शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

दप्तर

दप्तर
शाळेत गेलेल्या प्रत्येकाकडे असणारं, अतिशय जवळचं, स्वतःचं दप्तर. रोज रात्री ते जमवून सकाळी पाठीला टांगून निघायचं, मग दिवसभर सोबतच.. छोटं-मोठं कसंही असलं तरी खास कारण तीच एक आपली असलेली वस्तू ज्याला कुणी हातही लावणार नाही.. त्यात एवढी गुपीतं असायची की त्याचं ओझं वाटण्यापेक्षा ते हवंहवंसं वाटायचं...
दप्तर खरंतर एक आवश्यक वस्तू पण आर्थिक स्थर किंवा गरजांची गणितं जमवून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक... आधी एका मळकट आणि जाड कापडाचं दप्तर असायचं, त्याला एक मोठा आणि दोन छोटे कप्पे, उघडझाप करायला दोन मोठ्या बट​​न आणि पाठीवर टांगायला दोन पट्टे एवढंच. त्याच्यावर सुद्धा समाधानी कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे थोड्या अधिक फरकाने एकाच प्रकारचं दप्तर असायचं, किंवा नसायचं. त्यात खूप लवकर बदल होऊन रंगीबेरंगी कापडांची विविध आकाराची दप्तरं आलीत. "ति"चं दप्तर मात्र कधीच बदललं नाही.
तिचं दप्तर म्हणजे जागेचा पुरेपूर उपयोग करून व्यवस्थित जमवलेला एक संसार म्हणावं तसंच.. मला नेहमीच या दप्तरांच कौतुक वाटायचं.. सगळ्या वह्या पुस्तक आणि पेन्सिल-पेनचा डब्बा व्यवस्थित एका कापडाच्या किंवा प्लास्टिक च्या पिशवीत ठेवलेला. ते दोन भागात विभागलेलं, एका भागात वह्या आणि दुस-या भागात पुस्तकं, मधल्या फटीत पेन्सिल चा बारका डबा आणि वह्या-पुस्तकांच्या फटीत काही कागद किंवा लहानसहान वस्तू... त्या पिशवीचं कापड काळपट झालेलं, कडा ताणलेल्या, त्याची शिवण स्पष्ट दिसायला लागलेली.. पिशवी प्लास्टीक ची असेल तर त्यावरचं रंग रूप नष्ट होऊन मूळ पांढरा किंवा काळा रंग दिसायला लागलेला.. हातात पकडण्याची पिशवीची जागा ताणून तुटण्याची वेळ येण्याआधीच ती त्याची ठेवण बदलून पर्स सारखं ऐटीत पकडायची.. रंग व प्लास्टीक किती काळ टीकून राहणार ह्याच्या तपासणीतून आणि निरीक्षणातून जी expiry date ठरलेली आहे त्यापेक्षा कितीतरी दिवस जास्त वापर करू शकते ती तिच्या ह्या दप्तराचा... आपलं दप्तर कितीही जुनं झालं तरीही ते बदलताना जुन्याची हाव सुटायची नाही, परत परत आठवायचं ते.. मग तिलाही ते हवंहवंस वाटत असणार का? की नवी जास्त चांगली पिशवी मिळाल्याच्या आनंदात जुनं पटकन विसरत असेल ती?
ती सगळंच जपून वापरायची त्यामुळेच दप्तरातील वस्तूदेखील जपलेल्या.. घरातील चुलीवरचा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌धूर वस्तूंनाही काळसर बनवत असला तरीही त्या काळपट पुस्तकांच्या आत स्वच्छ पानावर तिची सुरेख अक्षरं दिसायची.. सारखं सोलून अगदीच छोटी झालेली दोन्ही बाजूला टोक असलेली पेन्सिल आणि तेवढाच छोटासा रबर, खूप वापरला गेलेला पेन आणि पट्टी एवढ्यावर तिचं काम भागायचं.. त्यात कुणी जर वाढदिवसानिमित्त पेन्सिल आणि रबर भेट दिले तर तिच्यासाठी आकाश ठेंगणे होणार... तोच आनंद नव्या पुस्तकात, चित्रकलेच्या रंगात, शाळेतून मिळालेल्या नव्या कपड्यात, सगळ्यांत...
खूप थोड्या प्रमाणात मिळणाऱ्या सुखाचा खूप मोठ्ठा आनंद साजरा करणाऱ्या ती चं कौतुक तर वाटायचं पण त्याहीपेक्षा तिच्या डोळ्यांतील उत्सुकता आणि चेहर्यावरील हावभाव बघतांना छान वाटायचं.. खरंतर तीला मिळेल त्या गोष्टीत समाधान मानायची सवयच होती किंबहुना तिने ती सवय लावून घेतलेली होती..
आजही "ती" जिथे कुठे असेल तिथे समाधानीच आयुष्य जगत असेल...

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

शहर

गजबजलेल शहर.. मोट्ठ्या इमारती, तेवढेच मोट्ठे रस्ते, खूप झगमगाट, समृद्धी आणि गरिबीच्या मध्ये शर्यत लागावी आणि बरोबरीचे गुण मिळून दोघांचीही हार-जीत व्हावी अश्या परिस्थितीत असलेलं शहर... हे शहर झोपतच नाही, जणूकाही कारखानातल्या शिफ्ट सारखे दिवस आणि रात्र असे दोन संघ नेहमीच तैनात असतात या शहराला जागं ठेवायला. भल्या पहाटे उजाडलेला दिवस रात्री १ पर्यंत तसाच सुरु असतो, त्याला अंधार उजेडाची समीकरणं चिकटलेली नाहीत. दिवसाचा कुठलाही प्रहार का असेना, एकाच तालात, लयीत आणि घाईत चालत असतं हे शहर. थकलेलं किंवा मरगळलेल नाही तर टवटवीत आणि ताजतवानं. पायांना चाकं लावल्यासारखे इथले लोक सतत कुठे ना कुठे जातच असतात. कुठलंही स्टेशन बघावं तर माणसांची गर्दी आत बाहेर करतच असते. कुठून येतात आणि कुठे जातात ही लोकं इतक्या प्रचंड संख्येनी? हे शहर मात्र सगळ्यांना सामावून घेतं आपल्यात. ह्या गर्दीला वयाची काही मर्यादाच नाही. १० वर्ष वयाची मुलं आणि ७० वर्षाची आज्जी ही एकाच उत्साहाने, धडपडीने आणि जिद्दीने गर्दीत भाग घेतात.
शहरातील खूप वर्दळीचे रस्ते.. स्टेशन, ट्रेन ची गर्दी, लोकांची धावपळ, सर्वत्र फक्त आवाजच आवाज...
सारे रस्ते दिवसभर गर्दीला पळायला मदत करतात..
किती तरी माणसं, प्रत्येक जागी, काना-कोपऱ्यात माणसंच माणसं.. रस्ता केवळ माणसांनी आणि गाड्यांनी भरलेला..
ठराविक वेळेने स्टेशन मधून गर्दीचा लोंढा ह्या रस्त्यावर बाहेर येतो, आणि गर्दी आत जाते.. चक्र सतत सुरूच. मशीन सुरु असावी तसाच हा क्रम.
अश्या आवाजातच हळूहळू ही गर्दी कमी होते, गोंधळ संपतो, रस्ता रिकामा.. रात्र झालेली..
रात्री एखादी गाडी जातेही त्या वरून, पण हा रस्ता निपचित पडून असतो, अगदी ओळखही न पटावी तसा भासू लागतो. जणू त्याचा कायापालट झालाय. एखाद्या मुलीच्या रंग रूपात बदल व्हावा आणि ती निरस वाटू लागावी इतका बदल...
ह्या रिकाम्या रस्त्यावर असणारे वळणही चुकावे इतकी त्या गर्दीची आणि आवाजाची आपल्याला सवय झाली असते. रिकामा रस्ता अनोळखी वाटू लागतो.
आवाज आणि गर्दी ही काही वस्तूंना त्यांची ओळख बनवून देत असावी बहुदा...
त्याच्या मोकळ्या होण्याची काही लोक त्यावर विश्रांती घ्यावी म्हणून वाट बघत असतात.. त्यांच्या सोबत थकून झोपी गेलेल्या लहान बाळासारखा रस्ता झोपला असतो...
सकाळपर्यंत फार थोड्या तासाची विश्रांती घेऊन पुन्हा गर्दीला समोर जाण्यासाठी तो सज्ज होत असावा.
विश्रांती काही तासांसाठीच, कारण हे शहर उशिरा पर्यंत जागून भल्या पहाटेच पुन्हा जागी होतं.
आपली ओळख जागी ठेवायला.. आणि जगायलाही...
इथले रस्ते कुठे बदली मागत असणार का? निदान इथे खूप गर्दी सहन करून झाल्यावर बक्षिस म्हणून एखाद्या आडगावात जाऊन काही दिवसांसाठी निवांत दिवस घालवायला मिळालं त्यांना तर? त्या आडगावात निवांत लोळत पडून निसर्गाच्या कुशीत सुख अनुभवून स्वच्छ होऊन किती आनंदात ते कामावर रुजू होतील! अशी साधी कल्पना करूनही हुरूप येईल इथल्या रस्त्यांना...
सजिव आणि निर्जीव वस्तूंनाही आपल्या वेगानं एका लयीत चालायला शिकवणारं असं हे तरुण शहर स्वतःच्या मर्जीने जगणारं आणि जगवणारं..

रविवार, २५ जून, २०१७

आपल्या वाटा

चालता चालता कुणाचा तरी थकलेला आवाज कानी आला... 
"फारच दमायला झालंय का ग तुला? थोडा श्वास तर घे, एवढ्या घाईत चालायला काय झालंय?"
"नाही कळायचं तुला, कित्ती दिवसांतून घरी यायला मिळालंय मला, तुला ह्यातली ओढ कशी सांगू?"
"खरंच गं, मला बिचारीला काय कळणार, मी वर्षानुवर्षे इथेच आहे, मला ना कुठे जायचं ना कुठून परत यायचं, माझं हेच नेहमीचं ठिकाण.." 
"म्हणूनच म्हणतेय नाही काही कळणार तुला, आता मला जाऊ दे हां, माझ्या येण्याची वाट बघत असणार कुणी.. "
"होय खरंच, कळतंय मला.. पण तूझा वेग कमी करशील का जरासा? काय आहे ना मला पण बोलायचंय गं थोडंसं.. हल्ली कुणाला मोकळा वेळच नसतो ना माझ्याशी बोलायला.. कुणीतरी सोबत सारखंच असतं त्यांच्या, एकतर हाडामांसाची माणसं किंवा तुमच्या मोबाईल मधून सोबत असणारी माणसं..."
"होय चालेल, तू बोलतेस तर थोडं हळू चालते मी.."
"तुला आठवतंय का आपलं नातं तसं बरंच जुनं.. तुझ्या बदलणाऱ्या आणि मोठ्या होत जाणाऱ्या हालचालींचा चांगलाच अनुभव आहे मला.. 
खरंतर तू आणि तुझ्या सोबतची सगळी मित्र मंडळी, तुम्ही सगळे मोठे झालात आणि आपापल्या स्वप्नांचे पंख पसरून भरारी मारलीत.. खूप कौतुक वाटतं मला तुम्हा सगळ्यांचं.. कुठे ती अनवाणी पायांनी सर्वत्र धावणारी तुम्ही मंडळी आता सूट बूट घालून येता तेव्हा त्या बुटांच्या आवाजात तुमच्या हृदयाची धडधड हरपून जाते... दमायला झालेल्या आणि श्वास चढून धाप लागल्यावर मटकन मातीतच खाली बसलेल्या तुमच्या शरीराला आता धुळीचा कणही सहन होत नाही ना? तुमचंही बरंच आहे गं, ध्येय असतात एकेकांची, तुम्ही मिळवलीत, आनंदच आहे.. पण तुमचं ते दूडदूड करत धावणं, ओरडणं, किंचाळणं, ढोपरं फोडून घेणं, पोट धरून हसणं आणि भोकाड पसरून रडणं सगळं कसं जिवंत होत तुम्हाला बघताच... तुमच्या खरचटलेल्या, रक्त निघत असणाऱ्या जखमांना बघून मलाही त्रास व्हायचा पण माझा नाईलाज असायचा.. तुम्हाला जखमा झाल्या तरी त्यातून जपून चालायला शिकलात ना? आता नव्या शहरांत, नव्या जागेत आणि नव्या माणसांत तुम्हाला कधी आठवण येते का गं माझी?? "

ज्या वाटेवरून मी चालत होते ती वाट माझ्याशी बोलतीये.. माझ्या घराची वाट, ज्यावरून आतापर्यंत अगणित वेळा चालले.. माझ्या बदलणाऱ्या पाउलांचा आकार माझ्या चपलांपेक्षाही अचूकपणे माहिती असणारी माझ्या घराची वाट... घराइतकं आणि घरातल्या कुटुंबाइतकंच ती ही वाट बघत असेल का जुन्या माणसांची... तिलाही आठवण येत असेल त्या खेळणाऱ्या, बागडणाऱ्या, हसणाऱ्या, रडणाऱ्या चेहेऱ्यांची.. तीच वाट मला तिचा अनुभव सांगते.. थोडं अनपेक्षित होतंच पण त्याही पेक्षा मन हळवं झालं.. तो आवाज आणि त्यातली आपुलकी जाणवून आपसूकच ते ऐकायला लागले.. खरंतर मोबाईल वरून सोबत असणारी दोस्त मंडळी होतीच माझ्या जवळही पण कुणास ठाऊक, त्या वाटेवरून आताही एकांतात जायलाच आवडतं. पाठीवर बॅगचं ओझं आणि नजर खाली वाटेवर असा थोड्या दूरचा प्रवास तिच्यावरचा. दुपारी कमी वर्दळीची आणि झाडाच्या सावलीत निपचित पडलेली.. ती सुद्धा आता आधुनिक झालीये, तिच्यावर डांबर पडून ती चकचकीत झालीये थोडी, पण कितीही बदल झाला तरी मनाची हळवी बाजू बदलत नाही तसंच वाटेचही झालंय. तिच्यावर पडलेल्या काळ्याकुट्ट डांबराखाली ती जुनी माती, मुरुमांचे खडक ओलेच असणार... कारण तिचेही बदलणारे रंग रूप आम्ही थोडे अधिक बघितलेच आहेत.. 

बुधवार, २१ जून, २०१७

लाटा

लाटा...

बेधुंद उसळणाऱ्या लाटांच्या आवाजानं मनात लय पकडली की तल्लीन होऊन त्या फेसाळणाऱ्या प्रवाहाला बघत राहावं... भान विसरून फक्त त्या गतीला आणि आवेगाला अनुभवावं... लाटांचा वेग भिनायला लागला ना की मग मन हलकं हलकं होऊन जातं. त्यांचा वेग वारा ठरवतो, समुद्राच्या पृष्ठभागावरुन तो जणू पाण्याचा एक एक पापुद्रा काढत लाट निर्माण करतो. समुद्राच्या आतल्या वादळाच्या पटीने लाटांची तीव्रता तशी कमीच पण ती अनोखी आहे. प्रत्येक वेळी ती नवीन असते... नव्याने येते आणि किनाऱ्याला भिडून परत फिरून जाते. ती जेव्हा किनाऱ्याला भिडते तेव्हा त्या प्रचंड आवाजाने, पाण्याच्या उडणाऱ्या तुषारने आणि सोबत तितक्याच वेगाने येणाऱ्या वाऱ्याने आपल्याला हलवून जाते, मनातून जागं करून जाते. तासंतास त्या एकापाठोपाठ येणाऱ्या लाटांना बघूनही मन भरतच नाही...  

लाटांसारखं होता आलं पाहिजे खरंतर... समुद्रातील अनावश्यक वस्तू तिच्या कुवतीनुसार किनाऱ्याला सुपूर्द करून ती परत फिरते, स्वच्छ होऊन जाते... परत नव्या लाटेसाठी सज्ज होते... असंख्य लाटा आणि तेवढेच त्यांचे समुद्र किनारी कोसळणे, परत जाणे आणि परत येणे.. हाच क्रम सतत सुरु असतो.. माणसांचं तरी वेगळं काय आहे? ती पण मनातल्या भावना सतत व्यक्त करत असतात.. प्रेम, राग, सुख-दुःख, करुणा, आणि बऱ्याच भावना घेऊन सतत पुढच्या माणसावर लाटांसारखंच कोसळतात आणि मग हलक्या मनाने परत आपल्या आयुष्यात चालत राहतात... पुन्हा काही घटनांचा वारा येतो, भावना तयार होतात परत कोसळतात आणि परत शांत... खरंतर असंच असायला हवं पण काही माणसं व्यक्त होतंच नाहीत, दाबून ठेवतात आतल्या आत आणि मग एकदाचं असह्य झालं की वादळाच्या रूपात कोसळतात.. सगळं उध्वस्त करतात... 

लाटांची मोजणी करत बसू नये, एका तासात किती एका दिवसात किती. मोजमापाच्या पलीकडे जाऊन ते सगळं अनुभवायला हवं. कदाचित ती आपल्या मनातला ताण ही किनाऱ्यावर सोडून जायला सांगत असते अगदी तिच्याच प्रमाणे...

मंगळवार, ६ जून, २०१७

ती...

ती... 

प्रत्येक घोळक्यात असणारी आणि कधीच कुणाच्या नजरेस न पडणारी अशी ती... 

तिच्या प्रत्येक हालचाली मध्ये एक कमालीचा शहाणपणा असतो, पण जपून चालणारी तिची हालचाल तिचा थोडा स्वतःबद्दल असणारा न्यूनगंड दाखवत असतो. चेहेऱ्यावर शांत भाव पण भिरभिरणारी नजर. सगळं काही सभोवतालचं जग आणि त्यातले पात्र ती नजरेने टिपून घेत असते. 

ती कुठेही दिसणारी, रंग रूप बांधा वेगवेगळा असला तरी प्रत्येक "ती"च्या मध्ये एक साधेपणा असतो. तिला प्रत्यक्षात काहीतरी निराळं हवं असलं तरीही चेहेऱ्यावर ते कधीच दिसणार नाही. तिच्या प्रत्येक शोधक नजरेत ती बहुदा स्वतःलाच शोधात असते... 

ती प्रवासात खिडकीच्या बाहेर शांतपणे बघत असते, वाऱ्यावर उडून विखुरल्या केसांना तसंच उडू देते, कधी कुणी बोलत असेलच बाजूला तर समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरून सारं काही वाचण्याचा प्रयत्न करते, एकंदरीत ती मनाशीच गप्पा मारत असते (कारण स्वतःहून इतरांशी बोलण्याचं धाडस करायला ती हिम्मत जमवत नाही). कुणी लाजत लाजत मोबाईल वर बोलत असल्यास तिला भान हरपून बघत असते आणि परत कोऱ्या नजरेने बाहेर बघायला लागते. (तिलाही ते सगळं अनुभवायची इच्छा होत असेल का? अश्या हरवलेल्या क्षणांचा तर ती आढावा घेत नसेल ना?) स्टेशन आल्यावर आपली ओढणी नीट करत सावकाशपणे उतरून सभोवताल नजर टाकून ती नजर दुसऱ्याच क्षणाला खाली घेऊन शांत चेहेऱ्याने निघून जाते.

काहीतरी जगावेगळं करून दाखवलं तरच प्रकाशझोतात येणाऱ्यां पैकी एक तीही... महत्वाकांक्षा भरपूर असूनही काहीवेळा आपल्याला मार्ग सापडत नाही आणि तेच बहुदा तिच्या सोबतही होतं. काहीतरी आवश्यक आणि हव्या हव्याश्या गोष्टी स्वतःजवळही असाव्यात असं तिला सारखं वाटत असतं.

तिच्यातली मुलगी म्हणून असणारी सगळी बाजू जमेचीच असेल असेही नाही. ती आखीव रेखीव, बोलके डॊळे, काळेभोर केस आणि गव्हाळ कांती. तिला तिच्या सौंदर्याची जाणीव कुणी करून देणारं नसत एवढंच.  

कुठेही अशी ती नजरेस आली की तिच्याही मनसोक्त बोला, ती ही तिच्या परीने खुलून बोलायला लागेल आणि त्या हास्याची आणि तिच्या चेहेऱ्यावरच्या आनंदाची तुम्हाला तुलनाही नाही करता येणार. 

जर तिच्याशी बोलायचं तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार कारण तिच्या कोशात बंद असलेली ती स्वतःहून बाहेर निघतंच नसते. 

गुरुवार, १ जून, २०१७

पार्टनर

पार्टनर 
व पु काळे लिखित अप्रतिम पुस्तक... 
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक पार्टनर हवाच असतो. आणि हा पार्टनर म्हणजे जोडीदार नाही, आयुष्याचा जोडीदार वेगळा आणि हा असा पार्टनर वेगळा. तो प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतो, मनावरचा ताण कमी करतो आणि त्याहीपेक्षा तो परिस्थितीशी लढायला शिकवतो. 
सुरवातीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा आलेला अंदाज पुढे बदलत जातो. त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू हळूहळू दिसायला आणि कळायला लागतात. पुस्तकात श्री च्या आयुष्यावर भाष्य केलेलं असलं तरीही पार्टनर हेही त्याचं मुख्य पात्र होऊन जातं. 

स्वतःचं नाव न सांगता फक्त पार्टनर नावाने ओळख बनवणारा (आपल्याला खरंतर नावाच नसतं, बारशाला ठेवतात ते नाव देहाचं), वडिलांच्या एका नजरेतल्या कटाक्षाने लहानपणीच घर सोडून निघून जाणारा पार्टनर, बेफिकीर आणि मर्जीने जगणारा पार्टनर, कुठल्याही बंधनात अडकून पडायचं नाही म्हणून लग्न न करणारा पण त्यातल्या प्रत्येक अडचणींवर उत्तर तयार असणारा पार्टनर, सगळ्या परिस्थितीचा उलगडा झालेला आणि सारं काही मनसोक्त जगलेला पार्टनर.... तो बोलतो "पश्चात्तापाच्या एकाही क्षणाने माझा वर्तमानकाळ खाल्लेला नाही, भूतकाळ अडवलेला नाही." तो कुठल्याही गोष्टीची  लळा लागू देत नाही, त्या आधीच त्यापासून बाजूला होतो, असा विक्षिप्त पार्टनर. 

श्री ला तो आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर भेटला, जमेल तेवढी मदत केली, मार्गदर्शन केलं, काही खुलासे केले आणि मानसिक बळ दिलं. त्याचं प्रेम, लग्न, संसार आणि घरच्या लोकांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायलाही शिकवलं. M आणि W मधला फरक आणि श्री च्या मनाची होत असलेली अवस्था त्याचे वर्णन वपुनीं खूप चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत.  ते लिहितात "आयुष्यात सगळी माणसं अशीच येतात आणि जातात. पार्टनर सारखी. जितकी जवळ, तितकीच दूर. जेवढी समजतात त्याच्यापेक्षा कितीतरी पट अनाकलनीय राहतात." 

असा पार्टनर सगळ्यांना मिळेलच असं नाही, पण ज्यांना मिळाला ते खरंच भाग्यवान. आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी अश्या असतात ज्या बोलून दाखवायला असा कुणी लागतो जो पूर्णतः परिस्थिती जाणून मग त्यावर निःपक्षपाती मत देईल, जे मिळू शकतं ह्याच पार्टनर कडून... 
शेवटी व पु म्हणतात "दुःख, आनंद, जय- पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढंच काय ते नवीन. पुनःपुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण. This is life! Our last garment is without pockets."

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

नवरा

तू...
नवरा झालास माझा...
आयुष्य एकाचं वाटेनं आणि सोबतीनं घालवायचं असा नियम येतोच लग्नानंतर. ते​ अपेक्षितच असत​..
पण तुला आणि मलाही कदाचित हा पतिव्रता किंवा पत्नीव्रता धर्म आवडत नसावा कारण आपल्याला सगळं सोबत सोबत व्हावं असा अट्टाहास कधीच नसतो..
तुझा तू स्वत्रंत आणि माझी मी
तुला तुझ्या पद्धतीने जगायला आवडतं आणि मला माझ्या
हे करत असताना कधीही एकमेकांना विरोध केलेला अजूनही आठवत नाही..
दोन दिशांनी जाणारे दोघांचेही आयुष्य कसे काय अचानक एक वाट पकडतील?
त्या वाटा जुळायला थोडा वेळ तरी लागतोच, कुणीतरी यू टर्न घेईल, कुणी थोडा पुढे येईल, कुणाला मागे जावं लागेल असं करत करत एकदाच्या वाटा जुळतीलही
पण दोघांना तेच हवं होतं का हा प्रश्न राहिलंच.
आपण खूप बोललो एकमेकांशी, सगळं अगदी सगळं सांगून टाकलं एकमेकांना...
थोडं काही बाकी असेलही जाणून घ्यायला पण ते तेवढं महत्वाचं वाटत नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात बराच काही घडून गेलंय... आपण कोलमडून पडलोय, उद्धवस्त झालोय, काही चांगलं होईल अशी अपेक्षा ही गमावून बसलोय आणि त्यानंतर हिंमतीने उभं राहून बेफिकिरीने जगायला ही शिकलोय. हाच बेफिकीर जगण्याचा फंडा दोघांनाही आवडला असावा कदाचित.
सोबतची इच्छा असूनही अपेक्षा​ सोडून देताना आणि जेव्हा कुणी आयुष्यात येऊन आपल्यावर ताबा ठेवेल अश्या विचारानेच भीती वाटायची तेव्हाच अगदी तू आलास आणि सगळ्या शंका मिटवून टाकल्यास. आता आपल्या नात्यात तू आहे, मी आहे आणि आपण दोघेही आहोत. स्वतंत्र आणि तरीही एकमेकांना पूरक...
कारण आत्ता या क्षणाला तू माझ्या बरोबर आहेस, नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून
तुझ्या सोबत सुरक्षित वाटतं, मी तुझ्याहून  वयाने लहान आहे म्हणूनही असेल कदाचित, पण तुझ्या सोबत असताना असं वाटतं की सगळं जग सुंदर आहे...
पण नवरा म्हणायला आत्ताही जीभ उचलत नाही, तुलाही कदाचित माझी बायकोपेक्षा नावानेच ओळख करून द्यायला आवडते
अवघडलेपण आहे पण ते या नात्याच्या नावात, आपल्या दोघांमध्ये नाही...
आपल्याला स्वच्छंदी जगायला आवडतं, फिरायला आवडतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवायलाही आवडतं
हो आवडतंच कारण विश्वास ठेवायलाही मनातून इच्छा असायला हवी...
तुझ्या बरोबर आता नवीन आयुष्य उलगडत जाणार आणि तुझी माझी सोबत राहणारच एकमेकांना, तरीही जर कुठे कमी पडले तर हक्कानी उभा राहा माझ्या बरोबर कारण मला गरज पडेलच.
तू आहेस तसाच रहा नेहमी साठी... कारण स्वत्रंत असूनही तुझ्यासोबतच राहायला मला नक्कीच आवडेल...


मंगळवार, २१ मार्च, २०१७

ऋतू उन्हाळा

उन्हाळ्याचा चांगलाच जम बसलाय, सर्वत्र गरमीच्या झळा, घामाचे लोट शरारीवरून ओघळायला लागलेत, पंख्याची हवा कमी पडायला लागलीय, घराघरांत थंड्या वाऱ्याची आणि पाण्याची सोय, कैरीचं पन्हं - कलिंगड - सरबत - आंब्याचा रस इत्यादी सगळं अगदी गरमी ला तोंड द्यायला सज्ज ठेवलंय आपण... 

उन्हाळ्याची चाहूल लागते ती फेब्रुवरी महिन्यात, मात्र मार्च पासून खऱ्या उन्हाळ्याला सुरवात होते. झाडांची पानगळ, सर्वत्र पसरलेली उष्णता आणि गरम वारे, मोठा होत जाणारा दिवस, साधं गवतही उगवायला घाबरेल इतकी रुक्ष झालेली आणि पाण्यासाठी आसुसलेली जमीन, जमिनीवर पाण्याचा  थेंब पडला तरीही क्षणात वाफ होईल इतकी तापलेली जमीन, कसलेही आवाज नसलेली शांत दुपार, सगळीकडे बघायला मिळणारे कापडाच्या तुकड्याने उन्हापासून बचावासाठी प्रयत्न करणारे झाकलेले चेहेरे, घामाचा दुर्गंध, थंड पेयांची रेलचेल, पाण्याची बोंबाबोंब, प्राण्यांना आणि पक्ष्यांना होणार त्रास आणि त्यावर उपाय करायला तय्यार असलेले आपण... 

आताशा उन्हाळ्याचा वैताग येतो पण लहानपणी हाच उन्हाळा हवाहवासा वाटायचा... त्याला सगळ्यात महत्वाचा कारण म्हणजे सुट्ट्या... अभ्यासाला सुट्टी, उन्हात फिरायचं, मनसोक्त खेळायचं, पापड, लोणचे, कैऱ्या, चिंचा असलं काही ना काही सतत खात असायचं, मनसोक्त झोप घ्यायची, पाहुण्यांसोबत मज्जा करायची, गच्चीत किंवा अंगणात रात्रीचं पडलेलं स्वच्छ चांदणं बघत झोपायचं, छंद वर्ग, गावाला जायचं आणखीही बरंच काही...बाहेरगावी जाण्याचा अनुभव आगळावेगळाच... दुपारचा मोकळा रस्ता, रस्त्यावर पडलेल्या उन्हाने डांबरी रस्ता ओला असल्यासारखा भासतो, त्या मृगजळाचा पाठलाग करता करता अंतराचं भान विसरावं असा रस्ता... मध्येच एखादी S.T. बस धूळ उडवून जाते, एखाद्या खेडेगावच्या चौरस्त्यावर एक दोन गावकरी फळं, चिंचा आंबे बोरं असा काही विकायला घेऊन बसलेली असतात, नीरा चे विक्रेते बऱ्याच ठिकाणी आपल्या पाट्या लावून बसतात, ओसाड पडलेली शेती, झाडाच्या आडोशाला बसून दिसणारे काही लोकं, आंब्याला आलेला बहर हे सगळं बघत होणारा प्रवास... 

उन्हाळ्यातील आणखी एक आकर्षण म्हणजे पळसाची फुलं... मार्च महिन्याच्या सुरवातीला फुलणाऱ्या पळसाच्या झाडांची पाने गळून गेली तरी तो लाल केशरी रंग सारं झाड दूरदृष्टीला आणतो. रखरखत्या उन्हात रस्त्याच्या कडेला फुललेली ती सुंदर फुलं विलक्षण आनंद देऊन जातात... खास होळीच्या सणात त्याचा रंग बनवून खेळायची मजाही काही निराळीच. ती फुलं गोळा करून पाण्यात ठेवून त्याचा रंग येत पर्यंत वाट बघायची आणि तो होळीला खेळायचा, तो रंग पक्का असतो आणि सुगंधित सुद्धा.. अगदी त्याच्या आठवणींसारखा... इतक्या उन्हातही ताजं टवटवीत राहून आपला भडक रंग मिरवणं त्यालाच जमतं. माळरानावर आग लागल्यासारखी त्याच्या रंगांची किमया... ह्या पळसाच्या फुलांचीच खरंतर रुक्ष आणि उष्ण वातावरणातही आनंद मिळतो... 

हल्ली सगळं बदललंय... आता उन्हाच्या झळा सोसाव्याच लागतात... बाहेर पडावच लागत आणि घाम गाळावाच लागतो... कारण या हक्काच्या सुट्या आपल्याला मिळतील एवढे आपण आता लहान आणि नशीबवान राहिलेलो नाहीत... 

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

प्रवास

प्रवास... प्रवास म्हणजे अनुभवांनी आणि आठवणींनी गच्च भरलेलं एक गाठोडं असतं... तो आधी आखला जातो, त्यावर योजना बनते आणि नंतर तो घडून येतो. कधी कधी तर तो अनपेक्षितपणेही घडतो... बर्याचदा आपल्या कल्पनेनेच आपण त्या जागी जाऊन आलेलो असतो पण प्रत्यक्षात जेव्हा तो घडून येतो तेव्हा कितीतरी वेगळा आणि अनोखा भासतो... खरंतर परतीच्या वाटेवरच आपण त्याला पुन्हा पुन्हा आठवायला लागलेलो असतो.. भरलेली बॅग, त्यातील मळलेले कपडे, चिखलात भरलेली पॅन्ट, कुठेतरी काट्यांमध्ये फाटलेली एखादी ओढणी, उन्हाने काळवंडलेले चेहेरे सगळं काही प्रवासाची आठवण करून देतं...
घरी परतल्यावरही जेव्हा ट्रेन मध्येच बसल्याचा भास होतो तेव्हा, काल परवा ह्या वेळेवर आपण अमुक एका जागी होतो असं आपोआप बोलायला लागतो तेव्हा, धुतल्यानंतरही पॅन्टच्या खिशात हात घालताच कोपऱ्यांमध्ये लपून बसलेली समुद्राची वाळू नखांमध्ये जाते तेव्हा, खरेदी केलेलं काही-बाही सामान कुणाला दाखवतो तेव्हा, वेगवेगळ्या जागी मनसोक्त काढलेले फोटो बघताना तो प्रवास पुनःपुन्हा जिवंत होत जातो...
कितीही प्रवास वर्णने झाली तरीही आतून अनुभवलेलं जे असतं ना ते क्वचितच सांगायला जमतं.. प्रवास एकदातरी अनुभवायलाच  हवा कारण काही अनुभव प्रयत्न करुनही शब्दात नाहीच बसत.. खूप काही सांगायचं राहून जातं.. वेगाने येणाऱ्या समुद्राच्या लाटा जेव्हा पायांना भेदून पुढे जातात आणि निमूटपणे समुद्राकडे परततात तेव्हा, पर्वतांच्या मोठमोठ्या पृष्ठांवर कोसळून परत फिरून आपल्याला ऐकू येणारा आपलाच आवाज आपण परत परत ऐकतो तेव्हा, मंदिरातल्या शांततेत उगाच सगळ्यांसाठी चांगला विचार करून प्रार्थना करतो तेव्हा, जोराने येणारं वारं अंगावर कोसळू देत ते श्वासात भिनत जातं तेव्हा, समोर काहीही न दिसणाऱ्या धुक्यात बाहेर पडून गरम चहाचा आस्वाद घेतो तेव्हा, कितीही उबदार कपडे घातले तरी त्यालाही भेदून जाणाऱ्या थंडीत बर्फ खेळल्या जातो तेव्हा, भर पावसात गच्च भिजत डोंगर चढतो तेव्हा जे काही वाटत असतं ते फक्त अनुभवावंच लागतं कारण त्याच भाषांतर प्रत्येकानुसार वेगळं आणि अनोखं असतं...
एकदा प्रवास झाला की तो नसानसांत भिनतो, एक एका जागेच सौंदर्य लगेच मनाच्या कोपऱ्यांत जाऊन दडून बसतं... जणूकाही त्याला आता तेथून निघणे नाहीच. कितीही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन आलो तरी प्रत्येक जागेचं नाव काढताच तिथल्या निसर्गाचा आपल्या नजरेसमोर देखावा उभा राहतो, न विसरता सगळं काही अनुभवासकट बोलून दाखवू इतक स्पष्ट आठवतं.. कारण प्रवास कधी विसरताच येत नाही. ती एक अनुभवलेली नशा असते... म्हणूनच प्रवास वेड लावतं पुन्हा पुन्हा तीच नशा अनुभवायला, परत निसर्गाच्या जवळ जायला आणि परत डोंगर, दऱ्या, रेती, पाणी, ऊन, पाऊस, बर्फ या सगळ्यांशी खेळायला, निसर्गाशी एकरूप व्हायला...

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...