शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा करायचे). त्यात पूर्ण वर्गाने मिळून आपापसात पैसे गोळा करायचे, जी वर्गणी गोळा झाली त्यात वर्गाची सजावट, प्रसाद, खाण्याचे पदार्थ आणि भेटवस्तू इत्यादी जमल्यास ते बसवायचं.. वसंत पंचमी च्या दिवशी किंवा पुढे मागे हा कार्यक्रम केल्या जायचा..

ह्या कार्यक्रमाची जबाबदारी अर्थात वर्ग प्रमुख आणि उप-प्रमुखाची असायची, ती दोघं सगळ्यांना कामं नेमून द्यायचे आणि त्याच्या प्रमाणे सर्व ती जबाबदारी पार पडायचे. ह्या साऱ्याची तयारी १०-१२ दिवसांआधी सुरु व्हायची, पूर्ण वर्गात जणू उत्सवाचं वातावरण असायचं. नाश्ता किंवा जेवण जे वर्गणीच्या आकड्यात बसायचं त्या नुसार कोण-कोण काय-काय पदार्थ बनवून आणेल ते ठरायचं (त्या साठी आधी घरी आई तो पदार्थ बनवून देईल का ते विचारून मगच दुसऱ्या दिवशी ती विद्यार्थिनी नक्की करायची).
वर्ग सजावटीचं काम सगळ्यांनी मिळून केलं जायचं, त्यात कुणी रंगीत पट्ट्यांची माळ बनवायचे, कुणी फुलांची सजावट, झाडांच्या छोट्या छोट्या कुंड्या तर कुणी घरून ओढण्या इत्यादी सामान आणून त्याची सजावट करायचे.. हे सगळं काम चित्रकलेचा, क्राफ्ट किंवा पी.टी. च्या तासाला त्या त्या शिक्षकांची परवानगी घेऊन करायला घ्यायचं.
पूजेच्या दिवशी वर्ग झाडून पुसून स्वच्छ करायचा, बाक सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे जेणेकरून जागा मोकळी राहील आणि कार्यक्रम सुटसुटीत होईल. दारात छान रांगोळ्या काढायच्या, सरस्वती च्या फोटोची मांडणी, पूजेची सजावट, हार आणि फुलं आणून आणायची आणि फळ्यावर सरस्वतीचं चित्र काढायचं (कुणा दुसऱ्या वर्गातल्या मुलीला रांगोळी आणि चित्र छान जमत असेल तिलाही आपल्या कार्यक्रमात बोलून घेण्यात यायचं). ही तयारी लवकर लवकर आटोपून घरी जाऊन छान सजून परत यायचं, तोपर्यंत सगळ्या विद्यार्थिनी सजून आलेल्या असायच्या. त्या दिवशी शाळेचा गणवेश नसून रंगीत कपडे घालायला परवानगी असायची.
पूजेला शाळेतील सगळ्या शिक्षकांना एक दिवस आधीच आमंत्रण द्यायचं, ते आले की वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापिका ह्यांच्या हस्ते पूजा करून घ्यायची, सगळ्यांनी मिळून सरस्वतीचं गाणं आणि आरती म्हणून प्रसाद खायचा आणि त्या नंतर जेवण / नाश्ता करून कार्यक्रम संपन्न व्हायचा आणि सुट्टी होऊ सगळे आपापल्या घरी परतायचे..
ज्यांच्या कडे खाण्याच्या पदार्थाची जबाबदारी असायची त्यांनी स्वतः सायकल वर डब्बे मांडून चालत-चालत तोल आणि डब्बे सांभाळत आणायचे आणि रिकामे डब्बे कार्यक्रम संपल्यावर परत तसेच मांडून न्यायचे.. उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळे तापतं ऊन आणि त्या उन्हातून सायकल वर मांडलेले डब्बे वाजवत गप्पा करत चालतच घरी जायचं.. तो दिवस मजेतच संपायचा.. एका वर्गात सकाळी आणि दुपारी असे दोन वर्ग भरायचे तेव्हा दुसऱ्या वर्गाला छान सजलेला वर्ग मिळायचा..
प्रत्येक वर्गाचा असा हा स्वतंत्र कार्यक्रम वर्षातून एकदा व्हायचा.. ज्या वर्गाचा कार्यक्रम असायचा ते तर आनंदात असायचेच पण बाकी वर्गातील विध्यार्थीनी सगळं निरीक्षण करत असायचे, कुणी कसं सजलंय, वर्ग कसा सजवलाय, खाण्याचे पदार्थ काय ठेवले असणार, दारात रांगोळी कशी काढली ह्यापासून सगळंच.. तो एक दिवस तर धमाल असायचीच पण त्या आधीचे दिवस सुद्धा तयारी आणि जमवाजमव करण्यात मजेत जायचे.. कोणत्या वर्गाची पूजा सगळ्यात छान झाली हे सुद्धा निरीक्षण व्हायचं त्यामुळे सगळे आपापल्या परीने प्रयत्न करायचे..
ह्या सगळ्यातून जबाबदारीची जाणीव, नियोजन, मिळून काम करणे आणि कार्यक्रमाचं व्यवस्थापन आपोआप शिकता यायचं..

पंचपक्वानांचं ताट

 समोर असलेलं पंचपक्वानांचं ताट, त्यातले पदार्थ काही गोड, काही तिखट, काही आंबट, तुरट इत्यादी चवीने पूर्ण.. सुरुवात कुठून करावी हा ही प्रश्न पडतो कधी, पण सवयीप्रमाणे काही जण आपल्या आवडीचा पदार्थ शेवटी खाण्यासाठी राखून ठेवतात. तो पदार्थही बऱ्याचदा असा असतो की जेवताना एकदाच वाढण्यात येतो.

आपल्याला सवय असते जे काही नावडतं असेल ते पहिले संपवून शेवटी आपल्याला आवडणारा आणि ज्याची चव जिभेवर रेंगाळत राहावी असा पदार्थ आरामात मिटक्या मारत खावा. तसं जेवताना एक डोळा किंवा बारीक नजर त्या पदार्थाकडेच असते. आतून आपण खुश होत असतो आणि तो शेवट आपल्या मनात रुंजी घालत असतो. मस्तीखोर मित्रांमध्ये किंवा भावंडांमध्ये बसल्यावर तर कधी कधी त्या वाटीवर हात ठेवून जेवण उरकत असतो जेणेकरून कुणी तो पदार्थ पळवू नये..

पण बऱ्याचदा असं होतं की ताटातलं बाकीचं जेवण संपवण्याच्या नादात आवडीच्या पदार्थासाठी भूकच शिल्लक राहिलेली नसते. मग ते नंतर खाऊ, बांधून घेऊ आणि घरी जाऊन खाऊ किंवा घरीच असेल तर राखून ठेऊ, किंवा बळजबरी खाऊ हे पर्याय उरतात. तो सुरवातीला असलेला आनंद कुठेतरी हरवतो. आता तो पदार्थ म्हणजे एक जबाबदारी किंवा ओझं असल्यासारखं वाटू लागतं. त्याचा मनासारखा आस्वाद घ्यायचं राहूनच जातं.. मग वाटतं आधीच खायला हवं होतं का? थोडं थोडं प्रत्येक पदार्थासोबत संपलंही असतं..

आयुष्यासोबत देखील आपण बऱ्याचदा हेच करत असतो.. आनंदाचे, आवडीचे आणि खऱ्या अर्थाने "जगण्याचे" क्षण नेहमी लांबणीवर टाकत तिखट, आंबट, कडू, तुरट चवी पहिले संपण्याचा प्रयत्न करतो, हे क्षण एकदाचे जगून झाले की मग मनसोक्त गोड क्षण जगायला बघतो.. तसंच एखादा खूप आवडलेला शर्ट, ड्रेस, साडी, दागिना जपून ठेवतो नंतर खास प्रसंगी घालूया आता खराब होईल, पण ती वेळ येत पर्यंत त्यातला उत्साह निघून जातो किंवा आपल्या शरीराला आता ते बरोबर होत नसतं किंवा बरीच कारणं..

असे लांबणीवर टाकलेले आनंदाचे क्षण जगण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपल्याकडे इच्छा, शक्ती, उत्साह, हुरूप ह्यापैकी काहीतरी उणीव जाणवतेच.. तेव्हा समोर आलेलं सगळ्या चवीने परिपूर्ण असलेलं पंचपक्वानांचं ताट काहीही राखून न ठेवता संपूर्ण आस्वाद घेत संपवलं तर तृप्त झाल्याची भावना नक्कीच मिळते..

भेट

 आपल्या विस्मृतीत गेलेल्या आणि अचानक कधीतरी जाग्या होणाऱ्या कितीतरी आठवणी आणि त्याचं आता काही होणं नाही असं वाटून व्याकुळ होणारं मन.. ह्या सगळ्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात कधी जागेशी, कधी वस्तूंशी तर बऱ्याच वेळा लोकांशी..

कितीतरी व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाला धार लावून जातात, काही हळवा कोपरा तयार करतात, काही राग करायला शिकवतात तर काही प्रेम करायला आणि लळा लावायला शिकवतात..
व्यक्ती तितक्या तर्हा, तितके मतभेद, तितक्याच वाटाघाटी आणि आणखीही बरंच काही..
आपला भलामोठा किंवा मोजका मित्र परिवार.. एका विशिष्ट वेळेत मित्र सोबती म्हणून भेटतात, काही काळ सोबत असतात आणि वेळ आली की निघून जातात, पुन्हा भेटण्याचे ठरवून.. परत वेगळी जागा, वेगळी वेळ, नवे सोबती, नव्या जमा होत जाणाऱ्या आठवणी आणि परत भेटण्याचे आश्वासन देत घेतला जाणारा निरोप.. कत्येकदा हे दूर जाणं परिस्थितीवर अवलंबून असतं, वेळच अशी येते की जाणं भाग पण नंतर भेटण्याचा विश्वास बळ देतो..
जरा भूतकाळात डोकावून बघा, त्यातल्या अर्ध्या जणांशी सुद्धा परत भेट झाली नसेल.. भेटायचं आहे पण वेळ नाही, वेळ आहे पण साधन नाही, कितीतरी कारणं.. बरं ही कारणं सगळी खोटी का? तर नक्कीच नाही. मैत्रीत दुरावा पण नाही.. कित्येक महिन्यांनी एखादा कॉल किंवा मॅसेज करूनही त्याच मित्रत्वाच्या भावनेने आणि त्या वेळी जसे असू तसेच एकमेकांसमोर व्यक्त होतो.. पण काही वेळा, भेटी ह्या परत होतंच नाहीत.. खूप फॉलोअप घेऊन एखादी स्वतंत्र किंवा ग्रुप भेट घडवता येतेही, नाही असं नाही, पण ती अचानक किंवा अति कष्ट न करता घडून आलेल्या भेटीची सर त्याला येत नाही..
असंच आपण आठवणी गोळा करत पुढे जातो आणि अचानक कुठल्याश्या अनपेक्षित वेळी आणि ती आठवण जागी होते.. भेटायला हवं कधीतरी असं म्हणून मनाशीच काहीतरी ठरवल्या जातं.. तेवढ्यावर मनाची समजूत काढून पुढ्यात असलेल्या कामात लक्ष दिल्या जातं.. अश्या कित्येक भेटी तिथेच राहून जातात.. खूप हव्या असणाऱ्या पण कधीच घडून न येणाऱ्या..

अनोखे मित्रमंडळ

तुम्ही रस्त्याने कुठे जायला निघालात, जाता जाता एक मंदिर दिसलं, तुम्ही भक्तिभावे हात जोडले आणि पुढे निघालात..

थोड्या पुढे जाताच एक चर्च दिसलं, तुम्ही न बघता पुढे गेलात, पुढे एक मस्जिद दिसली, तिथेही न बघता पुढे गेलात.. पण काय खात्री की तुम्ही जिथे हात जोडले तिथे देव असणारच? सामान्यतः आपण सगळे आपल्या संबंधित धार्मिक स्थळांना बघून आदराने वंदन करतो पण बाकींकडे दुर्लक्ष करून पुढे जातो..

जसे आपले तसेच देवांचेही मित्र मंडळ शीख, पारसी, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी धर्माची असू शकतात.. ते सुद्धा त्यांच्या सोबत काही वेळ घालवतंच असतील ना.. तुम्ही आदराने वंदन केलंत पण संबंधित देव तिथे नसून जवळंच दुसऱ्या धार्मिक स्थळावर विरंगुळा म्हणून मित्रांसोबत गप्पा मारत असतील तर (अर्थात भक्तांची गर्दी नसते अश्या वेळी)?
जर कधी देवाला इच्छा झाली आणि चर्च मध्ये जाऊन ते आणि ख्रिस्त गप्पा मारत असतील आणि आपण चर्च कडे दुर्लक्ष करून मंदिरासमोर हात जोडले?
कधी ख्रिस्त मस्जिद च्या पायऱ्यांवर बसून अल्लाह बरोबर गप्पा मारत असतील आणि तुम्ही तर आताच चर्च समोर वंदन करून आलात आणि मस्जिद कडे लक्षच दिलं नाही..
कधी दर्ग्याच्या कट्ट्यावर ही सगळी मंडळी जमलेली आहेत आणि तुम्ही तिकडे न बघता पुढे निघताय, सगळे हसत असतील ना ह्यावर?
तुम्ही चर्च कडे दुर्लक्ष केलंत, मस्जिद बघितलीच नाही, गुरुद्वारा बघितला नाही पण अहो देव तर तिथेच होते. तसंच कधी मंदिरात सगळे जमलेत आणि तुम्ही मंदिराला हात जोडलेच नाही मग? इग्नोर केलंत तुम्ही..  

बरं ही सगळी मंडळी भेटल्यावर काय चर्चा करत असणार? त्यांच्या चर्चांचे विषयही आपल्या ग्रुप मधल्या विषयांप्रमाणे असतील? जागतिक प्रश्न, पर्यावरण, व्यस्त दिवस, इतर समस्या, कधी भक्तांची भलीमोठी रांग, त्यांच्या छोट्या मोठ्या मागण्या, आवडते भक्त, त्रास देणारे भक्त, आस्तिक नास्तिक फरक इत्यादी.. धर्म कोणताही असला तरीही माणसांची मनं सारखीच म्हणून मागण्याही बऱ्याचश्या सारख्याच..

आपल्या धार्मिक भावभावना आणि त्यांच्या प्रतिमा आपण ठरवल्यात आणि निवडल्या आहेत.. ती शक्ती एकच, तिथे भेद नाहीत, आहेत ते भेद आपण ठरवलेत..  
ही सगळी मंडळी नावाने वेगळी पण भाव एकंच… शक्ती एकच.. पण त्यांच्या पूजनाचे नियम मात्र आपणच ठरवल्या प्रमाणे वेगवेगळे..

शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम

 

शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम… एक आनंदाची, उत्साहाची लहर… शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग सगळेच त्यात उत्साहात सहभाग घेतात. लहानांना सांभाळणारे मोठ्या विद्यार्थ्यांचे संघ, विविध योजना, कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा, सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांची कधी नव्हे ते थोडी कमी होणारी भीती.. रोजच्या अभ्यासात आणि शिस्तीत असा विरंगुळा म्हणजे मेजवानीच
दररोज शाळा सुटायच्या एक तास आधी नाटक- नृत्य- गायनाचा सराव, खेळांच्या स्पर्धा, विविध संघांची विविध कामे, अभ्यासाच्या तासातून ह्या कारणाने सुटका, हेवेदावे, मस्ती, मेहेनत, नवीन मैत्री, बऱ्याच दिवसांपासून चालत आलेली भांडणं पुन्हा मैत्रीत बदलणं, सगळंच कसं मनासारखं होतं ह्या दिवसांत… आणि त्यातल्या त्यात कार्यक्रमांना शिक्षक नटून सजून आलेले बघायला येणारी मज्जा ही वेगळीच.. आता चित्र थोडं बदललंय पण हे कार्यक्रम बघण्यात आत्ताही मज्जा येते..
शाळांचे असे कार्यक्रम बालपणात घेऊन जातात.. आपणही काय काय केलेलं ते सगळं आठवतं.. कीतीतरी स्पर्धा.. भाषण, वादविवाद, कथाकथन, नाटकं, नृत्य, गायन, खेळांच्या वेगळ्या स्पर्धा, गर्दीच नियंत्रण नेमाने बघणारे संघ, एक महिना तरी हे सगळं चालायचं…
आताचा शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सगळं अप टू डेट असतंच, नव्हे ते असायलाच हवं हा अट्टाहास. सजावटीच्या सामानापासून ते कपड्यांपर्यंत सगळं तयार विकत घ्यायचं, ते बनवायचे किंवा जमवायचे कष्ट नकोच.. हे सगळं बघून माझ्या शाळेतला सांस्कृतिक कार्यक्रम हमखास आठवतो. त्याची आठवण अजूनही चेहेऱ्यावर आनंद देऊन जाते. जे काही करायचं ते संपूर्ण वर्गाने ठरवायचं, सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बनवायची, त्यातून एक संघ तयार व्हायचा, त्यांनीच गाणं निवडायचं, नृत्याची तयारी करायची आणि वर्ग शिक्षकाला दाखवायचं, सरावासाठी कुणाच्या घरी जायचं ते ही ठरवलं जायचं… नाटकाला किंवा डान्स साठी लागणारे कपडे जमावयचे, ते मोठे असले तरीही कसातरी जमवुन घ्यायचं.. कीतीतरी जुन्या अडगळीतल्या वस्तू सुद्धा हुडकून हवी ती गोष्ट काढायची, घरातल्या लोकांना त्रासून सोडायचं.. प्रत्येक वर्षी हे चक्र सुरुच असायचं.. रेडिमेड ची चंगळ परवडणारी नव्हती शाळांना आणि पालकांनाही..
त्यानंतर मेकअप हा आणखी स्वतंत्र विषय. जणूकाही ओठांवरची लिपस्टिक, चेहेऱ्यावर लावलं जाणारं फाउंडेशन आणि गालांवरच रुझ हे नंतर कधीच आयुष्यात लावायला मिळणार नाही असं फासलं जायचं.. डान्स मधल्या सगळ्यांचा चेहेरा एकसारखा बनवायचा, केस, पोशाख सगळं चापून-चोपून बसवायचं.. हाताची बोटं लाल रंगाने रंगवायची, त्यात मुलगा झालेल्या मुलींना पण ते लावलं जायचं ही वेगळी गम्मत.. शिक्षिका तरी काय करणार? एवढ्या विद्यार्थ्यांना एकत्र तयार करताना त्यांची ही तारांबळ उडायची.. त्या गडबडीत कुणाचं काहीतरी राहून जायचं, त्या मुलीला ते स्टेज वर गेल्यावर लक्षात यायचं, मग शिक्षिका बोलायच्या आता असुदे काही होत नाही. ती मुलगीही सगळं विसरून डान्स करायची.. असे कित्येक प्रसंग...
जुन्या आठवणी फोटोच्या जुन्या अल्बम मधून भेटतात.. ते बघतांना सगळे प्रसंग जिवंत होतात.. तेव्हा कित्ती वेगळे आणि विचीत्र दिसलेले आपण आता बघून मज्जा येते..
आता सगळंच रेडी टु वेअर, यूज आणि थ्रो, मग मागच्या वर्षीचं जपून ठेवलेलं सामान या वर्षी वापरायला कमीच मिळतं. ते सामानाच्या पेट्या जपणं नको की ते सामान ज्याचं त्याला परत करणं नको.. आपण ते जमवण्याच्या नादात आठवणीच गोळा करत होतो असं वाटून जातं..

जगाप्रमाने साहजिकच सगळं बदलायला हवं आणि ते बदलणार आहेच.. हे ही भरभरून जगावं.. सहज कधी ह्या कार्यक्रमांना हजेरी लावावी. ती छोटी छोटी मुलं, त्यांचा तो गोड makeup, आजही तेवढाच अावडून जातो. हा कार्यक्रम सगळ्यांनी भरभरून जगावा.. पालकांनी, मुला मुलींनी, शिक्षकांनी सगळ्यांनी.. एक उत्साहाची लहर आपल्यातही येईल आणि ती काही काळ का होईना आपल्याला आनंदी ठेवेल...


क्लोन

 . प्रोग्रॅम कोडींग आटोपून लॅपटॉप बंद करायला सकाळचे ६ वाजले होते.. आता झोपेला वेळ नाहीच. ८ वाजता ऑफिसला निघायचं म्हणजे आवरायला हवं ह्या विचारातच वीणा उठली. कित्येक दिवसांपासून तिची रात्रीची झोप फक्त २-३ तास व्हायची.. बरंचसं काम अजूनही बाकी होतं.. मग २ तासातले ३० मिनिटं परत त्या कामाचा आराखडा बनवण्यात तिने घालवला.. टीम सांभाळणं, प्रत्येकाने काय काम केलं त्याचं टेस्टिंग, सिक्युरिटी बघणं सगळं तिला करावं लागत होतं.. भराभर आवरून ती बाहेर पडली..

रस्त्यावर गाडी चालवणं म्हणजे नकोसं काम.. हल्ली क्लोन चा प्रकार वाढीस लागल्यामुळे गर्दीच गर्दी.. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये क्लोनचे सॉफ्टवेअर बनवायला स्पर्धाच सुरु आहे.. ३०-३५ वर्षांपूर्वी असाच एक अँड्रॉइड प्रकार गाजलेला.. मोबाईल च्या आहारी जाणं, त्यातून येणार मानसिक ताण, थकवा, आजारपण सगळं त्या पिढीने अनुभवलं आणि त्यातून सावरलंही.. आता हा आणखी नवा प्रकार/ बदल.. वीणा वैतागून गाडी चालवत होती..

जिकडे बघावं तिकडे प्लास्टिक च्या आवरणात लपेटलेले मशीन्स.. वरून हुबेहूब माणसाचं शरीर.. पण रोबोटच ते, क्लोन नावाने प्रचलित.. ओळखणंही कठीण होऊन बसलंय. त्यात भर म्हणजे काही महागड्या क्लोन मध्ये सेट केलेल्या प्रोग्रॅम मध्ये समोरच्या माणसांचं अनुकरण करण्याचं तंत्र.. त्यांचे हावभाव आणि त्यांचा एकंदरीत स्वभाव ते खेचून घेतील.. ह्याचाच अर्थ आता त्यांच्या वागण्याचा नियोजित आराखडा नाही.. विज्ञानाने मुख्यत्वे AI ने प्रगती केली पण इतकी की त्याचं भूत आता आपल्याच मानगुटीवर बसलंय. माणसांचे क्लोन बनवण्याच्या कंपन्या हल्ली खूपच वाढल्यात. त्यात काम करणारेही क्लोनच! त्यांचा खर्च म्हणायला काहीच नाही. राहण्याची व्यवस्था गोदामात.. एका गोदामात कितीतरी एकत्र बसतील (किंवा उभेच). खायला प्यायला काहीही नको, चार्ज केलं तेवढं बास.. वरून सोलर टेकनॉलॉजि तेव्हा पहाटे गोदामाचं छप्पर उघडलं की १२ वाजेपर्यंत १००% बॅटरी चार्ज.. मग दिवसभर काम करायची ऊर्जा त्यांना मिळालेली.. आता उद्योग क्षेत्रात नवनवीन मॉडेल बनवण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली.. त्यातही कहर म्हणजे नवनवीन चेहेरे आणायचे कुठून? म्हणून अति दुर्गम भागात जाऊन तिथल्या माणसांचे फोटो काढायचे आणि तीच डिझाइन्स इथे वापरायची.. हुबेहूब रूप द्यायचं.. तिकडची लोकं शहरात येणे कमीच म्हणून ह्यांना डुप्लिकेट चेहेऱ्यांची शक्यता नाही.. त्यांना ना कोणत्या आजाराची ना मरणाची भीती (काही खराब झालं की दुरुस्त करायचं किंवा एक्सपायरी झाली की बदलायचं).. माणसाच्या मेंदूचे सगळे फंक्शन टाकायची गरज नव्हती खरंतर, पण काही अपडेटेड मॉडेल्स आणि प्रीमियम प्रॉडक्ट मध्ये तेही उपलब्ध.. त्यांचा दर्जा आणि त्यावरून किंमत.. देशाची लोकसंख्या कमी की काय म्हणून ही भर!

हे काही आत्ताचं संशोधन नाही, बरीच वर्ष झालीत ह्या शोधाला.. आधीही हुबेहूब माणसांत मिसळणारे आणि दिसणारे क्लोन बनवण्यात यश आलं होतं पण तेव्हा कुठे थांबायचं हे त्यांना कळलेलं.. ऑफिस जवळ येताच तिच्या विचारांची गती थोडी मंदावली..

. ऑफिस मध्ये दिनक्रम सुरु.. मिटींग्स, प्रेसेंटेशन्स, डेडलाईन्स सगळं रोजचं.. बरंच थकायला झालं पण कामाचा उत्साह होताच.. प्रोजेक्ट पूर्ण व्हायला आता १० दिवस बाकी होते.. त्यावर काम करणाऱ्या सगळ्यांमध्ये उत्साह, हुरूप आणि ऊर्जा भरून आलेली.. वीणा आता एक एक दिवस मोजत होती, तिच्या साठी हे प्रोजेक्ट खूप महत्वाचं होतं कारण ते तिच्या कंपनीला टेकनॉलॉजि च्या जगात एक उच्च स्थान प्राप्त करून देणारं ठरणार होतं.. क्लोनचं असं सॉफ्टवेअर जे त्यांचा दर्जा, वेगळेपण आणि कार्यक्षमता खूप पटीने वाढवेल..

भरपूर प्रयत्न आणि मेहनतीने त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला.. फायनल टेस्टिंग ची पूर्ण जबाबदारी वीणा आणि टीम सांभाळत होती.. क्लोनचं हार्डवेर मॉडेल बनून त्यात सिस्टिम्सचं सेटअप झालं आणि फायनल टेस्ट होऊन हार्डवेर मॉडेल दाखवण्यासाठी सज्ज झालं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून आता परीक्षणाला सुरवात झाली.. तब्बल ३-४ तासाने त्या प्रोजेक्ट ला शेवटच्या चाचणीतही यश मिळालं आणि ते लाँच साठी मंजूर झालं..

प्रोजेक्ट लाईव्ह होऊन आता ते लाँच करायचा दिवस आला.. वीणा नेहमीप्रमाणे शांत आणि उत्साही होती.. तिच्या व्यावसाईक जीवनाला नवीन उंची मिळणार होती आणि संपूर्ण टीम आणि कंपनीसाठी हा खूप महत्वाचा दिवस होता.. सभागृह गच्च भरलेलं होता, सगळे कर्मचारी आणि प्रमुख व्यक्ती स्थानापन्न झालेले.. कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिचं आणि संपूर्ण टीम चं खूप कौतुक झालं. प्रोजेक्ट ची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवल्या गेलं आणि सगळी जमलेली मंडळी आश्चर्यचकित आणि आनंदित होऊन टाळ्यांचा कडकडाट करू लागली.. कार्यक्रमाचा निरोप आणि आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी अर्थात वीणा ने घेतली होती..
टाळ्यांच्या आवाजात तिचं स्वागत झालं.. ती प्रोजेक्ट बद्दल आणि टीम च्या प्रयत्नांबद्दल, वेळोवेळी मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करत होती.. सगळ्यांचे धन्यवाद देऊन तिचं आभार प्रदर्शन संपलं..

. सभोवताली नजर फिरवून तिने एक लांब श्वास घेतला आणि प्रोजेक्टर सुरु करण्याचा इशारा केला. स्क्रीनवर "सिस्टिम क्रॅश" लाल अक्षरात लिहून आलं..
समोर बसलेल्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर आश्चर्य आणि भीती दाटून आली.. हा काय प्रकार असावा म्हणून मंचावर बसलेली मंडळीही कुजबुज करू लागली..
काही क्षणातच वीणाच्या कंपनीचे अध्यक्ष ह्यांनी बोलायला सुरुवात केली..

"तुम्ही बघताय ते सत्य आहे.. आज ह्या क्षणापासून तुमच्या आसपासच्या सगळ्या क्लोन मध्ये Virus आलेला आहे आणि त्याने सिस्टिम क्रॅश केलेली आहे.. आजपासून क्लोन च्या प्रकाराला पूर्णविराम. ज्या क्षेत्रात ह्याची खरंच गरज आहे फक्त तिथेच ह्यांचा वापर केल्या जाईल आणि ते ही अग्रीमेंट वरच. बाकी सगळ्या क्षेत्रात माणसांची जागा माणसांनाच देण्यात येईल आणि ह्यावर सगळ्यांची संमती असणे अनिवार्य आहे कारण हा निर्णय शासकीय कार्यालयातूनही मंजूर झालेला आहे.."

सभागृहात शांतता पसरली.. तेवढ्यात अध्यक्षांनी बोलायला सुरुवात केली..

"क्लोन प्रचलित झाल्यापासून बऱ्याच लोकांच्या नौकऱ्या गेल्या, पोटापाण्याचा व्यवसाय मंदावला, सगळी काम क्लोन करायला लागले तेव्हा फक्त त्यांना सांभाळणं हेच एक काम, बाकी सगळी किरकोळ कामं. क्लोन साठी ट्रैनिंग, मशीन अपडेट, दुरुस्ती करणे हेच मुख्य काम.. शहरात बेरोजगारीचा कहर, चोऱ्यांचे वाढते प्रकार आणि असंख्य समस्या.. अश्या अवघड परिस्थितीत कसं जगायचं? हाच प्रश्न वीणालाही पडला आणि ती माझ्याशी बोलली.. तिला तर वाटायचं एखाद्या रात्री ह्यांच्या गोदामाला आग लावून द्यावी म्हणजे प्रश्नच मिटला.. सगळं पूर्वीसारखं सुरळीत सुरु होईल.. ह्या चिडण्या मागचं कारणही तसंच होतं.. तिला समाजसेवेची आवड. नौकरी करून सुट्टीच्या दिवशी ती हे काम आवडीने करायची. रोज रोज लोकांची रोजगाराची वाढती समस्या तिला बघवत नव्हती. तिने नेत्यांचा आधार घ्यायचा ठरवला.. त्यांनी ह्या साऱ्यांवर दबाव टाकण्यास पुढाकार घेतला तर हे प्रकरण ते खूप पुढे नेऊ शकतात असं तिला वाटलं.. दबावाने ही समस्या कदाचित कमी होऊ शकेल असा अंदाज तिने बांधला.. पण त्यांच्या भेटीत जे तिने ऐकलं त्याने तिलाही धक्काच बसला.. नेत्यांचं म्हणणं की येत्या निवडणुकीत माणसांऐवजी क्लोनचाच वापर करणार.. अहो ते स्वस्त पडत!! त्यांचेही पॅकेजेस असतात म्हणे.. एक पॅकेज विकत घेतलं की प्रचाराचा प्रश्न मिटला.. नंतर बाकीचा अवांतर खर्च नको, मटण, कोंबडी, दारू काही काही नको.. फक्त माणसाच्या आवाजात एक मस्त पैकी रेकॉर्डिंग केली की संपल.. बाकी कामं तेच सांभाळतील.. किती ही घुसखोरी.. कंपन्यांचं उत्पन्न भरघोस वाढतंय.. सगळ्या क्षेत्रात त्यांचं अस्तित्व आहे.. आणि आता निवडणुका?? वीणाचा संताप अनावर होत होता.. तडक जावं आणि वरच्या पातळीवर कम्प्लेंट करावी.. पण त्याने प्रश्न सुटणार नव्हता.. हे प्रकरण वाटतं तितकं सोप्पं मुळीच नव्हतं.. बराच वेळ विचार केल्यावर तिच्या डोक्यात एक कल्पना आली आणि तिने ती माझ्यासमोर मांडली.. ह्या सगळ्या गोष्टींना खूप मेहेनत आणि लोकांनाच सहभाग लागणार होता. पण काहीही झालं तरी मागे फिरायचं नाही हे आम्ही मनाशी ठरवलं.."

"अथक प्रयत्न करून शेवटी सॉफ्टवेअर बनून तयार झालं होतं.. दिवसा ऑफिस च्या प्रोजेक्ट वर काम आणि रात्री हे सीक्रेट प्रोजेक्ट.. ह्या मेहेनतीचं फळ म्हणजेच त्यांनी एक असा प्रोग्राम बनवला ज्याने ते सगळे क्लोन एकाच वेळी निकामी होतील.. सर्वोत्तम संस्थेमधील २० जणांची टीम ह्या सॉफ्टवेअर प्रोजेक्ट वर काम करत होती. सगळं काही नियोजित वेळेत पर पडलं ह्याचा सर्वांना आनंद होता.. इतक्या दिवसांमध्ये वीणाने सगळ्या कंपन्यांची पूर्ण माहिती काढून ठेवलेली होती. किती क्लोन तयार झाले आहेत, किती बनवण्याच्या प्रक्रिये मध्ये आहेत, किती वार्षिक उत्पन्न आणि बरंच काही.. तिच्या ओळखीचे आणि मुख्य म्हणजे विश्वासातले लोक तिच्या या प्रयत्नात सहभागी झाले आणि त्याला एका मोहिमेचे स्वरूप आलं.. जे काही घटक ह्या मोहिमेशी निगडित होते ते सर्व खात्रीशीर आणि यश्वस्वी रित्या सांभाळले आणि काम पूर्ण केले.. सगळ्या पातळीवर विचार करून आणि विचारवंतांचे मुद्दे लक्षात घेऊन त्यांची संमती मिळवून ह्या मोहिमेला यश आलंय.. "

अध्यक्षांचं बोलणं पूर्ण झालं तरीही शांतता कायम राहिली, कुणी प्रश्न विचारले त्यांची उत्तरं देऊन समस्यांचं समाधान झालं.. एव्हाना Social Media वर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.. लोकांनी आनंदाने ह्या निर्णयाचं स्वागत केलं..

. कार्यक्रम संपवून घरी जाताना सगळ्यांना बाहेर निकामी पडलेले क्लोन आणि त्यांना रस्त्याच्या बाजूला एका जागी मांडून ठेवणारी टीम दिसत होती.. त्या सगळ्यांनी सारखे टी-शर्ट घातले होते ज्यावर लिहिलं होतं "नो क्लोन". ह्याचीही सोय वीणा आणि टीम ने करून ठेवली होती तर!!

उगाच...

 उगाच...

उगाच रुसवे, उगाच फुगवे,
उगाच मत्सर, उगाच जळफट,
स्वतःमधील 'त्या' मनाची कशास करावी उगाच फरफट..

उगाच उसासे, उगाच बोभाटे,
उगाच ओरडा, उगाच हळहळ,
सारेच असूनी भवती आता कशास मग ही नुसती तगमग..

नाही काहीच स्थिर तरीही..
उगाच अडगळ, उगाच घुुसमट,
थोडे होता स्वतः प्रवाही, होईल आणिक थोडी वरचढ..

उगाच द्वेष, उगाच गर्व,
उगाच संभ्रम, उगाच संशय,
प्रेम उगवले अंगणी सारे, कशास ते रागाचे कुंपण..

उगाच जगणे मनाविरोधी, उगाच मरणे वाट पाहूनी..
नसे नावीन्य त्यातही काही, उगाच उसने उधार जगणे..

चैतन्याची ज्योत पेटवूनी उजळूया आयुष्य सारे...
जळमटं धुवूनी उदासीनतेची अपार आनंदाने..
जगण्याचाही उत्सव व्हावा अशाच उत्साहाने...

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

बाप्पाचा नीरोप

रिकामे मंडप, ओसरलेला उत्साह, थकलेले आणि पडलेले चेहरे,
मिरवणुकीत नाचून थकलेले शरीर, व्यवस्था बघता बघता पुरती ऊर्जा खर्ची झालेली असूनही काही राहिलं तर नाही ना ह्याची खातरजमा करत असलेले मंडळाचे कार्यकर्ते, दमलेले ढोल ताशा पथक...
मोठ्या मनाने आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी दिलेला निरोप तसच पुढच्या वर्षी येण्याची हमी बाप्पा कडून घेऊन माघारी परतणारी मंडळी..
अखेर निरोप घेण्याची वेळ आली आणि आगमण सोहळ्या प्रमाणेच निरोपाचा सोहळाही तितक्याच जोशात पार पडला..
खरतर तुझं विसर्जन करणं म्हणता येईल का?? तू सर्वांचा पालनकर्ता, विघ्नहर्ता.. तू सदैव सोबतच तर असतोस.. तुला १० दिवस आपल्याकडे ठेऊन घेण्याचा आमचा तेवढा हट्ट.. तूही तेवढ्याच उत्साहात येतोस.. आणि निरोपही घेतोस..
किती दिवस आधीपासून तुझ्या आगमनाची तयारी.. आता उद्या पासून तू नसणार.. ती आरास, देखणी आणि प्रसन्न मूर्ती, त्या मोठ्या डोळ्यातील आपलेपण, बघत रहावे असे सुबक आणि गोड रूप, तुझ्या सोंडेचा तो वळणदार आकार, ते मोठ्ठं पोट आणि सुपासारखे कान.. पूजेतील दिव्याची सतत जळणारी ज्योत, दोन वेळेची आरती, मोदकांचा प्रसाद.... कितीतरी गोष्टी.. उद्या पासून तेही नाही..
पण तू नेहमीच सोबत असणार...
तुझे रूप हृदयात आहे.. लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता कितीतरी नावं तुझी.. पण बाप्पा नावात जे आपलेपण आहे ते कशातच नाही.. आणि म्हणूनच तुझ्याशी संवाद सुद्धा एकेरीच..
तुझ्या प्रत्येक रुपात, मूर्ती मध्ये, चित्रा मध्ये कमालीची ओढ असते.. तुझं रूप प्रत्येक ठिकाणी आपलसं वाटतं आणि तू आमचाच वाटतोस..
पाठीशी उभा आहेसच..
पुढच्या वर्षी लवकर ये..

गुरुवार, २७ जून, २०१९

चांदणं पडलेल्या रात्री..

चांदणं पडलेल्या रात्री.. 

चांदणं पडलंय बाहेर अंगणात.. चांदण्यांचा प्रकाश रातकिड्यांच्या आवाजाइतकाच पसरलाय सर्वत्र.. मधूनच काजवे प्रकाशून जाताहेत.. प्रकाश जरी कमी असला तरीही समोरचं सगळं दृष्टीस पडतंय कारण चंद्राचा प्रकाशाचा वाटाही आहेच.. 
त्याने थकलेलं शरीर अंगणात टाकलेल्या अंथरुणात झोकून दिलंय.. पाठ अंथरुणाला टेकवून, एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून, डोक्याला हाताच्या उशीचा आधार देऊन स्वस्थ लोटलाय.. चांदणं न्याहाळत आपल्याच विचारांत गुंग झालाय.. दिवस मावळतानाच तो घरी आलेला.. दुपारचं उन्ह अंगावर खेळवत शेतात राब राब राबून झालाय दिवसभर. कष्टाचा मोबदला घेऊन पोटभर जेवून बायको आणि मुलांसोबत गप्पा मारून आता शांततेत काही वेळ स्वतःसोबत घालवतोय.. गार वारा, शांतता आणि त्यात मस्त शीळ.. छान वेळ जातोय त्याचा.. असाच निवांत झोपीही जाईल तो...

आणि एक तो ही.. लॅपटॉप च्या उजेडात बाहेरचं चांदणं विसरून गेलाय.. डोक्यात चाललेल्या गोंधळात बाहेरची शांतता जाणवतच नाहीये.. तसही आजूबाजूला हवी तशी शांतता नाहीच कारण न थकता सतत चालत राहणार शहर.. तरीही रात्रीच्या थोड्याश्या शांततेतही मनातला गोंधळ फार.. घरातील मंडळी वाट बघता बघता थकून जेवून झोपीही गेलीत.. थंड झालेल जेवण लॅपटॉपच्याच समोर जेवून, परत त्याच प्रकाशात हरवलेला तो.. त्याच्या कामाचा व्याप इतका की ते कधी संपणार हे त्यालाही कळलेलं नाही.. 
तो विचार करतोय वीकएंड ला बाहेर जाऊन निसर्गात वेळ घालवायचा.. पण सोबतीला त्याचा सतत वाजणारा फोन आणि गरज पडली तर लॅपटॉप हवेच.. भरपूर सेव्हिंग आणि हवी ती इच्छा पूर्ण करण्याची धमक पण ज्या साठी एवढी धावपळ तो आराम आणि ते स्वातंत्र्य अनुभवायला वेळ कसा मिळवणार ह्या विचारांत तो... 

एका बाजूला कितीही कमतरता असली तरीही सुखात रात्र घालवणारा तो, आणि ऐश्वर्य भरलेल्या घरातही झोपेला मुकलेला तो.. 
चांदणं पडलेल्या रात्री... 

शनिवार, ४ मे, २०१९

​तिचे डोळे

​​​​तिचे डोळे...
भिरभिर बघणारे, सगळं काही नजरेनं टिपून घेणारे, परत कधी बघायला मिळणार म्हणून बारकाव्या सहित लक्षात ठेवायला धडपडणारे... हे जग कधी न बघितलेलं, आकर्षित करणारं, सगळं नवीन.. जसं समोर दिसणाऱ्या धान्याच्या ढिगातून चिमणी दाण्यांनी चोच संपूर्ण भरून घेते तसंच तिचे इवलेसे डोळे सगळं टिपण्याची ​​धडपड करणारे... 

तिचे डोळे.. पाण्याने तुडुंब भरलेले, अश्रू ओघळू न देता सावरसावर करणारे.. सतत काय डोळ्यांतला पाण्याचा डोह जगासमोर आणयचा म्हणून सोडून देणारे.. वाट्याला आलेलं दुःख भोगावाच लागतं असं स्वतःलाच समजावत, जगाला चार वाईट गोष्टी बोलून आपल्या कोशात परतणारे... दूरवर नजर खिळवत शांत झालेले डोळे... 

तिचे डोळे.. आनंदाने ओथंबलेले.. गाडीतून खाली उतरणारी व्यक्ती बघायला आतुरलेली ती.. ते १-२ क्षणही तिला तासांप्रमाणे भासले.. समोर उभी असलेली व्यक्ती कितीतरी दिवसांनी नजरेस पडली असावी बहुदा, तरीच नमस्कारासाठी खाली झुकण्यात आणि मिठी मारण्यात गोंधळली ती मग घट्ट मिठीच मारते तेव्हा आनंदाचे अश्रू गालांवर पसरवणारे ते डोळे... 

तिचे डोळे.. निश्चयाने पुढे पाऊल टाकणारे.. रस्त्यावरच्या वर्दळीचा फारसा फरक न पडत पुढे जाणारी ती, किती दिवस घाबरून, लपून जगायचं? आता संकटाचा सामना केलाच पाहिजे, खंबीर व्हायलाच पाहिजे अशी धमक स्वतःलाच देत मनाशीच काहीतरी संवाद करत झपझप पुढे जाणारी ती, तो ठामपणा व्यक्त करणारे तिचे ते खंबीर डोळे.. 

तिचे डोळे.. वाट बघून थकलेले, वाटेकडे डोळे आणि मन दोन्ही खिळवून बसलेले.. दिलेल्या वेळेच्या कितीतरी आधी ठराविक ठिकाणी येऊन वाट बघत बसलेली ती, अजूनही ती व्यक्ती का से आली नाही किंवा आपण फसवले तर गेलो नाही ना? ह्या चिंतेने ग्रासलेले डोळे... 

तिचे डोळे.. त्रासलेले.. चाहूलही न लागत आलेलं मोठ्ठ आजारपण.. त्याच्याशी सामना करता करता थकलेलं शरीर आणि मनही. तरुणपणाचा जोश आणि ऊर्जा आताही असती तर अस्स पळवून लावलं असतं संकट पण आता किती दिवस असंच जगायचं अश्या विचारात त्रासलेल मन आणि आणि त्रासून मिटून घेतलेले डोळे.. 

तिचे डोळे.. कुतूहलाने भरलेले.. पुढ्यात असलेलं खेळणं कसं हाताळायाचं ह्या विचारात गुंतलेेले.. खेळण्यातून मान वर काढून मदतीसाठी बोलावणारे ते गोड डोळे..

तिचे डोळे.. शून्यात हरवलेले.. आयुष्य कसं जगलो ह्याचा आढावा घेणारे की परतीची वाट बघणारे, नेमके आनंदी की दुःखी न कळणारे ते स्तब्ध डोळे..

तिचे डोळे... खूप काही व्यक्त करणारे.. कधी आनंदाने ओसंडून वाहणारे तर कधितरी बांध फुटून अश्रू ओघळणारे, कधी आश्चर्याने थक्क झालेले तर कधी राग धरून बसलेले.. आणि तरीही कुठल्याही हावभावात नेहमी सुंदरच दिसणारे... तिचे डोळे...

गुरुवार, २१ मार्च, २०१९

होळी..

लहान असतांना खेळलेली होळी नेहमी आठवते.. सकाळी लवकर उठून चहा किंवा दूध पिऊन कॉलनी मधील मित्र मैत्रीणींसोबत रंग खेळायला जायचं.. कॉलनीत सगळ्यांच्या घरी होळीसाठी खास नाश्ता असायचा. एक एक करून सगळ्यांकडे नाश्ता करायला जायचं, मग परत रंग खेळायला पाळायचं.. शाळेतल्या जवळपास राहणाऱ्या मैत्रिणींकडे रंग लावायला जायचं.. घरी होळीच्या शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांसोबत गप्पा, एवढा रंग खेळून सुद्धा मोठ्यांबरोबरही परत रंग खेळायचा आणि बायकांच्या एकत्र असणाऱ्या नाश्ता पार्टी मध्ये जाऊन बसायचं. तिथेही खाण्याचा एक फेर व्हायचा आणि नंतर गप्पा गोष्टी संपवून आपापल्या घरी जायचं..
मनसोक्त रंग खेळून घरी आल्यावर अंघोळीचा नंबर लागायचा. आरामात अर्धा एक तास तरी अंघोळ चालायची कारण रंग कितीही घासला तरी निघायचा नाही. नखांपासून केसांपर्यंत सगळीकडे रंगच रंग. मग काळे निळे झालेलं शरीर निदान गुलाबी दिसावं इतपत रंग काढण्याचा प्रयत्न करून अंघोळ संपायची.. त्यानंतर जेवणं झाली की प्रचंड झोप यायची ती झोप एकदम सायंकाळी ५-५.३० ला उघडायची. मग आळसावलेलं शरीर काहीही करण्याच्या मनस्थतीत नसायचं. सायंकाळी झोपाळ्यावर बसून मैत्रीणींसोबत गप्पा आणि कुणाचा रंग किती निघाला, कोण कशी होळी खेळलं ह्यावर चर्चा.. सकाळी शरीरात जेवढा उत्साह असायचा तेवढाच सायंकाळी थकवा आणि आळस भरून जायचा..
संपली एकदाची होळी म्हणत दुसऱ्या दिवशी पासून दिनक्रम सुरु व्हायचा..

लहानपणी आमची होळीची तयारी थोडी लवकर सुरु व्हायची.. होळीच्या काही दिवस आधीच गायीच्या शेणापासून गौऱ्यांची (गौऱ्यांना हाताने वेगवेगळा आकार द्यायचा) माळ बनवायची आणि ती आपल्या हाताने होळीत टाकायची. आम्ही बच्चे कंपनी प्रत्येकी २-३ अश्या माळा बनवायचो आणि स्वतःच्या हाताने त्या होळीत टाकायला खूप छान वाटायचं..

होळीचा रंग जसा काही दिवस सोबत असतो तसंच साखरेची गाठी सुद्धा... घरी भेटायला येणारे हमखास लहानांसाठी गाठी आणायचे आणि ती आवडीने खायचो... वजनाची / कॅलरीज ची कसलीही चिंता न करता..
तेव्हा सोशल मीडिया चा खेळ नवह्ताच... मजा करायला खेळायचं आणि मनात आठवणी जपायच्या एवढंच...

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

प्रेम...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक अपुरं, अधुरं राहिलेलं प्रेम असावं.. एकतर्फी किंवा दोन्ही बाजूंनी असणारं प्रेम, एखादी खूप आवडणारी व्यक्ती असं कुणीही... कधी कधी उगाच त्यांची आठवण यावी, सगळं जग बहरून यावं, आठवणींनी गर्दी करावी, पहिल्या पावसात हमखास आठवण यावी आणि प्रेमाच्या संभाषणात न चुकता हजेरी लावावी तर कधी सिनेमाच्या कथानकात भेटावं...  
प्रेम जोडीदारावर तर नक्कीच असावं आणि ते ही परिपुर्ण.. पण कधीतरी भूतकाळात घेऊन जाणारी एक गुलाबी तार जरूर असावी ज्या तारेला छेडल्यावर मधुर सूर ऐकू येतील.. 
त्यांच्या सोबत संवाद असणं जरुरी नाहीच.. फक्त एक आठवण असावी.. भर दुपारी पापण्या मिटल्यावर थंडावा देणारी एक तरी कहाणी असावी... 
आठवण आल्यावर हृदयाचे ठोके वाढावे अगदी तसेच जसे त्यांना पाहिल्यावर कधी वाढलेले, श्वास थोडा गतिमान व्हावा.. कधी अचानक भेटल्यावर एखादा ठोका चुकावा.. आधीचे दिवस आठवत त्यात रमावं.. प्रवासात खिडकीतून बाहेर बघत रम्य स्वप्न पाहिलेली आठवावी.. 
आणि मनसोक्त आठवून झाल्यावर परत ताजं टवटवीत मन घेऊन भूतकाळ परत जगायला घ्यावा.. 
अधुरं प्रेम वेदनाच देतं असं नाही तर नीट विचार केला की कळतं एक सुखद आठवणींच जाळं तयार झालंय.. 

सोमवार, ११ जून, २०१८

पाऊस

तर... एव्हाना फॉर्मल शूस, कपडे ओले झाले असतील, छत्रीने ऐन वेळी दिलेला त्रास किंवा छत्रीच सोबत नसल्याने चिडचिड झाली असेल. पहिल्या पाऊसात भिजायचा योग चुकीच्या वेळी आला असेल (किंवा मुद्दामही भिजले असाल).. चिडचिड होऊन सुरवात झालेली असो किंवा आनंदाने, ह्या पावसाने थंडावा मात्र मिळालाच. एरव्ही घाईत एक तरी सामान विसरायची सवय असणारे आता नेमाने छत्री सोबत ठेवणार, पावसावर चिडणार, रेनकोट असो किंवा छत्री डोकं सोडून बाकी संपूर्ण शरीर भिजवायचा पवित्रा पावसाने घेतलेला असला तरीही आपली केवालीवानी धडपड सुरु होणार. सगळं कसं प्लॅन करून येत असावा हा पाऊस. त्यातलं सारं काही नेमाने पूर्ण करतो दरवर्षी. हवं तसं बरसतो, हवं तेव्हा निघून जातो, वाट बघायला लावतो... सारं काही त्याचं प्लांनिंग, आपल्या हवामान खात्याचेही अनुमान पोकळ ठरवतो कधीकधी... 

आपण पण हट्टीच.. त्याला अनुभवण्याचे प्लॅन्स बनवतो, कधीतरी निसर्ग बघायला जातो, भिजत भिजत गड किल्ले चढ उतर करत धबधब्यांमध्ये भिजायला जातो, रस्त्यात भजी आणि चहा चा आस्वाद घेतो सगळं करतो... हे सारं काही कमी अधिक फरकाने दरवर्षी होतं.. 

पण काही गोष्टी मात्र हरवल्या...

आता शाळेत तळे साचून सुट्टी मिळत नाही, पाऊस पडून झाल्यावर निघणारे वेगवेगळे रंगीत किडे कुणी पकडत नाही, पावसाचं पाणी भरलेल्या डबक्यात उडी मारणारी, चिखलाने माखलेली बच्चे कंपनी आणि त्यांचे हसरे चेहरे कमी झालेत... "सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल काय", "ये रे ये रे पावसा" अशी गोड गीतेही मुलांपासून दुरावली.. बरंच काही हरवलंय आणि बरंच काही विसरलोय आपण... 

आता तर पावसाचं पाणी काचांवर पडून खाली ओघळूनही जातं, आपण दुर्लक्ष करत स्वतःच्या विश्वात गुंग. आधी कधीतरी त्याचा आवाज आणि भरून येणं कितीतरी वेळ बघत बसायचो आणि आता तो आत येऊ नये म्हणून त्याचं प्लांनिंग केलंय, मग खिडकीत बसून त्याच्या तुषारांना अंगावर घेत चहाचा आस्वाद आणि सोबत पुस्तक वाचायला विसरणारचं ना..  

ए सी च्या गार हवेत बसून आपल्याच कामात दंग असतो तेव्हा तो आभाळ भरून घेतो मग गरजून आणि बरसून निघूनही जातो. त्याचं काम तो करतोच आहे, आपलं प्लांनिंग बदललंय फक्त..  मोठं होताना बरंच काही सोडलंय आपण, त्यात पाऊस अनुभवणं ही सुटतच चाललंय.. कारण म्हणायला आता सुरक्षा आणि स्वतःची जपणूक ही लेबलं तयार आहेतच... 


सोमवार, २८ मे, २०१८

सच मेरे यार है..

लोकल ची गर्दी आणि गोंगाटात एक शांतता भरून आणणारा पूल, तो समुद्रावरून जाणारा, दोन स्टेशनांना जोडणारा पूल.. 
अरबी समुद्रावरून वाहणारा वारा, ते सर्वत्र पसरलेलं शांत पाणी, अंधारातही दिसणारं.. प्रकाश पडला की चकाकणारं.. 
त्या पाण्याकडे आणि समुद्राच्या विशाल पात्राकडे बघून मन कुठेतरी हरवून जातं.. कानातल्या हेडफोन्सवर जुन्या गाण्यांची प्लेलिस्ट वाजत असते आणि नजर त्याच्यावर खिळलेली असते... 
खरतंर त्याच्या कडे नजर वळताच आजूबाजूला चाललेल्या गोंगाटाचा फरक पडेनासा होतो.. गर्दीही काहीशी शांत होऊन बाहेर बघत असते..  
अश्या वेळी कधी आवडीचं सागर चित्रपटातलं गाणं सुरु होतं... 
सच मेरे यार है, बस वहीं प्यार है 
जिसके बदल मी कोई तो प्यार दे,  
बाकी बेकार है... यार मेरे... यार मेरे... 
आणि त्याच्या प्रत्येक शब्दांवर आणि ओळींवर विचार करणं सुरु होतं.. अशी जुनी गाणी किती वेड लावणारी असतात.. प्रत्येक वेळी नवी अनुभुती, आणि वर्तमान परिस्थिती नुसार नवाच अर्थ देतात.. स्वतःला त्या गाण्यात हरवून बाहेर संथ पाण्याकडे बघत आयुष्याबद्दल विचार सुरु होतो.. नकळतच.. कुठल्याही आठवणी, संदर्भ नसतांनाही मनात गर्दी करत जातात... अशी शांतता सुखावून आणि कधी दुखावुनही जाते... पण तो आवाज, तो बेफिकीर जगण्याच्या अनुभवातून शिकत आलेला सुर, आतून हलवून जातो... कोई सब जिते सब कोई हार दे म्हणत स्वतःची समजूत काढून घेतो...
आणि शेवटी म्हणतोच, अपनी तो हार है यार मेरे.. आणि आपणही त्याच्या सुरात हरवूनच जातो...

बुधवार, ९ मे, २०१८

कधीतरी

कधीतरी अचानक अस्वस्थ वाटायला लागतं काहीही नसतांना…
कुठले कुठले विचार मनात उगाचंच फेऱ्या घालत असतात…
काही मागचे विचार तर काही येणाऱ्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भीती…
काहीशी भीती आपण टाकत असलेल्या नवीन पाउलाबद्दल,
तर काही विचार कुणालातरी दुःखात पाहूनही येतात…
कधीतरी आपल्या एकदम सुरळीत चाललेल्या जीवनाबद्दलही एक प्रकारची चीड यायला
लागते
कुठल्याच गोष्टींनी मग हे मन नावाचं पप्रकरण शांत होत नाही…
कुठल्याश्या आपल्या चुका, स्वतःवरच उलटलेले आपले काही ठामपणे घेतलेले निर्णय,
कुणाचेतरी अगदी आपल्याही नकळत दुखावलेले मन
आणि कुणीतरी मोठ्याने रागावलेले क्षण…
गुंताच गुंता होतो विचारांचा…
कुठेले कुठले विसंगत विचार एकाच वेळी आपल डोक उठवत असतात...
त्याच वेळी आपण कुणाला परत नकळत दुखावतो...
आणि अगदी त्याच वेळी, पुढच्या वेळेच्या आपल्या विचारांना नकळतच खाद्य मिळालेल
असतं…

व्यक्ती वाचन

माणसांना वाचण्याची सवय खरंतर ना खूप चांगली असते 
म्हणजे बघा ना आपल्याकडे नेहमीच पुस्तकं असणारंच जरुरी नाही, गाणीही ऐकून ऐकून कितीशी ऐकणार?
कानाला थोडा तरी आराम हवा असतो… मग असं एकट असल्यावर तो एकांत खायला लागतो आपल्याला 
अश्यावेळी एक हमखास मनोरंजन करू शकणारी अशी गोष्ट म्हणजे व्यक्ती वाचन… 
असंख्य प्रकारच्या व्यक्ती आपण बघतो रोज… त्यांना पारखणे म्हणजे बुद्धीला खाद्यचं… 
पण यातही एक नियम आहेच, डोक्यात कुठल्याच मोजमापाच्या पट्ट्या नकोत. त्यांना फक्त वाचायचंय, परीक्षा नाही घ्यायचीय त्यांची.
(व्यक्ती चांगला किंवा वाईट हे सहवासातून कळत, पहिल्या भेटीतून फक्त एक आढावा घेता येतो, आणि ही तर भेटही नाहीये तर मोजमाप नको… )
मग थोड्या वेळाने आपल्याला त्यांना पारखायला मजा येत जाते, आपण नकळत आपल्या वागणुकीशी त्यांना जुळवायला लागतो.
मध्येच हसायला पण येतं आणि वाटत आपणही असंच जोकर दिसत असणार…
काहींच्या हालचालीतून वागणुकीतून शिकायलाही मिळतं आणि काहींच्या चेहऱ्यावरून दुःखाची आणि वेदनेची झलक बघायला मिळते…
काहींकडे बघून आनंद होतो तर काहींकडे बघून आपण किती भाग्यवान आणि सुखी आहोत ते कळत…
पण प्रत्येक जण वेगळा, हटके असतो… कुठल्याही दोन व्यक्तीत साम्य नाही जाणवणार (अर्थात जुळे असल्यास भाग वेगळा)
हालचाली बघण्यात वेळ कसा निघून जातो कळतही नाही… ट्रेन किंवा मॉल मध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी एकटे असल्यावर हमखास सोबतीला असणारी मस्त अशी गोष्ट…व्यक्ती वाचन…

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

टिंग

आत्ता कुठे सगळे आवाज थांबले... निरव शांतता... हृदयाचे ठोके कानांनी मोजता यावे इतकी शांतता... पण तिला ते ही ऐकायचे नव्हते किंबहुना तिला ऐकूही येत नव्हते इतकी ती त्या शांततेच्या कुशीत दडली... तिला किती दिवसांपासून ह्या अश्या शांततेची गरज होती आणि आता ती मिळाली..
अनिता... खूप सुरेख व्यक्तिमत्व. सुंदर, मनमिळाऊ, नाजूक, खट्याळ असे सारे गुण तिच्यात.. तिला सगळ्यांशी संपर्कात राहायला आवडतं. सारखं कुणाशीतरी बोलत राहायचं.. मैत्रीणी, शेजारी, कामवाली बाई किंवा अगदी दुकानदाराशीही ती तासंतास बोलू शकेल इतकी बोलकी... गाणी, पुस्तकं, बागकाम, स्वयंपाक ह्यांनी तिचं आयुष्यं परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं तिला.. ती जिवंत ठेवते घराला...
तिला आठवली ती रविवार ची निवांत सकाळ... अनिल गॅलरीत नेहमीप्रमाणे पेपर वाचत बसलेला आणि अनिता समोरच्याच खुर्चीत मोबाईल मध्ये रमलेली.. अनिल आणि अनिताच्या रविवारी खूप गप्पा रंगायच्या. दोघेही निवांत असायचे. तोही बोलण्यात तिच्या तोडीस तोड होता तरीही तो अनिताला बोलला- "तुझ्या बरोबर असताना माझी बोलण्याची कला हरवून ऐकण्याची कला जोपासल्या जात आहे", त्यावर ती फक्त गोड लाजली... त्यात मुलाने मोबाइल वर सुट्टीसाठी भारतात येणार कळवलं ते ऐकून दोघेही खुश... कळताक्षणीच तिची दिवसांची मोजणी सुरु झाली...
अनिताला आताशा नवीन टेकनॉलॉजी वापरून बघण्याचा नवा छंद जडला होता. ती फार वाचायची त्याबद्दल. टेकनॉलॉजी चा उपयोग काय, वापर कसा करायचा, किंमत किती असं सारं काही. त्यात मोबाईलचीही भर पडली. तिला फार आवडायचा वापरायला. त्यात असलेल्या साऱ्या गोष्टी तिने वापरून पहिल्या. मोबाईल आल्यावर तिचा संवाद आणखीच वाढला..
मुलाला तिची आवड निवड कळालेली म्हणून परदेशातून आई साठी एक वेगळीच जादू आणली त्याने. होय, तिच्यासाठी जादूच कारण तिने हा प्रकार आधी कधीच पाहिलेला किंवा ऐकलेला नव्हता. ती एक नवीन टेकनॉलॉजी होती जी भारतात अजून आलेली नव्हती. तिला ही जादू वापरायला मिळणार होती. अजब किमया होती... खूप आकर्षक आणि आजवर ऐकण्यात आलेल्या शोधांपेक्षा निराळी... तिला एवढं अचंबित होताना अनिल बऱ्याच वर्षांनी बघत होता..
हातावरच्या घड्याळीत अपडेट्स बघणे, संदेश वाचणे ही सर्वसामान्य बाब झाली होती, आता तिला सगळं काही डोक्यात वाजणाऱ्या एका "टिंग" ने कळणार होतं. ती अगदी भारावून गेली.. असा काही शोध लागेल ह्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती. तिने लगेच इन्स्टॉल करण्यास होकार दिला.
अलीकडे अनिताला लागलेल्या मोबाईल च्या वेडाने अनिल काळजीत बुडालेला. खरंतर मोबाईलशी ओळख होताच ती त्यात गुंतत गेली, तो हातातून सुटेनासा झाला.. आता तर तिचा आनंद अगदी टोकावर पोहोचलेला... तिचं मन वळवण्याचा तो सतत प्रयत्न करायचा. मोबाईल मध्ये कमीत कमी व्यस्त व्हावी म्हणून तिला वेळात वेळ काढून बाहेर फिरायला घेऊन जा, नव्या नव्या घडामोडींबद्दल चर्चा कर हा त्याचा प्रयन्त चाललेला होता.. कामांमधून फुरसत मिळाली की मुलांसोबत गप्पाही रंगायच्या, पण मोबाइलचं वेड वाढत चाललेलं. सतत स्वतःला सजवायचं, फोटोस काढायचे, नवे कपडे, नवं सारं काही... सोबतीला नवीन गॅझेट रेडी होतंच. सर्वांहून वेगळं गॅझेट आणि नवीन टेकनॉलॉजि म्हणून मिरवायला लागली.... मैत्रिणीही सारख्या कौतुक करायच्या, विविध लोकं विचारायला यायचे, तिला बऱ्याच ठिकाणी परीक्षणाला बोलावणं यायचं, सोशल मीडिया वर जाहिराती ह्या साऱ्या प्रसिद्धीने तिला आणखीच हुरूप यायचा...
"तुला आठवतंय अनु, कित्ती छान पत्रं लिहायचीस तू? तुझ्या पत्रांमध्ये सगळ्या घडामोडी जिवंत करायचीस.. पत्रातल्या अक्षरांकडे आणि नेटकेपणाकडे बघतच राहावसं वाटायचं..."
"आता वेळच कुठे मिळतो रे कामांमधून, सगळं आवरायला वेळ लागतो आणि मग मैत्रिणींच्या गप्पांमध्ये भाग घ्यावा लागतो नाहीतर मी अपडेटेड कशी काय राहील?"
"अगं पण त्यांच्या गप्पांचं काय एवढं? तुला स्वतःकडे वेळ द्यायला हवा ना?"
"अरे त्यांच्या गप्पा ऐकण्यात गम्मत वाटते, नेहमीच आम्ही एकमेकींबद्दल बोलत नाही हां! बरंच नवनवीन शिकायला मिळतं.. शिवाय फेसबुक आहेच की अवांतर बातम्या द्यायला.. आणि youtube वर तर भडीमार आहे ज्ञानाचा!!"
"ह्यातलं तू किती ज्ञान घेतेस आणि उरलेला वेळ कुठल्या गोष्टींत घालवतेस? तू विसरलीस कदाचित, सकाळचं वर्तमानपत्र वाचल्याशिवाय तुझा दिवस सुरु व्हायचा नाही, एकेक पान वेगळं आणि संपूर्ण घडी विस्कटलेलं.. आणि आता ते दाराच्या कडीवरून खालीही उतरत नाही... तू स्वतःला अपग्रेड करत नसून डाऊनग्रेड करत आहेस हे कळतंय का तुला?"
"बरं बाबा उद्यापासून वर्तमानपत्र वाचणार."
"हे बघ, तुझ्या दिनक्रमात ढवळाढवळ करण्याचा माझा उद्देश नाही पण तुला एक सल्ला आहे, सगळं आधुनिक आणि नवीन अनुभवण्याच्या नादात तू पूर्वीचं समृद्ध जगणं विसरू नकोस अगं! हे मायाजाळ आहे, क्षणिक आनंद देणारं... "
अनिता त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करायची. अनिलही मग तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून कामात बुडवून घ्यायचा स्वतःला... त्यांच्यातले मतभेद वाढतच गेले.. तिने स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा निर्णय घेतला, पूर्वीची अनिता आता बदलून गेली. नावे छंद, नव्या सवयी, नव्या मैत्रिणी, नवीन जीवनपद्धती.. सगळं तिला वाटेल तसंच..
अनिताने नवीन टेकनॉलॉजि अपडेट केल्याला ३-४ महिने उलटून गेले.. आता सगळं सवयीचं झालेलं.. कुठलंही नोटिफिकेशन आलं की "टिंग" कॉल आला कि "रिंग" . आता ह्या "टिंग" आणि "रिंग" ची सवय जडली. सतत सोशल मीडिया चा वापर, आता चटक लागली या साऱ्याची... कुणालाही क्षणाचा विलंब न करता उत्तर द्यायचं आणि परत उत्तराची प्रतीक्षा करायची.. सगळं मजेत, तिच्या धुंदीत होती ती... तिचा दिवस कसा संपायचा हे तिलाही कळायचं नाही...
महिने उलटून जात होते सगळं तिच्या मनाप्रमाणे होत असून सुद्धा आता तिला वैताग येऊ लागला. गरज नसतानाही मोबाईल बघण्याची सवय ही सवय नसून बळजबरी होऊ लागली. निर्णय तिचा असल्याने कुणाला बोलताही यायचं नाही. शांतता हवी होती तिला पण सारखं डोक्यात "टिंग" वाजायचं, झोपमोड होऊ लागली म्हणून ती चिडचिडी होऊ लागली, सतत निराशा, नकारात्मक विचार, आणि टोकाला जाणारे विचार.. घरच्यांनाही कळू लागलं पण ती संभाषणाला नकार देत एककेटी राहू लागली. तिला हा बदल प्रकर्षाने जाणवू लागला पण आता पूर्वीची अनिता होणे शक्य नाही हे तिलाही कळून चुकलं..
ती आता जुन्या आठवणीत रमायला लागली... संवाद स्वतःबरोबरच होऊ लागला आणि नैराश्य आयुष्य पोखरू लागलं. स्वतःच्या वागण्याचा तिला पश्चाताप व्हायला लागला.. अनिलला तिचं मन कळलं. तो तिला जपायला लागला. तत्पर होऊन तिच्या सगळ्या आजारांची तपासणी करायचा, हवं नको ते बघायचा.. खूप काळजी घ्यायचा.. पण तिच्या मनातील आणि डोक्यातील वेदना असह्य झाल्या.
मुलाने प्रेमाने आणलेली भेट.. ती टेकनॉलॉजि अनइंस्टॉल होणार नाही हे माहिती होतं. त्याने गम्मत म्हणून आणलं असून फक्त जवळ ठेवायला, अभ्यासाला आणलं असल्याचं आधीच बजावलेलं असतानाही अनिताने ते हट्टाने इंस्टाल केलं.. आता काहीच शक्य नव्हतं... सुरवातीला जेवढ्या उंचीवर आनंद होता आता तेवढाच खाली आला.. विचार करत रात्र झाली आणि तिचा डोळा लागला...
आता सगळं शांत होतं... कशाचाच आवाज नाही. रात्र आहे म्हणून कादाचित सगळं शांत आहे, ती शांततेचा उपभोग घेत होती... तेवढ्यात मोबाईल चा मंद प्रकाश खोलीत पसरला.. "टिंग" न वाजता.. तिला आश्चर्याचा धक्का बसला.. तिचं शरीर निपचित पडून होतं, शांतता चेहेऱ्यावर पसरलेली... आता परत जाग येणे नाही, ते "टिंग" नाही, विचारांचा गुंता नाही, नैराश्य नाही आणि मोबाईल? तो तर नाहीच नाही... आता फक्त शांतता, हवीहवीशी, जिवंतपणी ज्या साठी मन आसुसलेलं ती शांतता...

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

समुद्र

समुद्र.. 
तळाशी शांत आणि वरून खवळलेला समुद्र, लाटांच्या तालावर लहरणारा समुद्र, अथांग आणि त्या बरोबरच सुंदर समुद्र... 
पोटात दडवलेला खजिना अगदी शांत. वाऱ्याच्या प्रवाहाने लाट येऊन वरचे पापुद्रे तेवढे एक एक काढत जाते. वरवर वाऱ्याला तो कितीही मुभा देत असला तरीही आतलं अस्तित्व हलवू देत नाही, समुद्र आत थांगपत्ता न लागू देता वरचेवर त्याच्याशी लढत असतो... 
त्याच्या पुढ्यात जाताच स्वच्छ आणि कोऱ्या पाटीसारखं मन होऊन जातं. आयुष्यातल्या घडामोडी किती छोट्या आणि हा असा थेट समोर उभा असलेला समुद्र कित्ती मोठ्ठा असं वाटतं... सर्वत्र पाणी, किनारा काय ते माहिती नसणारं... चित्रकार पानांवर मनसोक्त रंग उधळून देतो आणि तो सर्वत्र पसरतो तसं चोहोबाजूंनी पसरलेलं पाणी... सूर्योदय आणि सूर्यास्ताला रंगांचा आणि प्रकाशाचा उत्सवच...
अस्तित्व असावं तर समुद्र सारखं.. क्षणा-क्षणाला जाणीव करून देणारं, बाहेरील वादळं कितीही उध्वस्त करणारी असली तरीही स्वतःच्या आतल्या मनाला धक्काही न लागू देणारं..
आपण काही काळ स्वतःला विसरून बघत असतो त्याचा थाट, त्याचं ओरडणं, शांत होणं, किरणांनी चकाकणं आणि त्याचं बेधुंद होणं...
बेभान वाहणाऱ्या वाऱ्याला अंगावर झेलत, त्याच्या आवाजाने शांततेत मिसळलेला विशिष्ट आवाज ऐकत आणि त्याच्या फेसाळणाऱ्या लाटांचा पायांना स्पर्श होताच आनंदून जाणारं मन आणि पाऊलं घेऊन आपण परत फिरतो...
परतीच्या वेळी पुन्हा एकदा त्याला वळून त्याचं विशाल अस्तित्व आणि मनात दाटलेली शांतता फक्त सोबत असते...

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

दप्तर

दप्तर
शाळेत गेलेल्या प्रत्येकाकडे असणारं, अतिशय जवळचं, स्वतःचं दप्तर. रोज रात्री ते जमवून सकाळी पाठीला टांगून निघायचं, मग दिवसभर सोबतच.. छोटं-मोठं कसंही असलं तरी खास कारण तीच एक आपली असलेली वस्तू ज्याला कुणी हातही लावणार नाही.. त्यात एवढी गुपीतं असायची की त्याचं ओझं वाटण्यापेक्षा ते हवंहवंसं वाटायचं...
दप्तर खरंतर एक आवश्यक वस्तू पण आर्थिक स्थर किंवा गरजांची गणितं जमवून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक... आधी एका मळकट आणि जाड कापडाचं दप्तर असायचं, त्याला एक मोठा आणि दोन छोटे कप्पे, उघडझाप करायला दोन मोठ्या बट​​न आणि पाठीवर टांगायला दोन पट्टे एवढंच. त्याच्यावर सुद्धा समाधानी कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे थोड्या अधिक फरकाने एकाच प्रकारचं दप्तर असायचं, किंवा नसायचं. त्यात खूप लवकर बदल होऊन रंगीबेरंगी कापडांची विविध आकाराची दप्तरं आलीत. "ति"चं दप्तर मात्र कधीच बदललं नाही.
तिचं दप्तर म्हणजे जागेचा पुरेपूर उपयोग करून व्यवस्थित जमवलेला एक संसार म्हणावं तसंच.. मला नेहमीच या दप्तरांच कौतुक वाटायचं.. सगळ्या वह्या पुस्तक आणि पेन्सिल-पेनचा डब्बा व्यवस्थित एका कापडाच्या किंवा प्लास्टिक च्या पिशवीत ठेवलेला. ते दोन भागात विभागलेलं, एका भागात वह्या आणि दुस-या भागात पुस्तकं, मधल्या फटीत पेन्सिल चा बारका डबा आणि वह्या-पुस्तकांच्या फटीत काही कागद किंवा लहानसहान वस्तू... त्या पिशवीचं कापड काळपट झालेलं, कडा ताणलेल्या, त्याची शिवण स्पष्ट दिसायला लागलेली.. पिशवी प्लास्टीक ची असेल तर त्यावरचं रंग रूप नष्ट होऊन मूळ पांढरा किंवा काळा रंग दिसायला लागलेला.. हातात पकडण्याची पिशवीची जागा ताणून तुटण्याची वेळ येण्याआधीच ती त्याची ठेवण बदलून पर्स सारखं ऐटीत पकडायची.. रंग व प्लास्टीक किती काळ टीकून राहणार ह्याच्या तपासणीतून आणि निरीक्षणातून जी expiry date ठरलेली आहे त्यापेक्षा कितीतरी दिवस जास्त वापर करू शकते ती तिच्या ह्या दप्तराचा... आपलं दप्तर कितीही जुनं झालं तरीही ते बदलताना जुन्याची हाव सुटायची नाही, परत परत आठवायचं ते.. मग तिलाही ते हवंहवंस वाटत असणार का? की नवी जास्त चांगली पिशवी मिळाल्याच्या आनंदात जुनं पटकन विसरत असेल ती?
ती सगळंच जपून वापरायची त्यामुळेच दप्तरातील वस्तूदेखील जपलेल्या.. घरातील चुलीवरचा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌धूर वस्तूंनाही काळसर बनवत असला तरीही त्या काळपट पुस्तकांच्या आत स्वच्छ पानावर तिची सुरेख अक्षरं दिसायची.. सारखं सोलून अगदीच छोटी झालेली दोन्ही बाजूला टोक असलेली पेन्सिल आणि तेवढाच छोटासा रबर, खूप वापरला गेलेला पेन आणि पट्टी एवढ्यावर तिचं काम भागायचं.. त्यात कुणी जर वाढदिवसानिमित्त पेन्सिल आणि रबर भेट दिले तर तिच्यासाठी आकाश ठेंगणे होणार... तोच आनंद नव्या पुस्तकात, चित्रकलेच्या रंगात, शाळेतून मिळालेल्या नव्या कपड्यात, सगळ्यांत...
खूप थोड्या प्रमाणात मिळणाऱ्या सुखाचा खूप मोठ्ठा आनंद साजरा करणाऱ्या ती चं कौतुक तर वाटायचं पण त्याहीपेक्षा तिच्या डोळ्यांतील उत्सुकता आणि चेहर्यावरील हावभाव बघतांना छान वाटायचं.. खरंतर तीला मिळेल त्या गोष्टीत समाधान मानायची सवयच होती किंबहुना तिने ती सवय लावून घेतलेली होती..
आजही "ती" जिथे कुठे असेल तिथे समाधानीच आयुष्य जगत असेल...

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

शहर

गजबजलेल शहर.. मोट्ठ्या इमारती, तेवढेच मोट्ठे रस्ते, खूप झगमगाट, समृद्धी आणि गरिबीच्या मध्ये शर्यत लागावी आणि बरोबरीचे गुण मिळून दोघांचीही हार-जीत व्हावी अश्या परिस्थितीत असलेलं शहर... हे शहर झोपतच नाही, जणूकाही कारखानातल्या शिफ्ट सारखे दिवस आणि रात्र असे दोन संघ नेहमीच तैनात असतात या शहराला जागं ठेवायला. भल्या पहाटे उजाडलेला दिवस रात्री १ पर्यंत तसाच सुरु असतो, त्याला अंधार उजेडाची समीकरणं चिकटलेली नाहीत. दिवसाचा कुठलाही प्रहार का असेना, एकाच तालात, लयीत आणि घाईत चालत असतं हे शहर. थकलेलं किंवा मरगळलेल नाही तर टवटवीत आणि ताजतवानं. पायांना चाकं लावल्यासारखे इथले लोक सतत कुठे ना कुठे जातच असतात. कुठलंही स्टेशन बघावं तर माणसांची गर्दी आत बाहेर करतच असते. कुठून येतात आणि कुठे जातात ही लोकं इतक्या प्रचंड संख्येनी? हे शहर मात्र सगळ्यांना सामावून घेतं आपल्यात. ह्या गर्दीला वयाची काही मर्यादाच नाही. १० वर्ष वयाची मुलं आणि ७० वर्षाची आज्जी ही एकाच उत्साहाने, धडपडीने आणि जिद्दीने गर्दीत भाग घेतात.
शहरातील खूप वर्दळीचे रस्ते.. स्टेशन, ट्रेन ची गर्दी, लोकांची धावपळ, सर्वत्र फक्त आवाजच आवाज...
सारे रस्ते दिवसभर गर्दीला पळायला मदत करतात..
किती तरी माणसं, प्रत्येक जागी, काना-कोपऱ्यात माणसंच माणसं.. रस्ता केवळ माणसांनी आणि गाड्यांनी भरलेला..
ठराविक वेळेने स्टेशन मधून गर्दीचा लोंढा ह्या रस्त्यावर बाहेर येतो, आणि गर्दी आत जाते.. चक्र सतत सुरूच. मशीन सुरु असावी तसाच हा क्रम.
अश्या आवाजातच हळूहळू ही गर्दी कमी होते, गोंधळ संपतो, रस्ता रिकामा.. रात्र झालेली..
रात्री एखादी गाडी जातेही त्या वरून, पण हा रस्ता निपचित पडून असतो, अगदी ओळखही न पटावी तसा भासू लागतो. जणू त्याचा कायापालट झालाय. एखाद्या मुलीच्या रंग रूपात बदल व्हावा आणि ती निरस वाटू लागावी इतका बदल...
ह्या रिकाम्या रस्त्यावर असणारे वळणही चुकावे इतकी त्या गर्दीची आणि आवाजाची आपल्याला सवय झाली असते. रिकामा रस्ता अनोळखी वाटू लागतो.
आवाज आणि गर्दी ही काही वस्तूंना त्यांची ओळख बनवून देत असावी बहुदा...
त्याच्या मोकळ्या होण्याची काही लोक त्यावर विश्रांती घ्यावी म्हणून वाट बघत असतात.. त्यांच्या सोबत थकून झोपी गेलेल्या लहान बाळासारखा रस्ता झोपला असतो...
सकाळपर्यंत फार थोड्या तासाची विश्रांती घेऊन पुन्हा गर्दीला समोर जाण्यासाठी तो सज्ज होत असावा.
विश्रांती काही तासांसाठीच, कारण हे शहर उशिरा पर्यंत जागून भल्या पहाटेच पुन्हा जागी होतं.
आपली ओळख जागी ठेवायला.. आणि जगायलाही...
इथले रस्ते कुठे बदली मागत असणार का? निदान इथे खूप गर्दी सहन करून झाल्यावर बक्षिस म्हणून एखाद्या आडगावात जाऊन काही दिवसांसाठी निवांत दिवस घालवायला मिळालं त्यांना तर? त्या आडगावात निवांत लोळत पडून निसर्गाच्या कुशीत सुख अनुभवून स्वच्छ होऊन किती आनंदात ते कामावर रुजू होतील! अशी साधी कल्पना करूनही हुरूप येईल इथल्या रस्त्यांना...
सजिव आणि निर्जीव वस्तूंनाही आपल्या वेगानं एका लयीत चालायला शिकवणारं असं हे तरुण शहर स्वतःच्या मर्जीने जगणारं आणि जगवणारं..

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...