लाटा...
बेधुंद उसळणाऱ्या लाटांच्या आवाजानं मनात लय पकडली की तल्लीन होऊन त्या फेसाळणाऱ्या प्रवाहाला बघत राहावं... भान विसरून फक्त त्या गतीला आणि आवेगाला अनुभवावं... लाटांचा वेग भिनायला लागला ना की मग मन हलकं हलकं होऊन जातं. त्यांचा वेग वारा ठरवतो, समुद्राच्या पृष्ठभागावरुन तो जणू पाण्याचा एक एक पापुद्रा काढत लाट निर्माण करतो. समुद्राच्या आतल्या वादळाच्या पटीने लाटांची तीव्रता तशी कमीच पण ती अनोखी आहे. प्रत्येक वेळी ती नवीन असते... नव्याने येते आणि किनाऱ्याला भिडून परत फिरून जाते. ती जेव्हा किनाऱ्याला भिडते तेव्हा त्या प्रचंड आवाजाने, पाण्याच्या उडणाऱ्या तुषारने आणि सोबत तितक्याच वेगाने येणाऱ्या वाऱ्याने आपल्याला हलवून जाते, मनातून जागं करून जाते. तासंतास त्या एकापाठोपाठ येणाऱ्या लाटांना बघूनही मन भरतच नाही...
लाटांसारखं होता आलं पाहिजे खरंतर... समुद्रातील अनावश्यक वस्तू तिच्या कुवतीनुसार किनाऱ्याला सुपूर्द करून ती परत फिरते, स्वच्छ होऊन जाते... परत नव्या लाटेसाठी सज्ज होते... असंख्य लाटा आणि तेवढेच त्यांचे समुद्र किनारी कोसळणे, परत जाणे आणि परत येणे.. हाच क्रम सतत सुरु असतो.. माणसांचं तरी वेगळं काय आहे? ती पण मनातल्या भावना सतत व्यक्त करत असतात.. प्रेम, राग, सुख-दुःख, करुणा, आणि बऱ्याच भावना घेऊन सतत पुढच्या माणसावर लाटांसारखंच कोसळतात आणि मग हलक्या मनाने परत आपल्या आयुष्यात चालत राहतात... पुन्हा काही घटनांचा वारा येतो, भावना तयार होतात परत कोसळतात आणि परत शांत... खरंतर असंच असायला हवं पण काही माणसं व्यक्त होतंच नाहीत, दाबून ठेवतात आतल्या आत आणि मग एकदाचं असह्य झालं की वादळाच्या रूपात कोसळतात.. सगळं उध्वस्त करतात...
लाटांची मोजणी करत बसू नये, एका तासात किती एका दिवसात किती. मोजमापाच्या पलीकडे जाऊन ते सगळं अनुभवायला हवं. कदाचित ती आपल्या मनातला ताण ही किनाऱ्यावर सोडून जायला सांगत असते अगदी तिच्याच प्रमाणे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा