सुगंध…
काही सुगंध कळत नकळत आठवणींचे कप्पे उघडत जातात… आपल्याला क्षणात कुठल्या काळात घेऊन जातात!!
तर्हेतर्हेचे सुंगध आपण रोज घेतो आणि विसरूनही जातो, पण कधी अचानक असे काही खूप पूर्वी कधी भेटलेले आणि विस्मृतीत गेलेले ओळखीचे सुगंध नाकाशी येताच सरळ हृदयात जपलेल्या आणि हरवलेल्या त्या आठवणींना जागं करतात...
लहानपणी २-३ रुपयाला येणारा सुगंधी शाई चा पेन तेव्हा खूप वापरला, आज तोच पेन परत सापडला. तोच ओळखीचा सुगंध, लिहायला घेताच नाकात जाणारा, आजूबाजूला दरवळणारा…
लिहिता लिहिता मन त्या काळात जाऊन पोहोचलं. हातात असलेला पेन तोच पण हात चिमुकले, लहानशी वही, समोर फळा, बाई शिकवताहेत आणि मी शेजारी बसलेल्या मैत्रिणीला पेन दाखवण्यात गर्क, तीसुद्धा लिहून बघते आणि त्या सुगंधाने तिच्या चेहऱ्यावर दरवळणारा आनंद आताही दिसतोय. किती छोटीशी वस्तू पण आभाळाएवढा आनंद देऊन जाते...
वाचनाचा अर्थ लावायचा तर ओळींच्या मधील रिकाम्या जागा वाचाव्यात असं म्हणतात... अक्षरं आणि रेषांच्या मदतीने मनातलं काही लेखणीत उतरवण्याचा हा फक्त एक छोटासा प्रयत्न...
सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५
सुगंध
सोमवार, ६ जुलै, २०१५
देव
आपल्याला आतून बाहेरून पूर्णतः ओळखणारी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः, त्याव्यतिरिक्त कुणीच जसेच्या तसे १००% ओळखूच शकत नाही, सगळ्यांना तुकड्या तुकड्याने अनुभव आलेला असतो आपला, मित्रांसमोर आपण वेगळे, पालकांसमोर वेगळे, शिक्षक, नातेवाईक, शेजारी, ऑफिस मधली मंडळी या सगळ्यांनाही आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भागच ओळखीचा असतो, काहींनी माणूस म्हणून आपले विविध पैलू ही अनुभवलेले असतात पण आपले विचार, स्वभाव, पूर्ण च्या पूर्ण एक व्यक्ती, वस्तू किंवा प्रमेय म्हणू हवं तर आणि तो प्रमेय कसा उलगडत जाणार, त्याच्या स्टेप्स आणि त्यासाठी लागणारी सूञे, ती कशी आणि कुठे मांडायची हेसुद्धा आपल्यालाच ठाऊक असतं...
पण जेव्हा जेव्हा मी देवासमोर हात जोडते मला असं वाटतं की मला सोडून मला पूर्णतः ओळखणारा तो हाच. मी त्याला बरंच काही मागण्याचा प्रयत्नही करते पण अर्ध्यातच सोडून बोलते की "तुला तर कळलेलंच आहे मला काय बोलायचं आहे ते", आणि जे बोलायचं ते अर्ध्यावरच सोडून फक्त हात जोडले जातात, आणि मनातल्या मनात देवासोबत गप्पा मारणं सुरु होतं, बोलते मीच आणि तो फक्त ऐकतो. हे सगळं सहज घडतं कारण विश्वास असतो की तो सगळंच समजतो आणि योग्य वेळी अचूकपणे तो सगळं काही व्यवस्थित, सुरळीत करेल... पण म्हणून काही मी भक्त ही नाहीये, रोज सकाळी देवाला हात जोडणे किंवा मनातल्या मनात त्याचे नाव घेणे एवढंच माझ्याकडून होतं बाकी नियमित मंदिरात जाणे उपवास करणे, जप करणे हे कधीच माझ्या कडून घडलेलं नाही, त्याची शक्यताही नाही...
कधी पाऊले फिरलीच तर देवळात जातेही, ते श्रद्धेपोटी आणि त्याहीपेक्षा तिथली शांतता हवीहवीशी वाटते म्हणून... त्यावेळी जे जे मनात येईल ते देवाला बोलते, रागही काढते कधी, त्याला बोलते की "का असं करतो तुला कळत नाहीए का गरज आहे सगळं सरळ सोप्प होण्याची", तो फक्त ऐकतो, कधी कधी आपल्याला आपलं बोलणं पूर्णतः ऐकून घेणाऱ्याची ही गरज असते ती ही भरून निघते... तो माझ्या मनात आहे, आनंदाच्या क्षणी, दुःखाच्या क्षणी एकांतात तो नेहमी असतो मनात. तो एक शक्ती आहे, त्याला रूपं अनेक, सगळ्या ठिकाणी एकच अनुभव येतो, मंदिर, चर्च, मस्जिद, गुरुद्वारा, मठ वास्तू कुठलीही असो तो एकच आहे आणि या वास्तूंच्या पुढून जरी जात असलो तरी त्याचं अस्तित्व समान जाणवतं…
इतका आपल्याला आतून बाहेरून ओळखणारा कदाचित तो एकटाच, कुणाच्या मते तो नसेलही, देव दानव ही संकल्पनाच कुणा कुणाला पटत नसेल, त्यांचे अनुमान त्यांच्यापाशी पण एक शक्ती नक्कीच आहे जी मनात उमेद जागी ठेवते नेहमी...
शेवटला सर्वकाही चांगलंच होईल ही उमेद देणारा, प्रत्येक क्षणाला सोबत करणारा, भल्याबुऱ्या प्रसंगात वाट दाखवणारा हा देव किंवा एक दैवी शक्ती...
व्यक्तीरत्ने
क्वचितच आयुष्यात काही व्यक्ती येतात जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. तुमचा जीवनाविषयक दृष्टीकोन, तुमचे विचार, तुमचे वागणे, बोलणे, जगण्याच्या तऱ्हा सगळं काही बदलून जातं, एक वेगळीच नशा असते त्या जगण्यात... पण अशी वेळ येते की ती तुम्हाला सोडून जातात, कायमचं नाही पण नेहमीचा सहवास नसतो त्यात, पुन्हा कधी भेटणार याचा अंदाज नसतो, अपेक्षाही नसते कारण जगण्याने वळण घेतलं असतं पुढे जाण्यासाठी, प्रवास तिथपर्यंतच होता हे आपल्यालाही कळलेलं असतं... आठवण येते काही दिवस, ती प्रत्येक गोष्ट, जागा, काम ज्यात त्यांचा सहवास असतो ती त्यांची आठवण करून देते. कुठूनतरी आपणही निघालेलोच असतो, आपल्या लोकांना सोडून आलेलो असतो तर आता निरोप द्यायची वेळ आपली असते. निरोपाचे क्षणच मुळात दुखःद पण आयुष्य कुणाच्या जाण्याने थांबत नाहीच, ते पुढे पुढे जाताच राहणार. आपण विसरण्याचा प्रयत्न करतो आणि जाणारी वेळही आपल्याला ह्या दुखासोबत जगायला शिकवते...
ह्या सगळ्याचा एक फायदाही आहेच, आपण माणसं जोडत जातो…आणि माणसं जोडणं फार महत्वाचं कारण पैसा कधीच समाधान आणि निखळ आनंद देऊ शकत नाही. ही प्रत्येक वळणावर जुळत जाणारी माणसं भरपूर आनंद देऊन, अनुभव आणि बरंच काही शिकवून जातात...
अनपेक्षीतपणे कुठल्या ना कुठल्या वळणावर भेट होते, कधी बोलणं होतं आणि तेव्हा ही नव्याने होणारी जुनी भेट एक वेगळाच आनंद देऊन जाते...
शनिवार, ३० मे, २०१५
एकटेपणा..
हा एकटेपणा अंत बघतोय माझा. माणसाने किती एकटे असावे यालाही मर्यादा असायला हव्या, एका ठराविक कालावधी नंतर आपसूकच त्याच्या भोवती माणसांच वलय निर्माण व्हायला हवं जेणेकरून त्याला जग थोडं माणसाळलेलं वाटेल...
कसं असतं बघा ना, आपल्या सभोवती सतत माणसांचा गोंधळ असतोच, कारण गर्दी आणि माणसं नसणाऱ्या जागा आता फारश्या शिल्लक नाहीत.. पण माणसं आणि मित्र किंवा ओळखीचे चेहेरे यात फरक आहे ना?
गर्दीमुळे किंवा सभोवतालच्या माणसांमुळे एकटेपणा कमी झाला असता तर या जगात कुणीच एकटेपणाचा बळी ठरला नसता, पण हे ही शक्य नाहीच. एका ठराविक वयानंतर आपण क्वचितच झपाट्याने मैत्री करतो, कारण वयानुसार आवडी निवडी आणि सहवासाची परिभाषा बदलत जाते, आपण जागरूक व्हायला लागतो आणि आपले विचार ज्यांच्याशी पटतात त्याच व्यक्तींना आपण आपल्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतो, अन्यथा हा एकटेपणा जास्त आपुलकीचा आणि सुरक्षित वाटतो...
बरं एकटे असूनही आपण स्वतःशी बोलत असतोच तर एक मित्र तर मिळालेला असतो पण त्या मित्रालाही एकाच मित्राचा कंटाळा आलेला असतो आणि दुसऱ्या व्यक्तीशी ओळख करण्याची इच्छा जास्त तीव्र होत जाते. रोजचं तेच सकाळी उठणं, तयार होणं ( ते ही नाईलाजाने, कारण आपल्याला बघायला कुणी खास व्यक्ती वाट बघणारा नसतो ), ऑफिस, काम, जेवण, सुट्टी, सगळं सुरळीत चालू, पण काही विशेष नसणार त्यात काही, ऑफिस ची तीच रोजची लोकं, त्याच त्या गप्पा आणि तेच परत दुसऱ्या दिवशीही, तेवढा वेळ निघून जाणार आणि कळणारही नाही कसा गेला पण खरी गम्मत तर नंतर सुरु होते, घरी गेल्यानंतरचा एकटेपणा, सुट्टीच्या दिवशीचा एकटेपणा, सगळीकडे पसरलेला फक्त एकटेपणा...
--
सोमवार, ६ एप्रिल, २०१५
शाळा
शाळा - एक अप्रतिम सिनेमा… कितींदा बघितला तरी प्रत्येक वेळा नवीन काही कारणासाठी लक्षात राहणारा…
हर एक पात्र विशिष्ट तर्हेने रंगवलंय आणि तसंच व्यक्त झालंय, मुकुंदा आणि त्याचे सुजाण वडील, सतत काळजी करणारी आई आणि ताई, चार मित्रांचा ग्रुप, त्याची "लाईन", नरु मामा, शिक्षक, वर्ग आणि विध्यार्थी, आणीबाणी आणि त्यातल्या हालचाली… तो काळ खूप सुंदर रित्या पडद्यावर मांडलाय…
काळ कुठलाही असो पण शाळेतले ते अनुभव आपण सगळ्यांनी थोडे अधिक जगलेच आहेत…
शाळा, त्यातली रोज होणारी प्रार्थना, त्यात मागे उभं राहून केलेली मस्ती, टवाळक्या, विनोद, आवडत्या शिक्षकांची घेतली जाणारी बाजू, काहींची टिंगल, प्रत्येक शिक्षकाला ठेवलेलं टोपण नाव आणि त्या नावाने आवाज देऊन पोटधरून हसणे, सिनेमाच्या गाण्यांच्या भेंड्या, सामूहीक खेळ, आपल्या ग्रुप वर असलेलं निस्सीम प्रेम…कुणाचही नाव न घेता सगळ्यांना आढनावाने हाक मारणे… हे सगळं आताही जसच्या तसं आठवतं…
मुकुंदा हा खरं तर सगळ्या विध्यार्थी वर्गाचं एक प्रातिनिधिक रुप असंच म्हणता येईल. शाळेतली सगळ्यात मस्तीखोर मुलं ही त्याची जिवाभावाची मित्र मंडळी, ते चौघेही वेगवेगळ्या स्तरातले, कुणी हुशार कुणी ढ, पण त्याचा त्यांच्या मैत्रीत कधीही ह्याचा प्रभाव नाही पडला, मन आणि वागणूक एकदम स्वछ आणि समान सगळ्यांसाठी…
आणखीही एक गोड विषय "प्रेम"
त्या लहान आणि अजाणत्या वयात असणारं ते प्रेम की आकर्षण हा मुद्दा वेगळा, ते ज्याचं त्याला ठाऊक पण त्या वयातला असणारा खूप रहस्यमय आणि गूढ तेवढाच गोड आणि प्रिय विषय… सगळ्यांना माहिती असायचं की कुणाची "लाईन" कोण, कोण कुणाला चोरून बघतं, पण त्या मुलाला किंवा मुलीला वाटायचं की आपलं हे गुपित फक्त आपल्यालाच माहितीये…
मुकुंदाला ती आवडायची खूप… पण त्याने तिला चार चौघांत कधीही हाक मारली नाही कींवा चिडवण्याचा प्रयत्न नाही केला, तो फक्त त्याच्या "लाईन" कडे चोरून बघणारा, बाईंनी तिला रागावलं तर त्याचा बदला म्हणून "अनुशासन पर्व" फळ्यावर लिहून मार खाऊन घेणारा, सिनेमाच्या भेंड्यात हार पत्करून घेणारा, गरज नसतांना आणि मित्र सोबत नसतानाही फक्त तिच्यासाठी म्हणून शिकवणी लावणारा, थंडीतही तिच्याशी बोलायला ताटकळत उभा असणारा, तिच्याशी बोलण्यासाठी काहीही करायला तयार असणारा, तिच्या घराचा पत्ता शोधायला मदत केल्यावर मित्राला इंग्रजी ची शिकवणी देणारा असा हा मुकुंदा…
असेच त्या लहान वयातही प्रेम करणारे आपल्याही आजूबाजूला होतेच ना… त्या वेळी वाटायचं की हा काय वेडेपणा, कधी ते करताहेत ते चांगल वाटलाही तरी आपण त्याला वाईट भावनेत बदलायचो. का?? कारण आपल्या मनावर हेच बिंबवलं असतं अगदी सुरवातीपासून (निदान तेव्हातरी पालक असेच सांगायचे… ) तेव्हा अश्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच पण चिडवायला लागायचो. पण "नरू मामा" मुकुंदा ला समजावताना म्हणतो ना की "घरून, बाहेरून, शाळेतून इतका विरोध असतांनाही ती किती धाडसाने प्रेम करते, आपण तर मानलं बुवा तिला, देश पुढे जातो तो अश्या धाडसी मुलामुलिंमुळेच"… तेव्हा वाईट वाटतं की आपणही त्या चिडवणाऱ्या मधलेच एक होतो, आपल्याला तेव्हा असं समजावणारा नरु मामा नाही ना भेटला…
आता काळ बराच बदललाय, मुला-मुलीने आपसात बोलणे कुठेही वाईट मानले जात नाही पण कुणाला चोरून बघणे, त्यांच्या एका ओळखीच्या हास्यासाठी जीवापाड कष्ट घेणे, ती पहिल्या प्रेमाची किमया आणि जे काही न बोलता व्यक्त करण्याची धडपड चालते ती आताही तशीच आहे. त्यात क्वचितच बदल झालाय…
"शाळा" चा शेवट तसा दुखःदच. मुकुंदाचे मित्र त्याच्यासोबत दहावीच्या वर्गात नसणार हे दुखः पचवण्याचा प्रयत्न करणारा तो, त्याची "लाईन" त्याला न सांगताच दुसर्या गावी निघून गेल्यावर बाहेरच्या दाराला धरून केविलवाण्या चेहेऱ्याने बंद कुलुपाकडे बघत, मागून जाणाऱ्या आणिबाणीच्या मोर्चा चूकवून निघून जाणारा मुकुंदा खरंच मन हेलावून जातो… आणीबाणी आणि त्याची परीस्थीती यात उगाच काहीतरी साम्य वाटून जातं...
दहावीच्या एका भयाण वर्षाला सामोरं जायचं तेही एकट्याने असं म्हणून जोरजोरात एकटाच रडणारा मुकुंदा आपल्याही डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही…
तो म्हणतो ना सिनेमात की :
त्या दिवशी मला कळले की, शाळेची मजा कशात आहे ते
इथं वर्ग आहे, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्र सुद्धा…
पण आपण त्यात कशातच नाही…
आपण त्या गायीच्या पाठीवर बसणाऱ्या पांढर्या पक्ष्यासारखे अगदी मुक्त आहोत…
ह्यांच्या शाळेत बसलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते, खास एकट्याचीच…
त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत, पण त्यातलं शिकण फार सुंदर आहे…
मंगळवार, ३१ मार्च, २०१५
निरोप...
सिंधी मुलगी मारवाडी मुलगा,
मराठी मुलगा सिंधी मुलगी,
मुस्लिम मुलगा पंजाबी मुलगी,
पंजाबी (मुळचा मराठी ) मुलगा पंजाबी मुलगी,
बंगाली मुलगा पंजाबी मुलगी,
etc etc…
एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या ह्या कॉलेज मधल्या काही जोड्या…
त्यांना एकत्र बघूनच समोरच्याच मन खुश व्ह्यायचं इतक्या मस्त आणि खुशाल जोड्या…
खूप सारे क्षण, दिवस, महिने, दोन वर्ष एकत्र जगलेत त्यांनी…
बऱ्या वाईट दिवसांना एकमेकांची सोबत केली, आनंदाचे सोहळे एकत्र पार पाडले.
खूप जगले भरभरून…
पण टांगती तलवार डोक्यावर घेऊनच.
ती तलवार होती भीतीची, घरचे आपल्या नात्याला मान्य करणार की नाही? आपलं भविष्य सोबत असणार की नाही?
हे सारे प्रश्न च प्रश्न पण तरीही त्यांनी आपला वर्तमान काळ पुरेपूर जगून घेतला
कारण खूप आवडणारी कुणी व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी यालाही भाग्य लागतं आणि प्रेम हे परत परत होत नसतं हे त्यांच मत
ज्या व्यक्तीने आयुष्यभर आपली साथ द्यावी आणि आपल्या सोबत सात जन्म असावं असं वाटतं त्यांना निरोप देणे हे किती कठीण होत असेल?
पण त्यांनी निरोप दिला एकमेकांना…
कारण? घरच्यांचा विरोध, भांडणं, समाज मध्ये येत गेलं…
त्यांच्या लेखी ह्या सगळ्यांची गिणती नव्हतीच कधी, पण घरच्या लोकांच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याची इच्छाही नव्हती कदाचित…
आपल्या मुळे पालकांना कुणी बोट दाखवू नये, त्यांना अपमान सहन करावा लागू नये आणि त्यांच्या दुखःला कारण मिळू नये म्हणूनही कदाचित…
काय होत नेमकं त्यांच्या मनात हे त्यांनाच ठाऊक, ते वेगळे झाले.
त्यांचे सोनेरी स्वप्न एव्हाना धुसर झालेत…
आताही आठवतात त्यांचे वेगळे होतानाचे उदास चेहेरे, कॉलेज संपल्यावर आता पुन्हा कधीच अशी सोबत नसणार हे कळून चुकलेले चेहेरे,
एकमेकांसोबत फोटो काढत, वेगवेगळे हावभाव करत फोटो चा आनंद घेत, त्या आनंदात दुःखाची झालर स्पष्ट दिसून येत होती,
कसा असेल भविष्यकाळ कुणा दुसर्यासोबत? ते कल्पनाही नाही करू शकणार…
काही महिने उलटून गेलेत ह्या गोष्टीला…
आता बातम्या मिळत असतात कुणाच लग्न झालं, कुणी engage झालं, तर कुणाच्या लग्नाची गोष्ट सुरुये त्यांच्या घरात
आणि त्या तुटलेल्या जोड्यांपैकी सगळेच आता नवीन वाटेवर चालायला सज्ज झालेत
डोळ्यांत अश्रू घेऊनच पण धडपडताहेत त्या आठवणींसोबत जगण्यास किंवा त्यापासून दूर जाण्यासाठी…
ते कधीही विसरू शकणार नाहीत त्या सोबत जगलेल्या क्षणांना…
त्यातल्याच एकीसोबत बोलले काही दिवसांपूर्वी, ती म्हणाली मी उध्वस्त झालीये ह्या सगळ्याने, कशातच लक्ष लागत नाही, सारखा त्याचा चेहेरा डोळ्यांसमोर येतो, तिच्या घरी हा विषयही निघाला तरी तिचे पालक कुठल्या टोकाला जातील ह्याची भीती तिला काही करूच देत नाही, त्याच्या ही घरी अशीच काहीशी स्थिती… हे झालं एक उदाहरण, कमी अधिक फरकाने अशीच स्थिती बाकीच्यांचीही…
हेच मनाला समजावून ते सावरताहेत स्वःताला…
त्यांना नेहमी आठवेल ती जिवलग व्यक्ती एक आठवण म्हणून, अनमोल ठेवा म्हणून आणि आयुष्यातला एक धडा म्हणूनही आठवेल…
सोमवार, ३० मार्च, २०१५
शेवट...
प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच आणि तो कधी ना कधी येणारच हे निश्चीत... शेवटाशिवाय मजाही नाही कुठल्या गोष्टीला... अमर असणं किंवा होणं हे जरी खूप छान वा हँपनिंग वाटत असलं तरी त्यात काही रस नाही जगण्याचा...
कधीतरी आपलाही शेवट होणारच ह्या भितीपोटी म्हणा किंवा सत्याला स्विकारून म्हणा प्रत्येकजण येणाऱ्या क्षणाला जगण्यासाठी धडपडतो. त्यातच तर खरी मजा आहे... कुठल्या क्षणी शेवट आपल्या डोळ्यांसमोर येऊन उभा राहील सांगता येत नाही म्हणून क्षणांच सोनं करण्याचा हा प्रवास...
तसंच या क्षणभंगूर गोष्टी आणि घटनांचही...
शेवटाला धरुनच नविन सुरुवात होते पुढल्या पायरीची..
ती पायरी चढणं सुरवातीला अवघड वाटतं, पाउल उचलायला त्रास होतो पण नव्याचा प्रभाव आणि जुन्याच्या आठवणी ताण हलका करतात..
खरंतर कित्येक शेवटाला सामोरे जात इथवर आलोय आपण... असंख्य घटनांचे, मैत्रींचे, नात्यांचे, माणसांचे, जागांचे शेवट आपण जगलोय आणि जगून उरलोय पण तरीही नव्या शेवटाला मन घाबरतं, खजील होतं, आतून पार तोडून टाकतं, आणि आठवणींसोबत जगायला शिकवतं...
सरस्वती पूजन
आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...
-
चालता चालता कुणाचा तरी थकलेला आवाज कानी आला... "फारच दमायला झालंय का ग तुला? थोडा श्वास तर घे, एवढ्या घाईत चालायला काय झा...
-
शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम… एक आनंदाची, उत्साहाची लहर… शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग सगळेच त्यात उत्साहात सहभाग घेतात. लहान...
-
आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...