शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा करायचे). त्यात पूर्ण वर्गाने मिळून आपापसात पैसे गोळा करायचे, जी वर्गणी गोळा झाली त्यात वर्गाची सजावट, प्रसाद, खाण्याचे पदार्थ आणि भेटवस्तू इत्यादी जमल्यास ते बसवायचं.. वसंत पंचमी च्या दिवशी किंवा पुढे मागे हा कार्यक्रम केल्या जायचा..

ह्या कार्यक्रमाची जबाबदारी अर्थात वर्ग प्रमुख आणि उप-प्रमुखाची असायची, ती दोघं सगळ्यांना कामं नेमून द्यायचे आणि त्याच्या प्रमाणे सर्व ती जबाबदारी पार पडायचे. ह्या साऱ्याची तयारी १०-१२ दिवसांआधी सुरु व्हायची, पूर्ण वर्गात जणू उत्सवाचं वातावरण असायचं. नाश्ता किंवा जेवण जे वर्गणीच्या आकड्यात बसायचं त्या नुसार कोण-कोण काय-काय पदार्थ बनवून आणेल ते ठरायचं (त्या साठी आधी घरी आई तो पदार्थ बनवून देईल का ते विचारून मगच दुसऱ्या दिवशी ती विद्यार्थिनी नक्की करायची).
वर्ग सजावटीचं काम सगळ्यांनी मिळून केलं जायचं, त्यात कुणी रंगीत पट्ट्यांची माळ बनवायचे, कुणी फुलांची सजावट, झाडांच्या छोट्या छोट्या कुंड्या तर कुणी घरून ओढण्या इत्यादी सामान आणून त्याची सजावट करायचे.. हे सगळं काम चित्रकलेचा, क्राफ्ट किंवा पी.टी. च्या तासाला त्या त्या शिक्षकांची परवानगी घेऊन करायला घ्यायचं.
पूजेच्या दिवशी वर्ग झाडून पुसून स्वच्छ करायचा, बाक सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे जेणेकरून जागा मोकळी राहील आणि कार्यक्रम सुटसुटीत होईल. दारात छान रांगोळ्या काढायच्या, सरस्वती च्या फोटोची मांडणी, पूजेची सजावट, हार आणि फुलं आणून आणायची आणि फळ्यावर सरस्वतीचं चित्र काढायचं (कुणा दुसऱ्या वर्गातल्या मुलीला रांगोळी आणि चित्र छान जमत असेल तिलाही आपल्या कार्यक्रमात बोलून घेण्यात यायचं). ही तयारी लवकर लवकर आटोपून घरी जाऊन छान सजून परत यायचं, तोपर्यंत सगळ्या विद्यार्थिनी सजून आलेल्या असायच्या. त्या दिवशी शाळेचा गणवेश नसून रंगीत कपडे घालायला परवानगी असायची.
पूजेला शाळेतील सगळ्या शिक्षकांना एक दिवस आधीच आमंत्रण द्यायचं, ते आले की वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापिका ह्यांच्या हस्ते पूजा करून घ्यायची, सगळ्यांनी मिळून सरस्वतीचं गाणं आणि आरती म्हणून प्रसाद खायचा आणि त्या नंतर जेवण / नाश्ता करून कार्यक्रम संपन्न व्हायचा आणि सुट्टी होऊ सगळे आपापल्या घरी परतायचे..
ज्यांच्या कडे खाण्याच्या पदार्थाची जबाबदारी असायची त्यांनी स्वतः सायकल वर डब्बे मांडून चालत-चालत तोल आणि डब्बे सांभाळत आणायचे आणि रिकामे डब्बे कार्यक्रम संपल्यावर परत तसेच मांडून न्यायचे.. उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळे तापतं ऊन आणि त्या उन्हातून सायकल वर मांडलेले डब्बे वाजवत गप्पा करत चालतच घरी जायचं.. तो दिवस मजेतच संपायचा.. एका वर्गात सकाळी आणि दुपारी असे दोन वर्ग भरायचे तेव्हा दुसऱ्या वर्गाला छान सजलेला वर्ग मिळायचा..
प्रत्येक वर्गाचा असा हा स्वतंत्र कार्यक्रम वर्षातून एकदा व्हायचा.. ज्या वर्गाचा कार्यक्रम असायचा ते तर आनंदात असायचेच पण बाकी वर्गातील विध्यार्थीनी सगळं निरीक्षण करत असायचे, कुणी कसं सजलंय, वर्ग कसा सजवलाय, खाण्याचे पदार्थ काय ठेवले असणार, दारात रांगोळी कशी काढली ह्यापासून सगळंच.. तो एक दिवस तर धमाल असायचीच पण त्या आधीचे दिवस सुद्धा तयारी आणि जमवाजमव करण्यात मजेत जायचे.. कोणत्या वर्गाची पूजा सगळ्यात छान झाली हे सुद्धा निरीक्षण व्हायचं त्यामुळे सगळे आपापल्या परीने प्रयत्न करायचे..
ह्या सगळ्यातून जबाबदारीची जाणीव, नियोजन, मिळून काम करणे आणि कार्यक्रमाचं व्यवस्थापन आपोआप शिकता यायचं..

पंचपक्वानांचं ताट

 समोर असलेलं पंचपक्वानांचं ताट, त्यातले पदार्थ काही गोड, काही तिखट, काही आंबट, तुरट इत्यादी चवीने पूर्ण.. सुरुवात कुठून करावी हा ही प्रश्न पडतो कधी, पण सवयीप्रमाणे काही जण आपल्या आवडीचा पदार्थ शेवटी खाण्यासाठी राखून ठेवतात. तो पदार्थही बऱ्याचदा असा असतो की जेवताना एकदाच वाढण्यात येतो.

आपल्याला सवय असते जे काही नावडतं असेल ते पहिले संपवून शेवटी आपल्याला आवडणारा आणि ज्याची चव जिभेवर रेंगाळत राहावी असा पदार्थ आरामात मिटक्या मारत खावा. तसं जेवताना एक डोळा किंवा बारीक नजर त्या पदार्थाकडेच असते. आतून आपण खुश होत असतो आणि तो शेवट आपल्या मनात रुंजी घालत असतो. मस्तीखोर मित्रांमध्ये किंवा भावंडांमध्ये बसल्यावर तर कधी कधी त्या वाटीवर हात ठेवून जेवण उरकत असतो जेणेकरून कुणी तो पदार्थ पळवू नये..

पण बऱ्याचदा असं होतं की ताटातलं बाकीचं जेवण संपवण्याच्या नादात आवडीच्या पदार्थासाठी भूकच शिल्लक राहिलेली नसते. मग ते नंतर खाऊ, बांधून घेऊ आणि घरी जाऊन खाऊ किंवा घरीच असेल तर राखून ठेऊ, किंवा बळजबरी खाऊ हे पर्याय उरतात. तो सुरवातीला असलेला आनंद कुठेतरी हरवतो. आता तो पदार्थ म्हणजे एक जबाबदारी किंवा ओझं असल्यासारखं वाटू लागतं. त्याचा मनासारखा आस्वाद घ्यायचं राहूनच जातं.. मग वाटतं आधीच खायला हवं होतं का? थोडं थोडं प्रत्येक पदार्थासोबत संपलंही असतं..

आयुष्यासोबत देखील आपण बऱ्याचदा हेच करत असतो.. आनंदाचे, आवडीचे आणि खऱ्या अर्थाने "जगण्याचे" क्षण नेहमी लांबणीवर टाकत तिखट, आंबट, कडू, तुरट चवी पहिले संपण्याचा प्रयत्न करतो, हे क्षण एकदाचे जगून झाले की मग मनसोक्त गोड क्षण जगायला बघतो.. तसंच एखादा खूप आवडलेला शर्ट, ड्रेस, साडी, दागिना जपून ठेवतो नंतर खास प्रसंगी घालूया आता खराब होईल, पण ती वेळ येत पर्यंत त्यातला उत्साह निघून जातो किंवा आपल्या शरीराला आता ते बरोबर होत नसतं किंवा बरीच कारणं..

असे लांबणीवर टाकलेले आनंदाचे क्षण जगण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपल्याकडे इच्छा, शक्ती, उत्साह, हुरूप ह्यापैकी काहीतरी उणीव जाणवतेच.. तेव्हा समोर आलेलं सगळ्या चवीने परिपूर्ण असलेलं पंचपक्वानांचं ताट काहीही राखून न ठेवता संपूर्ण आस्वाद घेत संपवलं तर तृप्त झाल्याची भावना नक्कीच मिळते..

भेट

 आपल्या विस्मृतीत गेलेल्या आणि अचानक कधीतरी जाग्या होणाऱ्या कितीतरी आठवणी आणि त्याचं आता काही होणं नाही असं वाटून व्याकुळ होणारं मन.. ह्या सगळ्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात कधी जागेशी, कधी वस्तूंशी तर बऱ्याच वेळा लोकांशी..

कितीतरी व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाला धार लावून जातात, काही हळवा कोपरा तयार करतात, काही राग करायला शिकवतात तर काही प्रेम करायला आणि लळा लावायला शिकवतात..
व्यक्ती तितक्या तर्हा, तितके मतभेद, तितक्याच वाटाघाटी आणि आणखीही बरंच काही..
आपला भलामोठा किंवा मोजका मित्र परिवार.. एका विशिष्ट वेळेत मित्र सोबती म्हणून भेटतात, काही काळ सोबत असतात आणि वेळ आली की निघून जातात, पुन्हा भेटण्याचे ठरवून.. परत वेगळी जागा, वेगळी वेळ, नवे सोबती, नव्या जमा होत जाणाऱ्या आठवणी आणि परत भेटण्याचे आश्वासन देत घेतला जाणारा निरोप.. कत्येकदा हे दूर जाणं परिस्थितीवर अवलंबून असतं, वेळच अशी येते की जाणं भाग पण नंतर भेटण्याचा विश्वास बळ देतो..
जरा भूतकाळात डोकावून बघा, त्यातल्या अर्ध्या जणांशी सुद्धा परत भेट झाली नसेल.. भेटायचं आहे पण वेळ नाही, वेळ आहे पण साधन नाही, कितीतरी कारणं.. बरं ही कारणं सगळी खोटी का? तर नक्कीच नाही. मैत्रीत दुरावा पण नाही.. कित्येक महिन्यांनी एखादा कॉल किंवा मॅसेज करूनही त्याच मित्रत्वाच्या भावनेने आणि त्या वेळी जसे असू तसेच एकमेकांसमोर व्यक्त होतो.. पण काही वेळा, भेटी ह्या परत होतंच नाहीत.. खूप फॉलोअप घेऊन एखादी स्वतंत्र किंवा ग्रुप भेट घडवता येतेही, नाही असं नाही, पण ती अचानक किंवा अति कष्ट न करता घडून आलेल्या भेटीची सर त्याला येत नाही..
असंच आपण आठवणी गोळा करत पुढे जातो आणि अचानक कुठल्याश्या अनपेक्षित वेळी आणि ती आठवण जागी होते.. भेटायला हवं कधीतरी असं म्हणून मनाशीच काहीतरी ठरवल्या जातं.. तेवढ्यावर मनाची समजूत काढून पुढ्यात असलेल्या कामात लक्ष दिल्या जातं.. अश्या कित्येक भेटी तिथेच राहून जातात.. खूप हव्या असणाऱ्या पण कधीच घडून न येणाऱ्या..

अनोखे मित्रमंडळ

तुम्ही रस्त्याने कुठे जायला निघालात, जाता जाता एक मंदिर दिसलं, तुम्ही भक्तिभावे हात जोडले आणि पुढे निघालात..

थोड्या पुढे जाताच एक चर्च दिसलं, तुम्ही न बघता पुढे गेलात, पुढे एक मस्जिद दिसली, तिथेही न बघता पुढे गेलात.. पण काय खात्री की तुम्ही जिथे हात जोडले तिथे देव असणारच? सामान्यतः आपण सगळे आपल्या संबंधित धार्मिक स्थळांना बघून आदराने वंदन करतो पण बाकींकडे दुर्लक्ष करून पुढे जातो..

जसे आपले तसेच देवांचेही मित्र मंडळ शीख, पारसी, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी धर्माची असू शकतात.. ते सुद्धा त्यांच्या सोबत काही वेळ घालवतंच असतील ना.. तुम्ही आदराने वंदन केलंत पण संबंधित देव तिथे नसून जवळंच दुसऱ्या धार्मिक स्थळावर विरंगुळा म्हणून मित्रांसोबत गप्पा मारत असतील तर (अर्थात भक्तांची गर्दी नसते अश्या वेळी)?
जर कधी देवाला इच्छा झाली आणि चर्च मध्ये जाऊन ते आणि ख्रिस्त गप्पा मारत असतील आणि आपण चर्च कडे दुर्लक्ष करून मंदिरासमोर हात जोडले?
कधी ख्रिस्त मस्जिद च्या पायऱ्यांवर बसून अल्लाह बरोबर गप्पा मारत असतील आणि तुम्ही तर आताच चर्च समोर वंदन करून आलात आणि मस्जिद कडे लक्षच दिलं नाही..
कधी दर्ग्याच्या कट्ट्यावर ही सगळी मंडळी जमलेली आहेत आणि तुम्ही तिकडे न बघता पुढे निघताय, सगळे हसत असतील ना ह्यावर?
तुम्ही चर्च कडे दुर्लक्ष केलंत, मस्जिद बघितलीच नाही, गुरुद्वारा बघितला नाही पण अहो देव तर तिथेच होते. तसंच कधी मंदिरात सगळे जमलेत आणि तुम्ही मंदिराला हात जोडलेच नाही मग? इग्नोर केलंत तुम्ही..  

बरं ही सगळी मंडळी भेटल्यावर काय चर्चा करत असणार? त्यांच्या चर्चांचे विषयही आपल्या ग्रुप मधल्या विषयांप्रमाणे असतील? जागतिक प्रश्न, पर्यावरण, व्यस्त दिवस, इतर समस्या, कधी भक्तांची भलीमोठी रांग, त्यांच्या छोट्या मोठ्या मागण्या, आवडते भक्त, त्रास देणारे भक्त, आस्तिक नास्तिक फरक इत्यादी.. धर्म कोणताही असला तरीही माणसांची मनं सारखीच म्हणून मागण्याही बऱ्याचश्या सारख्याच..

आपल्या धार्मिक भावभावना आणि त्यांच्या प्रतिमा आपण ठरवल्यात आणि निवडल्या आहेत.. ती शक्ती एकच, तिथे भेद नाहीत, आहेत ते भेद आपण ठरवलेत..  
ही सगळी मंडळी नावाने वेगळी पण भाव एकंच… शक्ती एकच.. पण त्यांच्या पूजनाचे नियम मात्र आपणच ठरवल्या प्रमाणे वेगवेगळे..

शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम

 

शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम… एक आनंदाची, उत्साहाची लहर… शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग सगळेच त्यात उत्साहात सहभाग घेतात. लहानांना सांभाळणारे मोठ्या विद्यार्थ्यांचे संघ, विविध योजना, कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा, सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांची कधी नव्हे ते थोडी कमी होणारी भीती.. रोजच्या अभ्यासात आणि शिस्तीत असा विरंगुळा म्हणजे मेजवानीच
दररोज शाळा सुटायच्या एक तास आधी नाटक- नृत्य- गायनाचा सराव, खेळांच्या स्पर्धा, विविध संघांची विविध कामे, अभ्यासाच्या तासातून ह्या कारणाने सुटका, हेवेदावे, मस्ती, मेहेनत, नवीन मैत्री, बऱ्याच दिवसांपासून चालत आलेली भांडणं पुन्हा मैत्रीत बदलणं, सगळंच कसं मनासारखं होतं ह्या दिवसांत… आणि त्यातल्या त्यात कार्यक्रमांना शिक्षक नटून सजून आलेले बघायला येणारी मज्जा ही वेगळीच.. आता चित्र थोडं बदललंय पण हे कार्यक्रम बघण्यात आत्ताही मज्जा येते..
शाळांचे असे कार्यक्रम बालपणात घेऊन जातात.. आपणही काय काय केलेलं ते सगळं आठवतं.. कीतीतरी स्पर्धा.. भाषण, वादविवाद, कथाकथन, नाटकं, नृत्य, गायन, खेळांच्या वेगळ्या स्पर्धा, गर्दीच नियंत्रण नेमाने बघणारे संघ, एक महिना तरी हे सगळं चालायचं…
आताचा शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सगळं अप टू डेट असतंच, नव्हे ते असायलाच हवं हा अट्टाहास. सजावटीच्या सामानापासून ते कपड्यांपर्यंत सगळं तयार विकत घ्यायचं, ते बनवायचे किंवा जमवायचे कष्ट नकोच.. हे सगळं बघून माझ्या शाळेतला सांस्कृतिक कार्यक्रम हमखास आठवतो. त्याची आठवण अजूनही चेहेऱ्यावर आनंद देऊन जाते. जे काही करायचं ते संपूर्ण वर्गाने ठरवायचं, सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बनवायची, त्यातून एक संघ तयार व्हायचा, त्यांनीच गाणं निवडायचं, नृत्याची तयारी करायची आणि वर्ग शिक्षकाला दाखवायचं, सरावासाठी कुणाच्या घरी जायचं ते ही ठरवलं जायचं… नाटकाला किंवा डान्स साठी लागणारे कपडे जमावयचे, ते मोठे असले तरीही कसातरी जमवुन घ्यायचं.. कीतीतरी जुन्या अडगळीतल्या वस्तू सुद्धा हुडकून हवी ती गोष्ट काढायची, घरातल्या लोकांना त्रासून सोडायचं.. प्रत्येक वर्षी हे चक्र सुरुच असायचं.. रेडिमेड ची चंगळ परवडणारी नव्हती शाळांना आणि पालकांनाही..
त्यानंतर मेकअप हा आणखी स्वतंत्र विषय. जणूकाही ओठांवरची लिपस्टिक, चेहेऱ्यावर लावलं जाणारं फाउंडेशन आणि गालांवरच रुझ हे नंतर कधीच आयुष्यात लावायला मिळणार नाही असं फासलं जायचं.. डान्स मधल्या सगळ्यांचा चेहेरा एकसारखा बनवायचा, केस, पोशाख सगळं चापून-चोपून बसवायचं.. हाताची बोटं लाल रंगाने रंगवायची, त्यात मुलगा झालेल्या मुलींना पण ते लावलं जायचं ही वेगळी गम्मत.. शिक्षिका तरी काय करणार? एवढ्या विद्यार्थ्यांना एकत्र तयार करताना त्यांची ही तारांबळ उडायची.. त्या गडबडीत कुणाचं काहीतरी राहून जायचं, त्या मुलीला ते स्टेज वर गेल्यावर लक्षात यायचं, मग शिक्षिका बोलायच्या आता असुदे काही होत नाही. ती मुलगीही सगळं विसरून डान्स करायची.. असे कित्येक प्रसंग...
जुन्या आठवणी फोटोच्या जुन्या अल्बम मधून भेटतात.. ते बघतांना सगळे प्रसंग जिवंत होतात.. तेव्हा कित्ती वेगळे आणि विचीत्र दिसलेले आपण आता बघून मज्जा येते..
आता सगळंच रेडी टु वेअर, यूज आणि थ्रो, मग मागच्या वर्षीचं जपून ठेवलेलं सामान या वर्षी वापरायला कमीच मिळतं. ते सामानाच्या पेट्या जपणं नको की ते सामान ज्याचं त्याला परत करणं नको.. आपण ते जमवण्याच्या नादात आठवणीच गोळा करत होतो असं वाटून जातं..

जगाप्रमाने साहजिकच सगळं बदलायला हवं आणि ते बदलणार आहेच.. हे ही भरभरून जगावं.. सहज कधी ह्या कार्यक्रमांना हजेरी लावावी. ती छोटी छोटी मुलं, त्यांचा तो गोड makeup, आजही तेवढाच अावडून जातो. हा कार्यक्रम सगळ्यांनी भरभरून जगावा.. पालकांनी, मुला मुलींनी, शिक्षकांनी सगळ्यांनी.. एक उत्साहाची लहर आपल्यातही येईल आणि ती काही काळ का होईना आपल्याला आनंदी ठेवेल...


क्लोन

 . प्रोग्रॅम कोडींग आटोपून लॅपटॉप बंद करायला सकाळचे ६ वाजले होते.. आता झोपेला वेळ नाहीच. ८ वाजता ऑफिसला निघायचं म्हणजे आवरायला हवं ह्या विचारातच वीणा उठली. कित्येक दिवसांपासून तिची रात्रीची झोप फक्त २-३ तास व्हायची.. बरंचसं काम अजूनही बाकी होतं.. मग २ तासातले ३० मिनिटं परत त्या कामाचा आराखडा बनवण्यात तिने घालवला.. टीम सांभाळणं, प्रत्येकाने काय काम केलं त्याचं टेस्टिंग, सिक्युरिटी बघणं सगळं तिला करावं लागत होतं.. भराभर आवरून ती बाहेर पडली..

रस्त्यावर गाडी चालवणं म्हणजे नकोसं काम.. हल्ली क्लोन चा प्रकार वाढीस लागल्यामुळे गर्दीच गर्दी.. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये क्लोनचे सॉफ्टवेअर बनवायला स्पर्धाच सुरु आहे.. ३०-३५ वर्षांपूर्वी असाच एक अँड्रॉइड प्रकार गाजलेला.. मोबाईल च्या आहारी जाणं, त्यातून येणार मानसिक ताण, थकवा, आजारपण सगळं त्या पिढीने अनुभवलं आणि त्यातून सावरलंही.. आता हा आणखी नवा प्रकार/ बदल.. वीणा वैतागून गाडी चालवत होती..

जिकडे बघावं तिकडे प्लास्टिक च्या आवरणात लपेटलेले मशीन्स.. वरून हुबेहूब माणसाचं शरीर.. पण रोबोटच ते, क्लोन नावाने प्रचलित.. ओळखणंही कठीण होऊन बसलंय. त्यात भर म्हणजे काही महागड्या क्लोन मध्ये सेट केलेल्या प्रोग्रॅम मध्ये समोरच्या माणसांचं अनुकरण करण्याचं तंत्र.. त्यांचे हावभाव आणि त्यांचा एकंदरीत स्वभाव ते खेचून घेतील.. ह्याचाच अर्थ आता त्यांच्या वागण्याचा नियोजित आराखडा नाही.. विज्ञानाने मुख्यत्वे AI ने प्रगती केली पण इतकी की त्याचं भूत आता आपल्याच मानगुटीवर बसलंय. माणसांचे क्लोन बनवण्याच्या कंपन्या हल्ली खूपच वाढल्यात. त्यात काम करणारेही क्लोनच! त्यांचा खर्च म्हणायला काहीच नाही. राहण्याची व्यवस्था गोदामात.. एका गोदामात कितीतरी एकत्र बसतील (किंवा उभेच). खायला प्यायला काहीही नको, चार्ज केलं तेवढं बास.. वरून सोलर टेकनॉलॉजि तेव्हा पहाटे गोदामाचं छप्पर उघडलं की १२ वाजेपर्यंत १००% बॅटरी चार्ज.. मग दिवसभर काम करायची ऊर्जा त्यांना मिळालेली.. आता उद्योग क्षेत्रात नवनवीन मॉडेल बनवण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली.. त्यातही कहर म्हणजे नवनवीन चेहेरे आणायचे कुठून? म्हणून अति दुर्गम भागात जाऊन तिथल्या माणसांचे फोटो काढायचे आणि तीच डिझाइन्स इथे वापरायची.. हुबेहूब रूप द्यायचं.. तिकडची लोकं शहरात येणे कमीच म्हणून ह्यांना डुप्लिकेट चेहेऱ्यांची शक्यता नाही.. त्यांना ना कोणत्या आजाराची ना मरणाची भीती (काही खराब झालं की दुरुस्त करायचं किंवा एक्सपायरी झाली की बदलायचं).. माणसाच्या मेंदूचे सगळे फंक्शन टाकायची गरज नव्हती खरंतर, पण काही अपडेटेड मॉडेल्स आणि प्रीमियम प्रॉडक्ट मध्ये तेही उपलब्ध.. त्यांचा दर्जा आणि त्यावरून किंमत.. देशाची लोकसंख्या कमी की काय म्हणून ही भर!

हे काही आत्ताचं संशोधन नाही, बरीच वर्ष झालीत ह्या शोधाला.. आधीही हुबेहूब माणसांत मिसळणारे आणि दिसणारे क्लोन बनवण्यात यश आलं होतं पण तेव्हा कुठे थांबायचं हे त्यांना कळलेलं.. ऑफिस जवळ येताच तिच्या विचारांची गती थोडी मंदावली..

. ऑफिस मध्ये दिनक्रम सुरु.. मिटींग्स, प्रेसेंटेशन्स, डेडलाईन्स सगळं रोजचं.. बरंच थकायला झालं पण कामाचा उत्साह होताच.. प्रोजेक्ट पूर्ण व्हायला आता १० दिवस बाकी होते.. त्यावर काम करणाऱ्या सगळ्यांमध्ये उत्साह, हुरूप आणि ऊर्जा भरून आलेली.. वीणा आता एक एक दिवस मोजत होती, तिच्या साठी हे प्रोजेक्ट खूप महत्वाचं होतं कारण ते तिच्या कंपनीला टेकनॉलॉजि च्या जगात एक उच्च स्थान प्राप्त करून देणारं ठरणार होतं.. क्लोनचं असं सॉफ्टवेअर जे त्यांचा दर्जा, वेगळेपण आणि कार्यक्षमता खूप पटीने वाढवेल..

भरपूर प्रयत्न आणि मेहनतीने त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला.. फायनल टेस्टिंग ची पूर्ण जबाबदारी वीणा आणि टीम सांभाळत होती.. क्लोनचं हार्डवेर मॉडेल बनून त्यात सिस्टिम्सचं सेटअप झालं आणि फायनल टेस्ट होऊन हार्डवेर मॉडेल दाखवण्यासाठी सज्ज झालं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून आता परीक्षणाला सुरवात झाली.. तब्बल ३-४ तासाने त्या प्रोजेक्ट ला शेवटच्या चाचणीतही यश मिळालं आणि ते लाँच साठी मंजूर झालं..

प्रोजेक्ट लाईव्ह होऊन आता ते लाँच करायचा दिवस आला.. वीणा नेहमीप्रमाणे शांत आणि उत्साही होती.. तिच्या व्यावसाईक जीवनाला नवीन उंची मिळणार होती आणि संपूर्ण टीम आणि कंपनीसाठी हा खूप महत्वाचा दिवस होता.. सभागृह गच्च भरलेलं होता, सगळे कर्मचारी आणि प्रमुख व्यक्ती स्थानापन्न झालेले.. कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिचं आणि संपूर्ण टीम चं खूप कौतुक झालं. प्रोजेक्ट ची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवल्या गेलं आणि सगळी जमलेली मंडळी आश्चर्यचकित आणि आनंदित होऊन टाळ्यांचा कडकडाट करू लागली.. कार्यक्रमाचा निरोप आणि आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी अर्थात वीणा ने घेतली होती..
टाळ्यांच्या आवाजात तिचं स्वागत झालं.. ती प्रोजेक्ट बद्दल आणि टीम च्या प्रयत्नांबद्दल, वेळोवेळी मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करत होती.. सगळ्यांचे धन्यवाद देऊन तिचं आभार प्रदर्शन संपलं..

. सभोवताली नजर फिरवून तिने एक लांब श्वास घेतला आणि प्रोजेक्टर सुरु करण्याचा इशारा केला. स्क्रीनवर "सिस्टिम क्रॅश" लाल अक्षरात लिहून आलं..
समोर बसलेल्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर आश्चर्य आणि भीती दाटून आली.. हा काय प्रकार असावा म्हणून मंचावर बसलेली मंडळीही कुजबुज करू लागली..
काही क्षणातच वीणाच्या कंपनीचे अध्यक्ष ह्यांनी बोलायला सुरुवात केली..

"तुम्ही बघताय ते सत्य आहे.. आज ह्या क्षणापासून तुमच्या आसपासच्या सगळ्या क्लोन मध्ये Virus आलेला आहे आणि त्याने सिस्टिम क्रॅश केलेली आहे.. आजपासून क्लोन च्या प्रकाराला पूर्णविराम. ज्या क्षेत्रात ह्याची खरंच गरज आहे फक्त तिथेच ह्यांचा वापर केल्या जाईल आणि ते ही अग्रीमेंट वरच. बाकी सगळ्या क्षेत्रात माणसांची जागा माणसांनाच देण्यात येईल आणि ह्यावर सगळ्यांची संमती असणे अनिवार्य आहे कारण हा निर्णय शासकीय कार्यालयातूनही मंजूर झालेला आहे.."

सभागृहात शांतता पसरली.. तेवढ्यात अध्यक्षांनी बोलायला सुरुवात केली..

"क्लोन प्रचलित झाल्यापासून बऱ्याच लोकांच्या नौकऱ्या गेल्या, पोटापाण्याचा व्यवसाय मंदावला, सगळी काम क्लोन करायला लागले तेव्हा फक्त त्यांना सांभाळणं हेच एक काम, बाकी सगळी किरकोळ कामं. क्लोन साठी ट्रैनिंग, मशीन अपडेट, दुरुस्ती करणे हेच मुख्य काम.. शहरात बेरोजगारीचा कहर, चोऱ्यांचे वाढते प्रकार आणि असंख्य समस्या.. अश्या अवघड परिस्थितीत कसं जगायचं? हाच प्रश्न वीणालाही पडला आणि ती माझ्याशी बोलली.. तिला तर वाटायचं एखाद्या रात्री ह्यांच्या गोदामाला आग लावून द्यावी म्हणजे प्रश्नच मिटला.. सगळं पूर्वीसारखं सुरळीत सुरु होईल.. ह्या चिडण्या मागचं कारणही तसंच होतं.. तिला समाजसेवेची आवड. नौकरी करून सुट्टीच्या दिवशी ती हे काम आवडीने करायची. रोज रोज लोकांची रोजगाराची वाढती समस्या तिला बघवत नव्हती. तिने नेत्यांचा आधार घ्यायचा ठरवला.. त्यांनी ह्या साऱ्यांवर दबाव टाकण्यास पुढाकार घेतला तर हे प्रकरण ते खूप पुढे नेऊ शकतात असं तिला वाटलं.. दबावाने ही समस्या कदाचित कमी होऊ शकेल असा अंदाज तिने बांधला.. पण त्यांच्या भेटीत जे तिने ऐकलं त्याने तिलाही धक्काच बसला.. नेत्यांचं म्हणणं की येत्या निवडणुकीत माणसांऐवजी क्लोनचाच वापर करणार.. अहो ते स्वस्त पडत!! त्यांचेही पॅकेजेस असतात म्हणे.. एक पॅकेज विकत घेतलं की प्रचाराचा प्रश्न मिटला.. नंतर बाकीचा अवांतर खर्च नको, मटण, कोंबडी, दारू काही काही नको.. फक्त माणसाच्या आवाजात एक मस्त पैकी रेकॉर्डिंग केली की संपल.. बाकी कामं तेच सांभाळतील.. किती ही घुसखोरी.. कंपन्यांचं उत्पन्न भरघोस वाढतंय.. सगळ्या क्षेत्रात त्यांचं अस्तित्व आहे.. आणि आता निवडणुका?? वीणाचा संताप अनावर होत होता.. तडक जावं आणि वरच्या पातळीवर कम्प्लेंट करावी.. पण त्याने प्रश्न सुटणार नव्हता.. हे प्रकरण वाटतं तितकं सोप्पं मुळीच नव्हतं.. बराच वेळ विचार केल्यावर तिच्या डोक्यात एक कल्पना आली आणि तिने ती माझ्यासमोर मांडली.. ह्या सगळ्या गोष्टींना खूप मेहेनत आणि लोकांनाच सहभाग लागणार होता. पण काहीही झालं तरी मागे फिरायचं नाही हे आम्ही मनाशी ठरवलं.."

"अथक प्रयत्न करून शेवटी सॉफ्टवेअर बनून तयार झालं होतं.. दिवसा ऑफिस च्या प्रोजेक्ट वर काम आणि रात्री हे सीक्रेट प्रोजेक्ट.. ह्या मेहेनतीचं फळ म्हणजेच त्यांनी एक असा प्रोग्राम बनवला ज्याने ते सगळे क्लोन एकाच वेळी निकामी होतील.. सर्वोत्तम संस्थेमधील २० जणांची टीम ह्या सॉफ्टवेअर प्रोजेक्ट वर काम करत होती. सगळं काही नियोजित वेळेत पर पडलं ह्याचा सर्वांना आनंद होता.. इतक्या दिवसांमध्ये वीणाने सगळ्या कंपन्यांची पूर्ण माहिती काढून ठेवलेली होती. किती क्लोन तयार झाले आहेत, किती बनवण्याच्या प्रक्रिये मध्ये आहेत, किती वार्षिक उत्पन्न आणि बरंच काही.. तिच्या ओळखीचे आणि मुख्य म्हणजे विश्वासातले लोक तिच्या या प्रयत्नात सहभागी झाले आणि त्याला एका मोहिमेचे स्वरूप आलं.. जे काही घटक ह्या मोहिमेशी निगडित होते ते सर्व खात्रीशीर आणि यश्वस्वी रित्या सांभाळले आणि काम पूर्ण केले.. सगळ्या पातळीवर विचार करून आणि विचारवंतांचे मुद्दे लक्षात घेऊन त्यांची संमती मिळवून ह्या मोहिमेला यश आलंय.. "

अध्यक्षांचं बोलणं पूर्ण झालं तरीही शांतता कायम राहिली, कुणी प्रश्न विचारले त्यांची उत्तरं देऊन समस्यांचं समाधान झालं.. एव्हाना Social Media वर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.. लोकांनी आनंदाने ह्या निर्णयाचं स्वागत केलं..

. कार्यक्रम संपवून घरी जाताना सगळ्यांना बाहेर निकामी पडलेले क्लोन आणि त्यांना रस्त्याच्या बाजूला एका जागी मांडून ठेवणारी टीम दिसत होती.. त्या सगळ्यांनी सारखे टी-शर्ट घातले होते ज्यावर लिहिलं होतं "नो क्लोन". ह्याचीही सोय वीणा आणि टीम ने करून ठेवली होती तर!!

उगाच...

 उगाच...

उगाच रुसवे, उगाच फुगवे,
उगाच मत्सर, उगाच जळफट,
स्वतःमधील 'त्या' मनाची कशास करावी उगाच फरफट..

उगाच उसासे, उगाच बोभाटे,
उगाच ओरडा, उगाच हळहळ,
सारेच असूनी भवती आता कशास मग ही नुसती तगमग..

नाही काहीच स्थिर तरीही..
उगाच अडगळ, उगाच घुुसमट,
थोडे होता स्वतः प्रवाही, होईल आणिक थोडी वरचढ..

उगाच द्वेष, उगाच गर्व,
उगाच संभ्रम, उगाच संशय,
प्रेम उगवले अंगणी सारे, कशास ते रागाचे कुंपण..

उगाच जगणे मनाविरोधी, उगाच मरणे वाट पाहूनी..
नसे नावीन्य त्यातही काही, उगाच उसने उधार जगणे..

चैतन्याची ज्योत पेटवूनी उजळूया आयुष्य सारे...
जळमटं धुवूनी उदासीनतेची अपार आनंदाने..
जगण्याचाही उत्सव व्हावा अशाच उत्साहाने...

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...