गोष्टीला घडायला काही व्यक्तिरेखा, काळ, वेळ, विशिष्ट ठिकाण असं सगळं कमी अधिक प्रमाणात लागतं. कधी कधी तर हे सुद्धा लागत नाही, खरतर तिच्या काही विशिष्ट मागण्याच नसतात, ती कुठूनही सुरु होते… कुण्या एका काळी… Once upon a time... गोष्ट आकार घेताना थोडी आळसावलेली असते, तिच्यात सामावलेल्या पात्रांना ती जागं करत असते आणि म्हणून तिची सुरवात ही संथ गतीने होते, हळूहळू ती एक काल्पनिक जग तयार करायला सुरवात करते, मग काही प्रसंगातून हसवते, कधी डोळ्यात पाणी आणते, उत्सुकता ताणून ठेवते, कधी कंटाळवाणी पण वाटते पण स्वतःत गुंतवून ठेवते… तिच्यातील पात्रांचे आभास होतात, त्यात आपण स्वतःला बघायला लागतो, त्यांच्या प्रमाणे विचार करायला लागतो, उगाच कुणासाठीतरी दुःखी होतो, कधी आनंदात टाळ्याही वाजवतो, आपल्या आयुष्याचा त्याच्याशी ताळमेळ लाऊन बघतो, मध्येच कुठे खंड पडलाच गोष्टीत तर त्याच आभासाच्या जगात काही काळ वावरतोही… 

ती वेड लावते, तल्लीन होऊन ऐकायला भाग पाडते आणि एका टप्यावर येउन ती थांबते. आपल्यासाठीचा शेवट आलेला असतो. शेवट कधी गोड, कधी कडू, कधी धक्का देणारा, हलवून टाकणारा, तर कधी काय वाटतंय नेमकं तेही न उलगडणारा…  
ती कुठून तरी सुरु होऊन कुठे तरी संपते. कधी बदलत्या काळानुसार तिच्यात नवी पात्र येतात आणि पुन्हा ती नवी होत जाते... 

आता ती लहानपणीची गोष्ट नसली तरी आताही दिवसभर गोष्टींचा क्रम लागलेलाच असतो, कुणीतरी सांगितलेली, कुठेतरी वाचलेली, स्वतः अनुभवलेली आणि आपल्या बरोबर घडत जाणारी गोष्ट… आपल्या गोष्टींच्या साठ्यात नेहमी काही न काही भर होतंच आहे आणि राहीलही…
गोष्ट आपल्या आधीही होती आणि पुढेही अशीच राहणार… तिचं रूप बदलेलं असेलही आता पण मनात बसलेली ती भरभरून जगलेली गोष्ट नाहीच बदलणार कधी… "एक आटपाट नगर होतं…" किंवा "बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे..." हे जरी कुठे ऐकलं ना तर आताही धावत जाऊन तिला ऐकायला लागू आपण… ही अशी आहे गोष्टीची जादू…  

मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

बदल

क्षणात बदलणारे भास, क्षणात बदलणाऱ्या भावना, बदलणारी ओळख, परिचय, हावभाव, आसपासची बदललेली पात्र आणि बदलून जाणारं आयुष्य… ह्या साऱ्या गोष्टी कोणत्या वेळी आणि कश्या अचानक बदलतील नाहीच सांगता येत.. कारण कधी कधी तर एक क्षणच पुरेसा असतो हे सगळं घडून जायला...
उन्हातून चालता चालता अनपेक्षित सावली पसरावी सर्वत्र तसाच हा बदल... हे असे बदल घडून येतात, बरेचदा अचानकच.. जाणीवही न होऊ देता एक एक वळण घेत जातं आयुष्य... आणि त्यातून जाताना कळतही नाही की काही दिवसांपूर्वी अनुभवत असलेले सारे काही १८० च्या कोनात पालटून गेलेले आहे, सगळं आयुष्यच वेगळं दिसायला लागतं...
खरतंर आपल्या अपेक्षा असतात येणाऱ्या दिवसांपासून, आनंदाच्या, अनुभवाच्या, यशाच्या आणि आणखी बऱ्याच काही.. पण नकळत होत जाणारी बदलाची वृद्धी एवढी होते की विसरायलाच होतं आपल्यालाही हा बदल हवा होता.. आणि आपण हे अपेक्षीत असलेले आणि अनपेक्षीतपणे समोर आलेले बदल आवडायला ही लागतो… आपल्याही नकळत...

गुरुवार, ३१ मार्च, २०१६

घर

आपलं घर… ज्यात खेळून बागडून आपण लहानाचे मोठे झालेलो असतो ते घर… घरातली एक एक वस्तू, त्यातला प्रत्येक कोपरा, भिंती, खिडक्या दरवाजे, अंगण, झाडं सुद्धा आपल्याला ओळखून असतात.. आपल्याला भेटताच ओळखीचं हसतही असतील ही सारी मंडळी कारण त्यातल्या प्रत्येकासोबत आपली वेगळी गुपितं आणि वेगवेगळ्या आठवणी असतात...
कुठेतरी वाचलेलं आठवतंय की "घर म्हणजे चार भिंती आणि एक छत एवढंच नाही तर त्यात एक वास्तुदेवताही वास करत असते"… अगदी खरंय, तिचा आशीर्वाद असतोच नेहमी पाठीशी आणि जर घराला जीव असता तर त्याने आलिंगनच दिलं असतं प्रत्येक भेटीत आणि लाडही केले असते भरपूर...
घरापासून दूर जाताना त्यातल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात…आपल्या चिमुकल्या पावलांनी चालायला शिकलो ते घर, ज्या उंबरठ्यावर अक्षरं गिरवत लिहायला शिकलो ते घर, जिथल्या भिंतींबरोबर टक्कर होऊन दुखापत झालेली असते ते घर, जिथल्या जिन्यावर, गच्चीवर आणि आसपास लपंडाव खेळलेलो असतो ते घर, जिथे रडलो, भांडलो, भरपूर हसलो, आणि नात्यांना भरभरून जगलो ते घर… कित्येक कडू-गोड क्षण, समारंभ, सारे सण, उन्हाळे-पावसाळे सगळे येथूनच तर अनुभवलेले असतात...
घरातली लोकं जेवढी हवीहवीशी वाटतात तेवढाच घरावरही जीव असतो आपला आणि ते जाणवतही नेहमी. ह्याची एक तुलना करायची झाली तर जेव्हा बाहेर भेट होते तेव्हाचा आनंद आणि त्यांनाच घरी भेटतो तो आनंद यात फार फरक आहे, कारण त्यात घरचे लोक तर असतात पण घर नसतं… 
आपल्याला जेवढा घराचा जिव्हाळा असतो तेवढाच घरालाही असतो... त्यालाही आपली आठवण येते... कधीही घरी गेल्यावर तोच विशिष्ट सुगंध, आपुलकीचे मंद वारे, प्रत्येक हालचालीत होत असलेला ओळखीचा भास आणि निरीक्षणात आढळलेला घरातला थोडा बदल... वाटतं की घर प्रेमाने मिठीत घेतंय आपल्याला… आपल्यातला बदल जसा घरच्यांना कळतो तसाच घरातला बदलही लगेच कळतो आपल्याला आणि जाणीव होते की बदल त्यालाही हवा होता… तरीही घरात जुन्याच्या खाणाखुणा शोधतोच आपण, कारण त्यांना आपल्या आठवणीही बिलगलेल्या असतात…
असं घराचं घरपण, हवहवसं वाटणारं आणि नेहमी साद घालणारं…

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

नदी

खळखळ वाहणाऱ्या प्रवाहाने जन्म घेणारी नदी… स्वतःच्या मनाप्रमाणे मनसोक्त वाहणारी... पाण्याचा एका लयीत आवाज करत, नागमोळी वळणं घेत ती निघते एका लांब प्रवासाला… कधी संथ वाहत तर कधी रुद्र रूप धारण करून वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूला उध्वस्त करत जाणारी… नदी म्हणजे समृद्धीचं प्रतिक, ती आसपासच्या परिसराला समृद्ध करत पुढेच पुढे जात असते आणि त्याची ग्वाही तो परिसरही देत असतो…
उन्हाळ्यात मात्र तिच्या सौंदर्याला उतरती कळा येऊ लागते. तिचं भव्य पात्र पाण्याविना भकास वाटू लागतं. सारी सृष्टी जेथे सूर्याच्या प्रखर तेजाने तापलेली असते तेथे नदीचं पाणीही वाफ होणारंच. एखाद्या गर्भश्रीमंत माणसावर गरीबीचे दिवस बघण्याची वेळ यावी तशीच स्थिती नदीचीही होते…
एकेकाळी खळखळ वाहणारं पाणी कुठल्याश्या डबक्यात निपचित पडलेलं असतं… मोठमोठे खडक, काही लहान मोठ्या आकारात तयार झालेले तळे, नव्याने उगवलेली झाडी, किनाऱ्यावर ओळीने लावलेल्या होड्या, रात्री पेटवलेल्या शेकोट्यांचे अवशेष, खूप तापणारा सुर्य आणि सर्वत्र पसरलेली वाळू… कधीकाळी असलेल्या श्रीमंतीची आठवण काढत ह्या सगळ्या वस्तू उन्ह अंगावर घेत असतात…
नदी अश्या वेळी गजबजलेली नसतेच. ह्या शांततेत एखादा आशावादी मच्छिमार त्यातल्याच एका मोठ्या डबक्याच्या काठावर बसलेला, किनाऱ्यावर फिरणारे प्राणी, थोड्याक्याच का असेना पण पाण्यात उड्या मारणारी किंवा वाळूत खेळण्यात मग्न असलेली आसपासची काही उनाड मूलं, कधी कधी अस्थि विसर्जन करण्यास आलेला ५ - ६ लोकांचा समूह, झाडांच्या थंड सावलीत विसावलेली लोकं, दुपारचा विरंगुळा म्हणून काही गावकरी पत्यांचा फड रंगवत झाडाच्या आडोश्याला बसलेली आणि कधी नदीच्या निर्मनुष्य जागेचा आसरा घेऊन भटक्या आणि फिरस्ती वर असलेल्या लोकांनी आपलं बिऱ्हाड बसवलेली…
उन्हाळ्याचा प्रभाव असला तरीही नदीची भव्यता कमीही होत नाही, तिच्या बाजूने जाणारी किंवा तिच्यावर बांधलेल्या पूलावरून प्रवास करणारी वर्दळ जाताना तिच्याकडे डोळे भरून बघते, तेथे वाहणारी थंड हवा अंगावर घेत दूर पर्यंत तिचं दर्शन घेते, आणि मनात तिच्या पाणी भरलेल्या पात्राची आठवण काढत समाधानाने पुढे जाते कारण नदी पुन्हा एकदा भरणार असते, परत जुने दिवस नव्याने येणार असतात आणि समृद्ध होऊन ती परत एकदा वाहणार असते… मागचे सगळे दिवस विसरून ती पुन्हा जगणार असते…

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

सूर्यास्त…

रंगांना उधळून टाकत, स्वतःजवळ जे काही आहे ते सगळं जगाला देत घेतलेला एक निरोप...
येताना जेवढी प्रसन्नता आणि आनंद घेऊन तो येतो, जाताना तेवढीच खिन्नता देऊन जातो. तरीही ह्या दोन्ही घटना रम्य…
येताना त्याची कोमल किरणं अंधाराला चिरत येतात, आकाशातील ताऱ्यांना निरोप देत एका नव्या दिवसासाठी त्याचं आगमन होतं, त्याची किरणं साऱ्या सृष्टी वर पसरतात, डोंगर दर्या, नदी, समुद्र, सारं काही चकाकून जातं, नव्या दिवसाला सज्ज होतं… दिवसभर मग तो आपल्या तेजाचं प्रदर्शन मोठ्या गर्वाने करतो. सगळीकडे पसरलेलं त्याच तेज नजरेआड करूच शकत नाही... ढगांच्या आड लपत, उन सावलीचा खेळ खेळत तो दिवसभर रमतो, आणि खेळ झाल्यावर आई मुलांना घरी बोलावते तेव्हा हिरमुसला चेहेरा करून परत जाणाऱ्या मुलांसारखा तो ही जातो, काहीशी खिन्नता सगळीकडे पसरवून…
त्याचं येणं जसं थाटात तसंच त्याचं जाणही… स्वतःला उधळून देतो तो… निरनिराळ्या रंगांच्या छटा तयार करत हळूहळू सौम्य होत एक एक किरण परत घेत तो निघतो. एवढा किरणांचा पसारा आवरायचा तर वेळ लागणारच, तो वेळ म्हणजेच सूर्यास्त…
एखाद्या शांत ठिकाणी बसून फक्त त्याचं जाणं बघतं बसलं की आपल्याही आत एक शांततेची आणि पूर्णतेची जाणीव घर करू लागते…
सूर्योदय बघणं कौतुकाचा विषय असला तरी हा असा सूर्यास्त बघणं आणि त्याची जाणीव होत जाणं आपल्याला आतून खूप काही देऊन जातं…
त्याचा हा क्रम सुरूच आहे वर्षानुवर्ष... तो उगवतो ते ही कुठेतरी मावळूनच... डोळ्यांत उद्याची स्वप्न देऊन सगळीकडे अंधाराच्या अस्तित्वाला मुभा देऊन निघून जातो, कालची बघितलेली स्वप्न साकार करण्याची संधी आणि नव्या जोमाने जगण्याची उमेद घेऊन पुन्हा उगवण्यासाठी…

आवाजातली जादू...

कधी कधी कुणाचा आवाज ऐकून एक वेगळाच आनंद होतो. वाटतं की बोलतच राहावं त्या व्यक्तीशी.. मग तो आवाज कुणाचाही असो, आपल्या आवडत्या व्यक्तीचा, परीचयातला, नेहेमीच बोलणं होणाऱ्यांचा किंवा अगदी अनोळखी व्यक्तीचाही...
आवाजातली खोली आणि त्यातल्या भावना, चेहेऱ्या वरच्या खाणाखुणा न बघतही ओळखता येतातच. त्याच्याही निराळ्या छटा असतात, कधी राग, कधी वेदना, कधी प्रेम, कधी कणव, कधी आपुलकी, कधी जबर, कधी उद्धट, द्वेष, हेटाळणी, कितीतरी…
पण प्रत्येक आवाज वेगळा, आवाजातले चढ उतार वेगळे, आणि त्यातलं वजन वेगळं...
आवाजाला जेव्हा नेमके आणि साजेसे शब्द मिळतात तेव्हा काय वर्णावे? कधी तर आवाज ऐकण्यासाठीच आपण जाणून संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याही नकळत..
आवाज मनाला भिडतात, आणि मग मन त्याचा पाठलाग करतं, ते प्रत्यक्ष ऐकलेले असोत वा अप्रत्यक्ष.
अशी आवाजाची निराळी दुनिया.. प्रत्येकाची आपापली वेगळी आणि अनोखी, त्यातला ठेवा आणि त्यातले विविध सुरातले आवाजही वेगळे आणि त्यांना पुन्हा पुन्हा ऐकण्याची हुरहूरही वेगळीच…

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...