दिवसातली सगळ्यात वेड
लावणारी वेळ म्हणजे पहाट…
शहरातली पहाट थोडीशी
वेगळी तरीही तितकाच सुखद अनुभव देणारी, (लहानपणी कधी गावात अनुभवलेली पहाटही अशीच आनंद
देणारी होती) …
पहाटेचा मंद वारा,
शांतता सगळ काही खूप खुप अनुभवण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं…
रोज वर्दळ असलेला,
गाड्यांच्या होर्न ने आणि लोकांच्या गोंगाटात हरवलेला रस्ताही बोलायला लागतो पहाटे…
जणू काही तो दाखवत
असतो कि मलाही अस्तित्व आहे स्वतःच, त्याला त्याची खरी ओळख सापडत असणार कदाचित…
झाड ही शांत उभी असतात,
कदाचित पान, फांद्या हलवण्याचा त्यालाही आळस येत असणार, मंद पहाटेचं वारं येईल त्या
दिशेने फक्त डुलत असणार ते…
पहाटेचं दर्शन घ्यायला
बाहेर पडणारे फार कमीच लोक असतात, morning walk किंवा cycling करणारे, थंडीच्या दिवसात
शेकोटी पेटवून बसणारे असे काहीजण … तीच लोक रस्त्यावर असतात फ़क्त…
धुकं असलंच रस्त्यावर
तर मग सोनेपे सुहागा च…
पुढे चालत, वारं अंगावर
घेत आणि धुक्यात वाट शोधत पुढे जाण्याची मजा मग काय वर्णावी?? आपण असेच चालत असतो ना
आयुष्यात सुद्धा… पुढे काय होणार याचा अंदाज घेत… फक्त त्याची मजा लुटायला विसरलो आहोत…
अश्या पहाटेच्या शांततेत
कुणाची सोबतही नको वाटते… फक्त स्वतः सोबत असतो आपण अश्या वेळी...
कित्ती बोलतो आपण दिवसभरात
आता तरी काही वेळ शांततेत चालावं कि असं वाटायला लागतं…
आश्चर्य म्हणजे रस्त्यावरच्या
कुत्र्यांची पण भीती नाही वाटत पाहटे, अगदी त्यांच्या जवळून गेलो तरीही…
कारण ते गाढ झोपेत असतात आणि जागे
असलेच तरी फारसा काही भुंकायचं त्यांच्याही जीवावरच येत असणार नाही का!
मग त्या झोपलेल्या
कुत्र्याला good morning म्हणून पुढे जायचं निश्चिंत…
अगदी रस्त्यावरचा पालापाचोळा,
कचरा सुद्धा त्यांना बाजूला करायला झाडू घेऊन कुणी येत पर्यंत शांत असतो मग त्यांचीही
कुरकुर चालू होत असणार दिवस उजाडला कि, कुणाचा पाय त्यांच्यावर पडल्याने…
बंद दुकानाच्या रांगा
आणि त्यासमोर झोपलेली काही गरीब लोक बघून दुखी होत मन पण आपण पुढे जातच असतो…
रस्ताही आपलासा वाटायला
लागतो… एखादी चुकार
गाडी आली किंवा गेली त्यानंतर रस्ता संपूर्ण आपला असतो दुसरी गाडी येत पर्यंत पण त्यात
फार अंतर असत पाहटे म्हणजे आपलाच होऊन जातो रस्ता…
असाच आपल्या धुंदीत
थंडीचा आस्वाद घेत दिवसाची सुरवात होते…
गुलाबी थंडी आणि उबदार
कपड्यांमध्ये गुरफटून चालेली मी… मज्जा आणि मज्जाच… :)