गोष्ट... अगदी लहानपणीच ओळख झाली तिच्याशी… ती सुरु झाली आटपाट नगरापासून… त्या आटपाट नगरात असलेला मोठ्ठा महाल, राजा, राणी, राजकुमारी, राजकुमार, राक्षस, तांत्रिक, दरोडेखोर, चोर, प्राणी-पक्षी (गोष्टीत ते ही बोलायचे ), नदी, समुद्र, इत्यादी… त्यानंतर आलेले लाकूडतोड्या, आजीबाई आणि भोपळा, चिंटू, चंपक, शेरखान, मोगली, कितीतरी… यादी बरीच लांब आहे…या साऱ्या काल्पनिक पात्रांच्या सहवासात कधी मोठे होत गेलो कळलंच नाही… ह्या साऱ्यांना ऐकतांना किंवा वाचतांना जगाचं भान नसायचं…
गोष्ट… तिने आपल्याला कितीतरी स्वप्न दाखवली, स्वप्ने बघायला शिकवली, रात्रीची गोड झोप तिच्यामुळे खूप गोड झाली, तिने चांगल्या आणि वाईटाचा फरक नकळत शिकवला, खूप काही लोकांची खूप रंजक चित्रे तयार केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिने जगायला शिकवलं… ती नसती तर??? विचार करता येईल? बहुदा नाहीच… ती बदलणाऱ्या वयानुसार आणि काळानुसार बदलत गेली, आपल्यासोबत मोठी सुद्धा होत गेली…
तर अश्या ह्या गोष्टीला घडायला काही व्यक्तिरेखा, काळ, वेळ, विशिष्ट ठिकाण असं सगळं कमी अधिक प्रमाणात लागतं. कधी कधी तर हे सुद्धा लागत नाही, खरतर तिच्या काही विशिष्ट मागण्याच नसतात, ती कुठूनही सुरु होते… कुण्या एका काळी… Once upon a time... गोष्ट आकार घेताना थोडी आळसावलेली असते, तिच्यात सामावलेल्या पात्रांना ती जागं करत असते आणि म्हणून तिची सुरवात ही संथ गतीने होते, हळूहळू ती एक काल्पनिक जग तयार करायला सुरवात करते, मग काही प्रसंगातून हसवते, कधी डोळ्यात पाणी आणते, उत्सुकता ताणून ठेवते, कधी कंटाळवाणी पण वाटते पण स्वतःत गुंतवून ठेवते… तिच्यातील पात्रांचे आभास होतात, त्यात आपण स्वतःला बघायला लागतो, त्यांच्या प्रमाणे विचार करायला लागतो, उगाच कुणासाठीतरी दुःखी होतो, कधी आनंदात टाळ्याही वाजवतो, आपल्या आयुष्याचा त्याच्याशी ताळमेळ लाऊन बघतो, मध्येच कुठे खंड पडलाच गोष्टीत तर त्याच आभासाच्या जगात काही काळ वावरतोही…
ती वेड लावते, तल्लीन होऊन ऐकायला भाग पाडते आणि एका टप्यावर येउन ती थांबते. आपल्यासाठीचा शेवट आलेला असतो. शेवट कधी गोड, कधी कडू, कधी धक्का देणारा, हलवून टाकणारा, तर कधी काय वाटतंय नेमकं तेही न उलगडणारा…
ती कुठून तरी सुरु होऊन कुठे तरी संपते. कधी बदलत्या काळानुसार तिच्यात नवी पात्र येतात आणि पुन्हा ती नवी होत जाते...
आता ती लहानपणीची गोष्ट नसली तरी आताही दिवसभर गोष्टींचा क्रम लागलेलाच असतो, कुणीतरी सांगितलेली, कुठेतरी वाचलेली, स्वतः अनुभवलेली आणि आपल्या बरोबर घडत जाणारी गोष्ट… आपल्या गोष्टींच्या साठ्यात नेहमी काही न काही भर होतंच आहे आणि राहीलही…
गोष्ट आपल्या आधीही होती आणि पुढेही अशीच राहणार… तिचं रूप बदलेलं असेलही आता पण मनात बसलेली ती भरभरून जगलेली गोष्ट नाहीच बदलणार कधी… "एक आटपाट नगर होतं…" किंवा "बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे..." हे जरी कुठे ऐकलं ना तर आताही धावत जाऊन तिला ऐकायला लागू आपण… ही अशी आहे गोष्टीची जादू…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा