तिचे डोळे...
भिरभिर बघणारे, सगळं काही नजरेनं टिपून घेणारे, परत कधी बघायला मिळणार म्हणून बारकाव्या सहित लक्षात ठेवायला धडपडणारे... हे जग कधी न बघितलेलं, आकर्षित करणारं, सगळं नवीन.. जसं समोर दिसणाऱ्या धान्याच्या ढिगातून चिमणी दाण्यांनी चोच संपूर्ण भरून घेते तसंच तिचे इवलेसे डोळे सगळं टिपण्याची धडपड करणारे...
तिचे डोळे.. पाण्याने तुडुंब भरलेले, अश्रू ओघळू न देता सावरसावर करणारे.. सतत काय डोळ्यांतला पाण्याचा डोह जगासमोर आणयचा म्हणून सोडून देणारे.. वाट्याला आलेलं दुःख भोगावाच लागतं असं स्वतःलाच समजावत, जगाला चार वाईट गोष्टी बोलून आपल्या कोशात परतणारे... दूरवर नजर खिळवत शांत झालेले डोळे...
तिचे डोळे.. आनंदाने ओथंबलेले.. गाडीतून खाली उतरणारी व्यक्ती बघायला आतुरलेली ती.. ते १-२ क्षणही तिला तासांप्रमाणे भासले.. समोर उभी असलेली व्यक्ती कितीतरी दिवसांनी नजरेस पडली असावी बहुदा, तरीच नमस्कारासाठी खाली झुकण्यात आणि मिठी मारण्यात गोंधळली ती मग घट्ट मिठीच मारते तेव्हा आनंदाचे अश्रू गालांवर पसरवणारे ते डोळे...
तिचे डोळे.. निश्चयाने पुढे पाऊल टाकणारे.. रस्त्यावरच्या वर्दळीचा फारसा फरक न पडत पुढे जाणारी ती, किती दिवस घाबरून, लपून जगायचं? आता संकटाचा सामना केलाच पाहिजे, खंबीर व्हायलाच पाहिजे अशी धमक स्वतःलाच देत मनाशीच काहीतरी संवाद करत झपझप पुढे जाणारी ती, तो ठामपणा व्यक्त करणारे तिचे ते खंबीर डोळे..
तिचे डोळे.. वाट बघून थकलेले, वाटेकडे डोळे आणि मन दोन्ही खिळवून बसलेले.. दिलेल्या वेळेच्या कितीतरी आधी ठराविक ठिकाणी येऊन वाट बघत बसलेली ती, अजूनही ती व्यक्ती का से आली नाही किंवा आपण फसवले तर गेलो नाही ना? ह्या चिंतेने ग्रासलेले डोळे...
तिचे डोळे.. त्रासलेले.. चाहूलही न लागत आलेलं मोठ्ठ आजारपण.. त्याच्याशी सामना करता करता थकलेलं शरीर आणि मनही. तरुणपणाचा जोश आणि ऊर्जा आताही असती तर अस्स पळवून लावलं असतं संकट पण आता किती दिवस असंच जगायचं अश्या विचारात त्रासलेल मन आणि आणि त्रासून मिटून घेतलेले डोळे..
तिचे डोळे.. कुतूहलाने भरलेले.. पुढ्यात असलेलं खेळणं कसं हाताळायाचं ह्या विचारात गुंतलेेले.. खेळण्यातून मान वर काढून मदतीसाठी बोलावणारे ते गोड डोळे..
तिचे डोळे.. शून्यात हरवलेले.. आयुष्य कसं जगलो ह्याचा आढावा घेणारे की परतीची वाट बघणारे, नेमके आनंदी की दुःखी न कळणारे ते स्तब्ध डोळे..
तिचे डोळे... खूप काही व्यक्त करणारे.. कधी आनंदाने ओसंडून वाहणारे तर कधितरी बांध फुटून अश्रू ओघळणारे, कधी आश्चर्याने थक्क झालेले तर कधी राग धरून बसलेले.. आणि तरीही कुठल्याही हावभावात नेहमी सुंदरच दिसणारे... तिचे डोळे...